घरसंपादकीयअग्रलेखअनप्रेडिक्टेबल दादा

अनप्रेडिक्टेबल दादा

Subscribe

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुका झाल्यापासून राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम राहिलेला नाही. कुठला पक्ष कुणाशी हातमिळवणी करेल, कुठले नेते आपल्या पक्षातून फुटून दुसर्‍या पक्षाची वाट धरतील, कोण कुणावर आरोप-प्रत्यारोप करेल, तर कधी कुणाची ऐनवेळी पाचावर धारण बसेल काहीच सांगता येत नाही. भाजप-शिवसेनेत झालेला काडीमोड, विचारधारा बाजूला ठेवत महाविकास आघाडीची बांधण्यात आलेली मोट, शिवसेनेत झालेली फाटाफूट सारे काही इतक्या अनपेक्षितरित्या घडले की राजकीय जाणकारांचे सर्वच्या सर्व ठोकताळे मोडून पडलेत. महाराष्ट्रातील राजकीय पटलावर एक प्रकारचे गूढ वातावरण तयार झाले आहे. त्यातच मागील ३ वर्षांत आपल्या वाक्कौशल्याच्या बळावर राजकारणाचा फड गाजवून अनेक नेते मुख्य प्रवाहाच्या केंद्रस्थानी आलेत. तर बरेच जुने जाणते नेते आपापला आब राखून बाजूला झालेत. त्यामुळे कुठला नेता कुणाला भेटायला जातोय, कोण कुणासोबत कधी बैठका घेतोय याबाबतीच सर्वच जण अत्यंत सजग झालेत. अशा सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या भाऊगर्दीत असे एकमेव नेते आहेत, ज्यांच्यावर केवळ विरोधी पक्षातीलच नाही, तर स्वपक्षातील नेतेदेखील लक्ष ठेवणे गरजेचे समजतात. ते नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार.

अजित पवारांना त्यांचे समर्थक लाडाने वा आदराने ‘दादा’ असे म्हणतात. अजित पवार हे राज्यातील राजकारणात पक्के मुरलेले नेते आहेत. त्यांची राजकीय दादागिरी केवळ स्वपक्षातील नेतेच नाही, तर विरोधी पक्षातील नेत्यांनाही चांगलीच ठाऊक आहे. म्हणूनच सगळेजण त्यांना वचकून असतात. परंतु अजित पवारांचा राजकीय इतिहास इतका नाट्यमय राहिलेला आहे की, त्यांच्याभोवती नेहमीच एक संशयाचे वलय फिरत असते. अशावेळी अजितदादा थोड्या वेळासाठी जरी कुणाच्या नजरेआड झाले, तरी त्यांच्या सहकार्‍यांच्या पोटात भीतीचा गोळा येतो. असे हे अनप्रेडिक्टेबल दादा मागील ६ दिवसांपूर्वी अचानक गायब झाल्याने राज्यात चर्चांना उधाण आलेे. दादा गेले कुणीकडे? म्हणत माध्यम प्रतिनिधींनी त्यांची शोधाशोध सुरू केली. कुणी म्हणे दादा सासूरवाडीला गेले, तर कुणी म्हणे दादा आपल्या आजोळी गेले. दादांचा कुठेच ठावठिकाणा न लागल्याने दादा नाराज असल्याच्या चर्चांना पेव फुटले. राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडणार की काय अशा शक्यतांना खतपाणी मिळू लागले आणि शुक्रवारी अजितदादा अचानक प्रगटले, तेव्हा कुठे सार्‍यांच्या जीवात जीव आला.

- Advertisement -

मागील ४० वर्षांहून अधिक काळापासून राजकारणात सक्रीय असलेल्या अजित पवारांची आपल्या मतदारसंघासोबत महाराष्ट्राच्या राजकारणावरही मजबूत पकड आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये जलसंपदा मंत्री असताना धरणात पाणी ओतण्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे ते चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आले होते. अर्थात या नकारात्मक प्रसिद्धीचा त्यांना चांगलाच फटका बसला होता, परंतु प्रसारमाध्यम प्रतिनिधी आजूबाजूला असताना कुठे, कधी, काय बोलायचे यावर ताबा मिळवणार्‍या अजित पवारांनी मागील काही वर्षांत आपल्या छबीत खूपच सुधारणा केली. राष्ट्रवादी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये अजितदादा खूपच लोकप्रिय आहेत. सहकारी साखर कारखान्यांचे संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शिक्षण मंडळ, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष ते कृषी, ऊर्जा व नियोजन, पाटबंधारे, जलसंधारण, अर्थ खात्याचा कारभार त्यांनी यशस्वीपणे हाताळून दाखवलेला आहे. याच दरम्यान उपमुख्यमंत्रीपद भूषवत त्यांनी आपला दबदबाही तयार केला. प्रशासकीय अधिकार्‍यांवर वचक आणि प्रचंड कामाचा उरक असल्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्यावर नेहमीच खूश असतात.

काम कुठलेही असो अजित पवारांकडे घेऊन गेले की ते होणारच याची कार्यकर्त्यांना पूर्ण खात्री असते. राजकारणात नेता कुठल्याही पक्षातील असो, वाढत्या अनुभवासोबत त्याच्यातील महत्त्वाकांक्षाही वाढीस लागते. तशी सुप्त महत्वाकांक्षा अजित पवारांच्या मनात उसळ्या मारत असते. पण आपले चुलते, राजकीय गुरू आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे वेळोवेळी अजितदादांना आपल्या या सुप्त महत्त्वाकांक्षाना मुरड घालावी लागते. अजित पवारांचा पक्षात कितीही दबदबा असला, तरी अंतिम निर्णय साहेबांचाच असल्यामुळे अजूनही दादांचे पक्षावर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित होऊ शकलेले नाही. मधोमध सुप्रिया ताईंसोबत पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी खेळ खेळावा लागतो तो वेगळाच. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये एकमेकांना खो देण्याचे प्रकार सुरू असताना दादांनी वेगळाच निर्णय घेतला. आपल्या एक डझनहून अधिक एकनिष्ठ सहकार्‍यांना सोबत घेऊन दादांनी पहाटेच्या अंधारात भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला. त्यानंतर घडलेले राजकीय नाट्य सार्‍या देशाने पाहिले.

- Advertisement -

शरद पवारांनी सारी सूत्रे हाती घेत अशा काही कांड्या फिरवल्या की, एक एक करत सर्व आमदार स्वगृही परतले आणि अखेर अजितदादांनाही आपल्या निर्णयावर पाणी ओतून माघारी फिरावे लागले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच अजितदादांना अर्थ खाते आणि उपमुख्यमंत्रीपद देऊन मान राखण्यात आला. कोरोना संकट आणि त्यानंतरच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारपणाने त्रस्त असताना अजितदादांनी राज्यशकट यशस्वीपणे चालवून दाखवला. अर्थखात्याच्या माध्यमातून कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना रसद पुरवत त्यांनी पक्ष मजबुतीत मोठा हातभार लावला. नेमक्या याच कामात अपयशी ठरलेल्या शिंदे गटातील आमदारांनी अजित पवारांवर बोट ठेवून बंडखोरीचा मार्ग अवलंबला. विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होताच अजित पवारांनी सभागृहात आकडेवारी सादर करून सर्व बंडखोर आमदारांची तोंडे बंद केली आणि शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईच्या मुद्यांवरून सरकारलाही कोंडीत पकडले.

परंतु सरकार अडचणीत येताच कथित सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळ्याची प्रकरणेही आपसूकच वर येताना दिसली. सध्या विरोधी पक्षातील नेत्यांना आव्हान देऊ शकेल असा राष्ट्रवादी पक्षात अजित पवारांसारखा दुसरा नेता नाही. मुख्यमंत्रीपदाची क्षमता असूनही तीन वेळा उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागलेल्या अजित पवारांची अंतर्गत नाराजी हा पक्षासाठी डोकेदुखीचा मोठा विषय आहे. त्यामुळे काका-पुतण्यातील विसंवादाच्या वावड्या असोे किंवा सुप्रिया ताईंबद्दलच्या अपशब्दावर न दिलेली प्रतिक्रिया असो,अजित पवार चर्चेत न राहते तरच नवल. म्हणूनच राष्ट्रवादीच्या शिर्डीतील मेळाव्यातून थेट परदेशात गेलो, आपल्याला खासगी आयुष्य आहे की नाही, हा अनप्रेडिक्टेबल अजितदादांनी केलेला खुलासा मनोमन कुणालाही न पटणाराच वाटतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -