घरसंपादकीयदिन विशेषश्रेष्ठ कवी, कादंबरीकार पु. शि. रेगे

श्रेष्ठ कवी, कादंबरीकार पु. शि. रेगे

Subscribe

पुरुषोत्तम शिवराम रेगे उर्फ पु. शि. रेगे यांचा आज स्मृतीदिन. पु. शि. रेगे हे श्रेष्ठ मराठी कवी, तसेच कादंबरीकार नाटककार, समीक्षक व संपादक होते. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९१० रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिठबाब येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व लंडन येथे बी.ए. व बी.एस्सीपर्यंत झाले. लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी बी.एस्सी. पदवी मिळविली. अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून विविध महाविद्यालयांतून त्यांनी काम केले.

‘सुहृद चंपा’ आणि ‘रूप कथ्थक’ ही दोन टोपण नावे त्यांनी अनुक्रमे साधना आणि इतर कविता (१९३१) यातील कवितांसाठी तर ‘रूपकथ्थक’ हे टोपण नाव रंगपांचालिक आणि दोन नाटके (१९५८) या पुस्तकासाठी घेतली होती. त्यांचे अन्य साहित्य पु. शि. रेगे या नावानेच प्रसिद्ध झाले. काव्य संग्रहानंतर ‘फुलोरा’(१९३७), ‘हिमसेक’(१९४३), ‘दोला’(१९५०), ‘गंधरेखा’(१९५३), ‘पुष्कळा’ (१९६०), ‘दुसरा पक्षी’ (१९६६) आणि ‘प्रियाळ’(१९७२) हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले.‘सावित्री’(१९६२), ‘अवलोकिता’(१९६४), ‘रेणू’(१९७३) आणि ‘मातृका’(१९७८) या रेगे यांच्या चारी कादंबर्‍या काव्यात्म व अर्थगर्भ आहेत.

- Advertisement -

सृजनशक्ती म्हणजेच स्त्रीशक्ती हा त्यांचा कवितेचा प्रधान विषय आहे. जीवनात विविध रूपाने वावरणारी सृजनशक्ती आणि विशेषतः तिचे स्त्रीदेहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या रूपांनी आणि स्त्रीप्रतिमांच्या साह्याने त्यांच्या कवितेत प्रकट होते. त्यांच्या कवितांची इंग्रजी, जर्मन, डॅनिश, स्पॅनिश व चिनी भाषांत भाषांतरे झाली आहेत. कारण त्यांत भारतीय परंपरेतून आलेली स्त्रीविषयक जाणीव आणि या जाणिवेवर झालेले आधुनिकतेचे संस्कार यांचा एक हृद्य मेळ आढळतो. अशा या श्रेष्ठ कवीचे १७ फेब्रुवारी १९७८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -