घरमुंबईपिण्याचे पाणी पुरवण्यात अपयशी, असे म्हणायला लावू नका!

पिण्याचे पाणी पुरवण्यात अपयशी, असे म्हणायला लावू नका!

Subscribe

मुंबई हायकोर्टाचा आघाडी सरकारला इशारा

महाराष्ट्र सरकार आपल्या नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवण्यात अपयशी ठरले आहे, असे म्हणण्यास आम्हाला भाग पाडू नका, असा इशारा देताना स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटल्यानंतरही लोकांना जर पाणी मिळण्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठवावे लागत असतील तर ते दुर्दैवी आहे. पाणी हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. लोक पाण्याशिवाय राहू शकत नाही, अशी टिप्पणी मुंबई हायकोर्टाने बुधवारी केली.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कांबे गावातील रहिवाशांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी न्यायमूर्ती एस. जे. काठवल्ला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे झाली. याचिकाकर्त्यांनी स्टेम वॉटर डिस्ट्रीब्यूशन आणि इन्फ्रा कंपनी, ठाणे जिल्हा परिषद आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचा संयुक्त उपक्रमानुसार त्यांना दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली होती. सध्या महिन्यातून दोन वेळा फक्त दोन तासांसाठी पाणीपुरवठा होत असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. या याचिकेवर, दररोज पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा स्टेमचे व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब दांगडे यांनी कोर्टात केला. तसेच आम्ही एका ठराविक ठिकाणापर्यंत पाणीपुरवठा करतो. तिथून पुढे याचिकाकर्त्यांच्या घरी पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असल्याचे ते म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून गावातील लोकसंख्या वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे आम्हाला पाणीपुरवठ्याची व्यवस्था सुधारण्याची गरज आहे, असे दांडगेंच्या वकिलांनी सांगितले.

- Advertisement -

त्यावर खंडपीठाने, दररोज किमान काही तास तरी पाणी पुरवणे आवश्यक आहे. नियमितपणे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हा मूलभूत अधिकार आहे. लोक पाण्याशिवाय राहू शकत नाही आणि स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनी पाण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागताहेत, हे खरोखर दुर्दैवी आहे. महाराष्ट्र सरकार आपल्या नागरिकांना पाणी पुरवण्यात अपयशी ठरले आहे असे म्हणण्यास आम्हाला भाग पाडू नका. राज्य सरकार असहाय्य आहे हे मानण्यास आम्ही नकार देतो. यासाठी राज्य सरकारच्या सर्वोच्च पदाधिकार्‍याला बोलावून जाब विचारण्यासही आम्ही मागे हटणार नाही,असेही खंडपीठाने सुनावले.

स्टेम कंपनी स्थानिक राजकारण्यांना आणि टँकर लॉबींना बेकायदेशीरपणे पाणीपुरवठा करत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. तसेच मुख्य पाइपलाइनवर ३०० पेक्षा जास्त बेकायदेशीर जोडण्या आणि व्हॉल्व्ह बसवल्याचाही दावा केला होता. यावर कोर्टाने म्हटलं की, आधी हे बेकायदेशीर कनेक्शन काढून टाका. तुम्ही तुमच्या निष्क्रियतेमुळे कोणतीही पोलीस तक्रार दाखल करण्याची तसदी घेतली नाही. ज्यांना पाणी मिळायला हवे, त्यांना मिळत नाही. तुम्हाला या लोकांच्या समस्या सोडवण्यात कोणताच रस असल्याचे दिसत नाही.

- Advertisement -

जेव्हा ते बेकायदेशीर कनेक्शन काढण्यासाठी जातात, तेव्हा दीडशेहून अधिक लोकांचा जमाव जमतो आणि ते कारवाईला विरोध करतात, असे दांडगे यांनी कोर्टाला सांगितले. दरम्यान, हायकोर्टात १६ सप्टेंबर रोजी यावरील पुढील सुनावणी होईल. तसेच कोर्टाने दांगडे यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून याप्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -