घरपालघरवसईतील बेकायदेशीर शाळा रडारवर

वसईतील बेकायदेशीर शाळा रडारवर

Subscribe

अशा अनधिकृत शाळांत पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ नये असे आवाहन अनेकदा करण्यात येते. मात्र शाळा संचालकांच्या विविध आमिषांना पालक बळी पडतात. वरवरच्या दिखाव्याला भुलून पालकवर्ग विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालत आहेत.

वसईः शिक्षणातून एक सुजाण, प्रामाणिक पिढी घडवण्याचे कार्य त्या शिक्षणाच्या गंगोत्री असलेल्या शाळा करत असतात. मात्र गेल्या काही वर्षांत वसई तालुक्यात अनधिकृत शाळांचे पिकच आले आहे. यावर्षी वसईत एकूण १६ हून शाळांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.अनधिकृत शाळांवरील गुन्ह्यांत पुढील काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरवर्षी अनधिकृत शाळांच्या याद्या जाहीर केल्या जातात. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, या अनधिकृत शाळा निष्कासित करण्याचे स्वारस्य मात्र स्थानिक प्रशासनांकडून दाखवले जात नाही. त्यामुळे नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे. अनधिकृत शाळांच्या याद्या जिल्हा तसेच तालुका स्तरावरील शिक्षण विभागाकडून जाहीर केल्यानंतर नागरिकांनी अशा अनधिकृत शाळांत पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ नये असे आवाहन अनेकदा करण्यात येते. मात्र शाळा संचालकांच्या विविध आमिषांना पालक बळी पडतात. वरवरच्या दिखाव्याला भुलून पालकवर्ग विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालत आहेत.

उच्च न्यायालयाने वसई-विरार शहर महापालिकेला अनधिकृत शाळांसमोर ‘अनधिकृत शाळा’ असे फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने यातील काही शाळांसमोर दर्शनिय भागात ‘अनधिकृत शाळा’ असे फलक लावले होते. मात्र शाळा संचालकांकडून ते काढून फेकून देण्यात आले आहेत. शिक्षण विभाग व महापालिका प्रशासनाने अशा अनधिकृत शाळांविरोधात केवळ दिखावा म्हणून नव्हे तर ठोस कारवाई करायला हवी, असे आवाहन सुज्ञ पालकांनी केली आहे. अनधिकृत चाळींतदेखील शाळा भरवल्या जात आहेत. या अनधिकृत शाळांना परवानगी कशी मिळते? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांचा मुद्दा हा जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी हातात घेतला जातो. मात्र वर्षभर अशा शाळांकडे पाठ फिरवली जाते, असा नागरिकांचा आरोप आहे.वसईत धोकादायक बांधकामात अनधिकृत शाळा सुरू आहेत. वसईत अन्यत्र घडलेल्या अनधिकृत बांधकामांतील दुर्दैवी घटनांनंतर वसईतील अनधिकृत धोकादायक शाळांत हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे. भविष्यात जर एखादी अपरिहार्य घटना घडलीच तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे अनधिकृत शाळांच्या बाबतीत केवळ दिखाव्याचे नव्हे तर ठोस धोरण हाती घेण्याची पालकांची मागणी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -