घरफिचर्ससारांशनली : अस्वस्थ करणारा प्रवास!

नली : अस्वस्थ करणारा प्रवास!

Subscribe

‘नली’ या एकल नाट्याबद्दल कधी काही कानावर आलं असेल, तर कधी काही वाचनात आलंच असेल. शंभू पाटील, योगेश पाटील आणि हर्षल पाटील अशा एक नाही, तर तीन पाटील मित्रांचं हे नाटक. एकाचं नाट्य रूपांतर, दुसर्‍याचं दिग्दर्शन आणि तिसर्‍याच्या अभिनयाने नटलेलं हे एकलनाट्य. या ‘नली’चे प्रयोग राज्यात विविध ठिकाणी होत असतात. कधी नशिराबादचा नाईकवाडा, तर कधी नाशकातील खुला रंगमंच. ज्या ठिकाणी रंगमंचही उपलब्ध नाही अशा ठिकाणीदेखील नलीचे प्रयोग झाले आहेत, होत आहेत. जो पण जिथे पण या नलीला भेटतो सुन्न होऊन जातो.

परिवर्तन, जळगाव निर्मित ‘नली’ श्रीकांत देशमुख यांच्या कादंबरीवर आधारित आहे. याची नाट्य स्वरूपात संहिता उपलब्ध नाही. कादंबरीतले आवश्यक वाटतील तेवढे प्रसंग एकत्र करून त्यांचं सादरीकरण केलं जात आहे. ‘एकलनाट्य’ ही संकल्पना हा शब्दप्रयोग मात्र एकदम चपखल आहे. साधारणपणे एकच कलाकार विविध पात्रे साकारत असलेल्या नाट्यप्रयोगाला आपण ‘एकपात्री’ असे संबोथतो, पण त्यात कलाकार एक आणि पात्र तर अनेक असतात. त्यामुळेच ‘नली’ हे एक ‘एकलनाट्य’ असल्याबाबत दुमत उरत नाही.

‘नली’ या शीर्षकावरून तरी या एकलनाट्याच्या विषयाबाबत प्रेक्षकांना काही अर्थबोध होणार नाही. शीर्षक ‘नली’ आणि पोस्टरवर लाल रिबीनीसह यात भूमिका साकारणारा पुरुष कलावंत यामुळे आणखीनच कोड्यात पडायला होईल,पण ‘नली’चा प्रयोग सुरू झाला की प्रत्येक जण यात नकळत गुंतत जाईल. ही कुठेतरी आपल्याच आजूबाजूला घडणारी किंबहुना आपलीच कथा असल्याचंही वाटून जाईल.

- Advertisement -

शाळा-महाविद्यालयात थोड्याफार फरकाने प्रत्येकालाच अशी एक ‘नली’ भेटत असते. त्यामुळेच त्या बाळूच्या रूपात कुठेतरी आपण आपल्या स्वत:ला शोधायला आणि सापडायला लागतो. ‘नली’ ही कथा नलीची आहे की बाळूची? तर याचं उत्तर आहे ‘नली’ कथा आहे आपल्या समाजव्यवस्थेची. वर्षानुवर्षे चालत आलेली पुरुषप्रधान समाजव्यवस्था. आज स्त्री शिकली, सज्ञान झाली. स्वत:च्या पायावर उभी राहिली, पण ही पुरुषप्रधान समाजव्यवस्था अद्यापही अस्तित्वात आहे आणि आणखी कितीतरी वर्षे ती तशीच राहील. त्यामुळेच गावोगावी, खेडोपाडी अशा कितीतरी ‘नली’ आपल्याला आजही भेटत आहेत, भेटत राहतील.

‘नली’ म्हणजे नलिनी देवराव. बाळूच्या शाळेत, त्याच्याच वर्गात शिकणारी, दोन वेण्या घालणारी अल्लड आणि अवखळ. ती हसली की तिच्या लाल रंगाच्या दोन रिबीनीही हसल्याचा भास बाळूला व्हायचा. हो, बाळू ‘नली’चा सूत्रधार! त्याच्याच शब्दात तर नलीची ही कथा उलगडत जाते. चौथीत असताना या बाळू आणि नलीमध्ये जवळीक निर्माण होते. खरंतर तारुण्यसुलभ भावनांचा त्यावेळेला गंधही नसतो, पण एक अनामिक ओढ मात्र जाणवत असते. आयुष्यातील या वळणावर ते भेटतात. इथून पुढे सुरू होतो त्यांचा प्रवास, पण परस्परविरोधी. तिचं आधी देवळात येणं बंद होतं. शाळा सुटते. त्या वयात ती घरकामाला जुंपली जाते. तो मात्र पहिल्या नंबराने पास होतो.

- Advertisement -

तालुक्याच्या शाळेत शिकायला जातो. मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण होतो. कॉलेजात जातो. शिकून मोठा प्रशासकीय अधिकारी होतो. मनातून मात्र नलीची आठवण काही केल्या जात नाही. त्याचा प्रवास असा प्रगतीच्या दिशेने होत जातो आणि नलीचा प्रवास? तो तर अचानक मधेच थांबतो. बाळूला आणि प्रेक्षकांना सुन्न करून. सुरुवातीला हळुवारपणे उलगडत जाणारी ही नलीची कथा कुठेतरी ‘सैराट’ या चित्रपटाचीही आठवण करून देते. अनेक प्रसंगांची सुंदर गुंफण, मधूनच हास्याचा शिडकावा करीत पुढे सरकत जाणारा हा प्रवास सरतेशेवटी मात्र मनात अनेक प्रश्न निर्माण करीत अस्वस्थ करून जातो.

बाळू आणि नलीव्यतिरिक्त बाळूची आई, रामा, मधू, म्हाळजी, पवार सर, हणम्या, देवराव अशी १०-११ पात्रे या प्रवासात आपल्याला भेटतात. प्रत्यक्ष रंगमंचावर मात्र हर्षल पाटील हा एकटा कलाकार ही पात्रे आपल्या समर्थ अभिनयाने उभी करतो, साकारतो. जसं पात्रांचं अगदी तसंच नेपथ्याचंही. शून्य नेपथ्यासह रंगमंचावर गावातली शाळा, गुलमोहराचं झाडं, देऊळ, नलीचा वाडा, तिथून जाणारी पायवाट इत्यादी उभं राहतं. अर्थात ही किमया सशक्त अभिनय-दिग्दर्शनाची.

प्रसंगांची गुंफण तर कमालीची भावणारी आणि भिडणारी आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर बाळूने छडीसाठी नलीला हात पुढे करायला लावणं, परीक्षा सुरू असताना बाळूनं नलीला उत्तरं सागणं, बाळूचं शाळेत पहिलं येणं आणि तिचं नापास होणं, नलीचं पाणी भरतानाचं वस्तुस्थितीला स्वीकारणं, नेहमी नलीच्या वाड्याजवळ आल्यानंतरच बाळूच्या चप्पलचा अंगठा तुटणं, बाळूचं शहरात सिनेमा पाहायला जाणं, नलीवरच्या प्रेमाची जाणीव होणं… असे कितीतरी प्रसंग डोळ्यांसमोर छान उभे राहतात. हर्षल पाटील इथे बाळू व सूत्रधार बाळासाहेब अशा एकाच व्यक्तिमत्त्वाच्या पण दोन भिन्न भूमिकांमधून प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. बाळू असताना तो अस्सल खांदेशीत तर बाळासाहेब असताना शुद्ध मराठी भाषेत प्रेक्षकांशी संवाद साधतो. हर्षलच्या कायिक आणि वाचिक अभिनयाचा कस येथेच लागतो. नली प्रत्यक्ष रंगमंचावर नसूनही ती प्रेक्षकांना तिच्या हसण्याच्या आवाजाने, हर्षलच्या केस कानावरून मागे घेण्याच्या लकबीने, ‘बाडू’ अशा उच्चाराने एकसारखी दिसत राहते.

दिग्दर्शक म्हणून योगेश पाटील आणि अभिनेता म्हणून हर्षल पाटील या दोघांची मेहनत स्पष्टपणे दिसून येते, क्षणक्षणाला जाणवत राहते. त्याला मंगेश कुलकर्णी यांचं संगीत व राहुल निंबाळकरच्या प्रकाश योजनेने अधिकच सजीवता प्राप्त होते. हर्षल, संगीत आणि प्रकाश योजना ही तीनच खरंतर या एकलनाट्यातील पात्रे, पण एका परिपूर्ण अशा नाट्याची ते अनुभूती देऊन जातात. ‘नली’ पाहताना नाशिकचे दिवंगत कवी भीमराव कोते यांच्या ‘कळलंच नाही कुठे गेल्या वर्गातल्या मुली’ या कवितेची आठवण होणं अगदी स्वाभाविक होतं.

‘नली’ चा प्रयोग संपतो तेव्हा सुन्न झालेला प्रेक्षक नकळत सुन्न होऊन जातो. ‘नली’ ही एका अव्यक्त निरपेक्ष प्रेमाची कथा आहे. ती एका विशिष्ट प्रदेशातील, बोली भाषेतील आणि ठरावीक कालखंडातील असली तरी पाहणार्‍या प्रत्येकाला ती भावते, काळजाला थेट भिडते. कालबाह्य न ठरता कालातीत वाटणारी ही कलाकृती एकदा तरी पाहायला हवी.

–श्रीराम वाघमारे 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -