घरसंपादकीयओपेडप्रवाशांना खड्ड्यात घालणार्‍या रस्त्यांवर टोलवसुली कशासाठी?

प्रवाशांना खड्ड्यात घालणार्‍या रस्त्यांवर टोलवसुली कशासाठी?

Subscribe

वाहनचालक आणि प्रवाशांचे खड्ड्यांमुळे एवढे हाल होत असूनही खड्डे दुरुस्तीचं काम सोडून पडघा टोल नाक्यावर वसुलीसाठी वाहनचालकांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच शिंदे गटातील स्थानिक आमदार शांताराम मोरे यांनी केला होता. महामार्गावरील खड्डे गणपतीआधी बुजवण्याची मागणी करणारं पत्र आमदार मोरे यांनी रस्ते विकास महामंडळ, एमएमआरडीए तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, टोल वसूल करणार्‍या कंत्राटदाराला दिल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. तरीही महामार्गावरील खड्डे जसेच्या तसेच आहेत. त्यामुळं महामार्गावरील खड्डे जोपर्यंत दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत टोलवसुली बंद ठेवावी, अशी त्यांची आग्रही मागणी आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून राज्यातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सप्टेंबर महिना सरत आला, तरी त्यात काडीमात्रही फरक पडलेला नाही. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. नदी-नाले अजूनही पात्र ओलांडून शेती, घरदारं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करत आहेत. मागील २ ते ३ महिन्यात मुसळधार पावसात रस्त्यांनी नदी-नाल्याचं रुप धारण केल्याचं दृष्य प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरात दिसलं. सततच्या पावसामुळं महामार्गासह, जिल्हा, ग्रामीण भागातील रस्ते खड्ड्यात गेल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल सुरूच आहेत. गणरायाच्या आगमनापूर्वी रस्त्यांची डागडुजी करण्याचं आश्वासन स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाने दिलं होतं.

गणरायाला निरोप देऊन आता पंधरवडा उलटत आला आहे. बाप्पा आले आणि गेलेही, तरी जनतेपुढील खड्ड्यांचं विघ्न मात्र टळलेलं नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नुकताच मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास केला. या प्रवासात त्यांना खड्ड्यांसोबतच वाहतूककोंडीचा ठिकठिकाणी सामना करावा लागला. या अवघड प्रवासाने त्रस्त झालेल्या अजित पवार यांनी लागलीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मुंबई-नाशिक महामार्गाच्या डागडुजीचा ताबडतोब निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

मुंबई-नाशिक आग्रा राष्ट्रीय महामार्ग हा मुंबई, ठाणे आणि नाशिक या प्रमुख शहरांना जोडणारा राज्यातील महत्वाचा मार्ग आहे. मात्र पावसाळ्यापासून या महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. परिणामी या महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रदूषणात भर पडत आहे. या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे, या अपघातामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मणक्यांच्या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. ठाणे शहरातील साकेत ब्रीजच्या रखडलेल्या कामामुळे तर या वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे.

असे निरीक्षण अजित पवार यांनी नोंदवले आहे. तर या महामार्गावरील खड्डे बुजवणे, रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करणे, पुलांचे अपूर्ण काम युद्धपातळीवर पूर्ण करणे, अवजड वाहनांमुळे होणार्‍या वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यासाठी ठाणे शहरातील लोकप्रतिनिधी, वाहतूकदार संघटना, प्रवासी संघटना, स्थानिक नागरिक आदींना विश्वासात घेऊन वाहतुकीचे सुयोग्य आणि प्रभावी नियोजन करावे. या महामार्गाच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्याबाबत संबधितांना सूचना द्याव्यात, अशी मागणी मुंबई-नाशिक महामार्गावरून दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करणार्‍या लाखो प्रवाशांच्या वतीनं पवार यांनी केली आहे. त्यामुळं या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यांना, त्यामार्फत कंत्राटदाराला निर्देश देणं अपेक्षित आहे.

- Advertisement -

मुंबई-नाशिक महामार्गाची दुरवस्था ही काही आजची बाब नाही. दरवर्षी पावसाळ्यात येथील रस्त्यांची हमखास चाळण होते. आठवड्याच्या अखेरीस किंवा सलग सुट्ट्या जोडून आल्या की महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होते. खड्ड्यांमुळे महामार्गावरील वाहतुकीची गती कमालीची मंदावते. एवढी की सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन ६ ते ७ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागतात. २०० किलोमीटरच्या प्रवासाला ५ ते ६ तासांचा कालावधी लागतो. असं असलं तरी महामार्गावर टोलवसुली धडाक्यात सुरू आहे. चारचाकीसाठी एकबाजूच्या प्रवासाला १३५ रूपये टोल द्यावा लागत आहे. पैसे देऊनसुद्धा सुविधा मिळत नसल्याने वाहनधारकाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. परंतु या नाराजीची कुणाकडूनही दखल घेतली जात नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे.

वाहनचालक आणि प्रवाशांचे खड्ड्यांमुळे एवढे हाल होत असूनही खड्डे दुरुस्तीचं काम सोडून पडघा टोल नाक्यावर वसुलीसाठी वाहनचालकांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच शिंदे गटातील स्थानिक आमदार शांताराम मोरे यांनी केला होता. महामार्गावरील खड्डे गणपतीआधी बुजवण्याची मागणी करणारं पत्र आमदार मोरे यांनी रस्ते विकास महामंडळ, एमएमआरडीए तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, टोल वसूल करणार्‍या कंत्राटदाराला दिल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. तरीही महामार्गावरील खड्डे जसेच्या तसेच आहेत. त्यामुळं महामार्गावरील खड्डे जोपर्यंत दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत टोलवसुली बंद ठेवावी, अशी त्यांची आग्रही मागणी आहे. एवढंच नाही, पडघा टोल नाका कायमचा बंद करण्यासाठी सरकारकडं पाठपुरावा करणार असल्याचंही मोरे यांचं म्हणणं आहे.

नाशिकहून मुंबईकडे जाताना प्रामुख्याने विल्होळी, इगतपुरी, कसारा, घोटी, पडघे फाटा आणि टिटवाळा परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणी उड्डाण पुलांची कामे सुरू आहेत. महामार्गावर दोन्ही बाजूला खणून ठेवण्यात आल्याने अतिशय अरूंद मार्गातून वाहनचालकांना वाहन घेऊ जावे लागते. पर्यायी सर्व्हिस रोडचे कामही अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. पावसामुळे हे सर्व्हिस रोडही खराब झाले आहेत. पावसामुळे मातीचा चिखल होऊन त्यात वाहनांची चाकं रुतून बसतात. अचानक आलेल्या खड्ड्यांमुळे वाहने आदळतात. वाहनांचे टायर फुटतात. सध्याच्या घडीला नाशिकला पालकमंत्री नसल्याने कितीही मागणी केली, तरी त्याची दखल घ्यायला कुणीही नाही, अशी अवस्था आहे.

मध्यंतरी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रकल्प संचालकांसोबत नाशिक येथील कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मुंबई-नाशिक महामार्गाची ताबडतोब डागडुजी करावी, अशा सूचना केल्या. त्यावर ८ दिवसांच्या आत नाशिक ते मुंबई दरम्यान महामार्गावरील सर्व खड्डे पूर्णपणे बुजवले जातील, असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले आणि त्यानुसार प्राधिकरणने मुरूम व पेव्हरब्लॉक टाकून खड्डे तात्पुरते बुजवले. मात्र आठच दिवसात मुरूम आणि पेव्हरब्लॉक निघून गेल्यामुळे खड्डे उघडे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवणे कठीण होऊन बसलं आहे.

जी अवस्था मुंबई-नाशिक महामार्गाची तीच अवस्था मुंबई-गोवा महामार्गाची मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे तर राष्ट्रीय विषय झाला आहे. परंतु केंद्रीय मंत्र्यांनादेखील खड्ड्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा सुचलेला नाही, हे विशेष. पावसाळ्याआधी, अलिबाग-पेण, वडखळ-माणगाव व अलिबाग रामराजमार्गे रोहा, अलिबाग-चणेरामार्गे रोहा या रस्त्यांची दुरुस्ती राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने केली होती. परंतु धुवाँधार पावसामुळे रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडले. अलिबाग-पनवेल मार्गावरील वडखळपासून तरणखोप या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले. कोलाड फाटा ते माणगाव रस्ता, अलिबाग-चणेरामार्गे रोहा, अलिबाग रामराज मार्गे रोहा या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले.

गणेशोत्सवात कोकणात रस्ते मार्गाने जाणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टिकोनातून मुंबई-गोवा महार्गावर सरकारच्या वतीने प्राधान्याने उपाययोजना होणं गरजेचं होतं. स्वस्त: सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी रस्त्यावर उतरून डागडुजीच्या कामांची पाहणी केली होती. कंत्राटदार, अधिकार्‍यांना सूचना केल्या होत्या. परंतु पावसाचा जोर वाढताच खड्ड्यांनी या निकृष्ट दर्जाच्या कामाचं पितळ उघडं पाडलं. मंत्र्यांच्या जिल्ह्यात तर रस्त्यांची पुरती दैना झाल्याचं पाहायला मिळालं. रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर तर वाहन चालणं अवघड झालं आहे. खासकरून पेण-वडखळ मार्गावर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एक एक खड्डा मोठ्या डबक्याच्या आकाराचा झाला आहे.

अवघ्या ५ ते १० मिनिटांचा वडखळ नाका पार करायला अर्धा ते पाऊणतास तर वाहतूककोंडीच्या वेळेस एक तास लागत आहे. या परिस्थितीला ठेकेदारांचा चालढकलपणा आणि अधिकार्‍यांचा दुर्लक्षपणा कारणीभूत आहे. त्याचा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि चिखलामुळे दुचाकीस्वार तर कधी खाली पडतील आणि मागून येणार्‍या अवजड वाहनाच्या खाली येतील, अशी भीती याठिकाणी कायम असते. खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनांसह एसटी बस आणि इतर वाहने चालवतानाही तारेवरची कसरत करावी लागते. संततधार पावसामुळे ठेकेदाराने केलेलं निकृष्ट काम चव्हाट्यावर आलं आहे. गणेशोत्सवापूर्वी भरपावसात डांबरीकरण करीत असल्याचे कंत्राटदाराचे प्रतापही समोर आले होते, परंतु प्रशासकीय अधिकारी कंत्राटदारावर कुठलीही कारवाई न करता गप्प बसून होते.

गोवा महामार्गाकडे सरकारने केलेलं दुर्लक्ष, महामार्गाच्या चौपदरीकरणाचं संथगतीने सुरू असलेलं काम व पनवेल-पोलादपूर मार्गावरील खड्डे यांमुळे होणारी वाहतूक कोंडी, वाढते अपघात यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांनी अनेकदा रास्तारोको आंदोलन करूनही काहीच उपयोग होत नाही. हे दरवर्षीचंच झालं आहे, अशा आविर्भावात सरकारी बाबू असतात. त्यामुळं कंत्राटदारांचंही फावतं. रस्त्यांच्या बांधकामावर आणि त्यांच्या डागडुजीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. दरवेळेच्या प्रवासासाठी वाहनचालक आणि प्रवासी टोलसाठी पैसे खर्च करतात, अशा परिस्थितीत जर सर्वसामान्य जनतेला साधे चांगले रस्तेही मिळू नये हे सरकारी यंत्रणेचं मोठं अपयशच आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार असल्याचा दावा मुख्यमंत्री आपल्या प्रत्येक भाषणात करतात. शहरातील आणि महामार्गावरील खड्ड्यांची समस्या कायमस्वरूपी संपवण्यासाठी विशेष प्राधिकरण स्थापण्याची घोषणाही केली आहे. हे स्वागतार्ह असलं, तरी या घोषणा प्रत्यक्ष कृतीत केव्हा उतरणार आणि सर्वसामान्य प्रवासी, वाहनचालकांना अमेरिकेसारखे गुळगुळीत नको किमान वाहन चालवण्यापुरते तरी बरे रस्ते केव्हा मिळणार, याचीच प्रतीक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -