घरमहाराष्ट्रदीड वर्षांनंतर शाळा सुरु

दीड वर्षांनंतर शाळा सुरु

Subscribe

शिक्षणोत्सव साजरा करत फुले, पेढे, पेन देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

‘शाळा नसताना कळते, काय गंमत असते शाळेची…ती मजा, ती मस्ती, कधी मित्रांशी कट्टी तर कधी असते दोस्ती…’ शाळेतील या दंगामस्तीला दीड वर्षांपासून मुकलेल्या मुलांच्या शाळेची घंटा अखेर सोमवारी वाजली आणि मुलांनी शाळेची पायरी पुन्हा चढली. शाळेत जायचे म्हणून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दीड वर्षांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटल्याचा एक वेगळ्या प्रकारचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता. त्यातच शिक्षकांनी गुलाबपुष्पे, पेढे देऊन स्वागत केल्याने त्यांच्या उत्साहाला अधिकच उधाण आले. मात्र, या उत्साहातही शिक्षकांनी कोरोनाच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांचे सॅनिटायझेशन करून त्यांना शाळेत प्रवेश दिला. पालकांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी शाळेतर्फे जनजागृतीही करण्यात येत होती.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील शाळाही 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी राज्यातील ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी व शहरी भागातील ८ वी ते १२ पर्यंतच्या कुलुपबंद असलेल्या शाळा पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजल्या. दीड वर्षांनंतर शाळा सुरू होणार, आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटायला मिळणार यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. काही विद्यार्थी शाळेच्या गणवेशात तर काही शाळांमध्ये नियमित कपड्यांमध्येच विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. प्रत्येक वर्षी शाळा सुरू होताना नवीन वह्या, पुस्तके, दप्तर, कपडे असा सारा लवाजमा घेऊन विद्यार्थी शाळेत जात असे. मात्र, यावेळी वह्या, पुस्तके नवीन नसली तरी शाळेत जाण्याचा उत्साह मात्र तोच दिसून येत होता. तब्बल दीड वर्षांनंतर कुलुप बंद असलेल्या शाळा पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजल्या. राज्यभरात शाळेकडून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवशी फुले आणि पेढे देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. दीड वर्षांनंतर शाळा सुरू होत असल्याने शाळेचा पहिला दिवस हा शिक्षणोत्सव म्हणून साजरा करण्यात आला.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी शाळांकडून घेण्यात आली होती. पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश असला तरी बहुतांश पालकांनी आपली संमती दिली होती. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक दिसून येत होती. मात्र, शाळांनीही एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्याचे नियोजन करून एका वर्गात किमान 25 विद्यार्थीच बसतील अशी व्यवस्था केली होती. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने शाळा टप्प्याटप्प्याने तीन सत्रात भरविण्याचेही नियोजन केले होते. सोशल डिस्टन्सिंग राखता यावे यासाठी विद्यार्थ्यांना टप्प्याटप्यात बोलावण्यात येणार आहे. काही शाळांनी तीन तासांचे नियोजन केले आहे. पहिल्या आठवड्यात वर्गात प्रत्यक्ष अभ्यास होणार नाही. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत शाळा सुरू ठेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या प्रत्येक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येत असल्याचे शाळेतील मुख्याध्यापकांकडून सांगण्यात आले.

शाळेत विद्यार्थ्यांना पाहून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांनी देखील सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून मुलांना शाळेत पाठवले. मुले शाळेत गेल्याचा आनंद पालकांच्याही चेहर्‍यावर दिसतो आहे. ऑनलाईन अभ्यासापासून सुटका झाली, आता शाळेत अभ्यास करायला मिळेल त्यामुळे खूप आनंद होत असल्याचे विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. राज्य सरकारच्या कोविड नियमावलीनुसार, विद्यार्थ्यांची यापुढे नियमित तपासणी मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटरने तपासणी केली. विद्यार्थ्यांना ताप, खोकला नाही ना? याबाबत शिक्षकांमार्फत चौकशी केली. विद्यार्थ्यांची काळजी घेणे ही आमची जबाबदारी असल्याचे संस्थेचे सह्याद्री विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष रामराव सुर्वे यांनी सांगितले. सोमवारचा दिवस मुलांबरोबर गप्पा मारत व मागील दीड वर्षातील अभ्यासाचा थोडासा आढावा घेतला. तसेच काही विद्यार्थ्यांची कौटुंबिक परिस्थिती याबाबतही विचारपूस केली असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक मोहन खोबरेकर यांनी सांगितले. मंगळवारपासून प्रत्यक्षात अभ्यासाला सुरुवात केली जाईल, असे खोबरेकर म्हणाले. सोमवारी दिवसभरात शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांचा उत्साह प्रचंड दिसून आला.

- Advertisement -

पालिकेतील 30 हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती
मुंबई महापालिकेच्या 755 शाळांमध्ये इयत्ता 8 वी ते 10 वीचे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरू झाले. यावेळी मुंबई महापालिकेच्या विविध शाळांमध्ये 30 हजार 250 विद्यार्थी, 4776 शिक्षक तसेच 875 शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते, अशी माहिती मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली. शिक्षण विभागातील विविध अधिकार्‍यांनी पालिकेच्या शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचा, रोज उपस्थित राहण्याचे सल्ले दिले.

शहरीपेक्षा ग्रामीण भागात उपस्थिती अधिक
राज्याच्या विविध जिल्ह्यातील 32 हजार 764 शाळांपैकी 27 हजार 449 शाळांमधील वर्ग सोमवारी सुरू झाले. यामध्ये ग्रामीण भागातील 21 हजार 925 शाळांमध्ये 39 लाख 9 हजार 801 विद्यार्थ्यांपैकी 20 लाख 10 लाख 585 विद्यार्थी उपस्थित होते. तर शहरी भागातील 15 लाख 35 हजार 581 विद्यार्थ्यांपैकी 5 लाख 56 हजार 999 विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हजेरीचे प्रमाण अधिक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -