घरदेश-विदेशधक्कादायक! देशात कर्करोग रुग्णांचे प्रमाणे वाढले, तुमच्या 'या' सवयी ठरतील घातक!

धक्कादायक! देशात कर्करोग रुग्णांचे प्रमाणे वाढले, तुमच्या ‘या’ सवयी ठरतील घातक!

Subscribe

Cancer Patients in India | बॅक्टेरियामुळे देखील कर्करोग होऊ शकतो. लोकांनी डॉक्टरांच्या संपर्कात राहणे, शरीरातील असामान्य लक्षणांची नोंद ठेवणे आणि वेळीच निदान करणं गरजेचं आहे.

Cancer Patients in India | मुंबई – मागील काही वर्षात कर्करोग रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार 2020 ते 2025 या काळात कर्करुग्णांमध्ये १२.८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असून नऊ भारतीयांपैकी एकाला कॅन्सर होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. कर्करोग रुग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेता कर्करोग तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, देशभरात केवळ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार किंवा श्वसनाचे आजारच नाही तर कॅन्सरचे प्रमाणही वेगाने वाढत असून हा एक चिंतेचा विषय ठरत आहे. बदलती जीवनशैली, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव तसेच पर्यावरणीय घटकही कर्करोगास कारणीभूत ठरत आहेत. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने फुफ्फुस आणि तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. वेळीच निदान व उपचार न मिळाल्याने ही समस्या आणखी वाढते. लोकांना कर्करोगाबाबत प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे, जेणेकरून वेळीच निदान व उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. आयसीएमआर-नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च (NCDIR), बेंगळुरू यांनी नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार 2015 ते 2025 पर्यंत सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये 27.7 टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. लहानमुलांमधील (0-14 वर्षे) कर्करोगांमध्ये लिम्फॉइड ल्युकेमिया (रक्त आणि अस्थिमज्जाचा कर्करोग) हे प्रमुख कर्करोग आहेत. 2025 या वर्षात फुफ्फुस आणि स्तनाच्या कर्करोगाची प्रमुख प्रकरणे अनुक्रमे 81,219 आणि 2,32,832 इतकी असतील.

- Advertisement -

हेमॅटो-ऑन्कॉलॉजिस्ट आणि सल्लागार वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुहास आग्रे म्हणाले की, काही घटक जसे की वाढते वय, कौटुंबिक इतिहास, अनुवांशिकता, लठ्ठपणा, तंबाखूचे सेवन, अल्कोहोल, व्हायरल इन्फेक्शन जसे की ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (HPV), रसायने, प्रदूषण, सूर्यप्रकाशातील अतिनील किरण, चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, काही हार्मोन्स हे कर्करोगास कारणीभूत ठरतात. बॅक्टेरियामुळे देखील कर्करोग होऊ शकतो. लोकांनी डॉक्टरांच्या संपर्कात राहणे, शरीरातील असामान्य लक्षणांची नोंद ठेवणे आणि वेळीच निदान करणं गरजेचं आहे.

चेंबूरच्या झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ तनवीर अब्दुल मजीद सांगतात की, भारतात कॅन्सरची प्रकरणे चिंताजनक वेगाने वाढत आहेत. कर्करोग केवळ वृद्ध लोकांवर किंवा प्रौढांनाच नाही तर लहान वयातील तरुणांनाही प्रभावित करत आहे. सर्व कॅन्सरच्या यशस्वी उपचारांसाठी आणि परिणामांसाठी कर्करोग वेळीच ओळखणे आवश्यक आहे. निदान आणि उपचारात उशीर झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण आणि कर्करोगाचे परिणाम होतात. पुरुषांमध्ये भारतातील सर्वात सामान्य कर्करोग म्हणजे डोके आणि मान आणि त्यानंतर फुफ्फुस आणि प्रोस्टेटिक कर्करोग, तर महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग दिसून येतो. सर्वात सामान्यपणे आढळून येणाऱ्या कर्करोगामध्ये फुफ्फुसाची अन्ननलिका आणि कोलोरेक्टल कर्करोग आणि स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोगाचा समावेश आहे. जागरूकता, तपासणी, लवकर निदान आणि त्वरित उपचार हे कॅन्सरच्या यशस्वी उपचाराकरिता महत्त्वाचे घटक आहेत.

- Advertisement -

कर्करोगापासून बचाव करण्यासाठी, तंबाखू आणि मद्यपानाचे सेवन सोडून द्या, संतुलित आहार घ्या, दररोज व्यायाम करा, इष्टतम वजन राखा, सूर्याच्या अतिनील किरणांपासून स्वतःचे संरक्षण करा, हिपॅटायटीस बी, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) साठी लसीकरण करा. असुरक्षित संभोग, पॅसिव्ह स्मोकींग टाळा तसेच संक्रमित व्यक्तींनी वापरलेल्या सुया पुन्हा वापरु नका, नियमित तपासणीसाठी जा, प्रदूषणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. जर एखाद्याला कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असेल, तर लहान वयातच स्क्रिनिंग किंवा चाचण्या करा, असेही डॉ. आग्रे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -