घरताज्या घडामोडीनाराज शिवसेनेचे एकला चलो रे! विधान परिषदेत राष्ट्रवादी, काँग्रेसला साथ न...

नाराज शिवसेनेचे एकला चलो रे! विधान परिषदेत राष्ट्रवादी, काँग्रेसला साथ न देण्याची भूमिका

Subscribe

राज्यसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अपक्षांना भाजपच्या बाजूने वळवण्यात यशस्वी ठरल्याने धनंजय महाडिक निवडून आले, तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा दारुण पराभव झाला. हा पराभव मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतही दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला एकला चलो रेचा इशारा दिला आहे.

संजय पवार यांच्या पराभवाचे खापर संजय राऊत यांनी अपक्षांवर फोडल्याने महाविकास आघाडीला पाठिंबा देणार्‍या अपक्षांमध्ये प्रचंड नाराजी आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन करून मविआला मतदान करण्याचे आवाहन करूनही बविआचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील यांनी थेट भाजपच्या पारड्यात मत टाकले, तर शेकापचे श्यामसुंदर शिंदे, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे आणि मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी पहिल्या पसंतीचे मत जरी संजय पवार यांना टाकले असले तरी तिसर्‍या पसंतीचे मत धनंजय महाडिक यांना दिल्यानेच त्यांचा विजय झाला, असे शिवसेनेला वाटत आहे. महत्त्वाचे म्हणजे हे तिन्ही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात.

- Advertisement -

शिवाय राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ऐनवेळी मतांचा कोटा वाढवल्याने शिवसेनेला किमान 2 मतांचा फटका बसल्याची भावना आहे. त्यामुळे एकप्रकारे शिवसेनेने राष्ट्रवादीलाच इशारा दिल्याचे म्हटले जात आहे. येत्या 20 जून रोजी विधान परिषदेच्या 10 जागांसाठी ही लढत होत आहे. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी 2 जागांवर उमेदवार उतरवत असून भाजप 5 उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीत विजयासाठी आवश्यक 27 मतांच्या कोट्यानुसार शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, परंतु राष्ट्रवादी आणि प्रामुख्याने काँग्रेसला अतिरिक्त मतांची आवश्यकता असल्याने शिवसेनेच्या भूमिकेमुळे या दोन पक्षांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंची नाराजी सहाजिक

 

आमच्यात कोणताच अंतर्गत वाद नाही. उलट आम्हाला अपक्षांचा पाठिंबा मिळाला. त्यातील 4 ते 5 लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही असे दिसते. राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची नाराजी सहाजिक आहे. त्यांचा दुसरा उमेदवार निवडून येणे गरजेचे होते, मात्र तो आला नाही. झालेल्या मतदानाबाबत त्यांना खुलासा झाला असेल, मात्र याबाबत त्यांचे आणि माझे बोलणे झाले नाही.
-जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -