घरपालघरदापचरी सीमा तपासणी नाक्यावर अतिरिक्त वसुली

दापचरी सीमा तपासणी नाक्यावर अतिरिक्त वसुली

Subscribe

तपासणी नाक्यावर नेहमीच ठाण मांडून बसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे परिवहन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

डहाणू: महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमावर्ती भागात स्थित सीमा तपासणी नाक्यावर कागदपत्र तपासणीच्या नावाखाली ट्रक चालकांकडून अतिरिक्त वसुली होत असून ही देवाण- घेवाणाची प्रक्रिया वाहतूक कोंडी होण्यास जबाबदार ठरत आहे. डहाणू तालुक्यातील दापचरी येथील सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या राज्य परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांच्या हस्तकांकडून एन्ट्रीच्या नावाने पैसे उकळले जात असल्याचे आरोप केले जात आहेत. याबाबतची एक चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाली असून या चित्रफितीत दर्शवल्याप्रमाणे काही हस्तक वाहनाची कागदपत्र जमा करण्यासाठी या तपासणी नाक्यावर नेहमीच ठाण मांडून बसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे परिवहन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दापचरी सीमा तपासणी नाक्यावर वाहनांचे वजन आणि कागदपत्र तपासले जातात. वजन काट्यावरून गाडी पुढे आल्यावर येथे काही लोक उभे राहत असून हे लोक वाहनांची कागदपत्रे घेऊन ती कार्यालयात जमा करतात. पुढे वाहन चालक आपले वाहन बाजूला उभे करून आपली कागदपत्रे घेण्यासाठी गेल्यास तिथे चालकांकडून वाहनांच्या चाकांच्या संख्येनुसार 200 ते 500 रुपये घेतले जातात. या पैशाची कोणत्याही प्रकारची पावती न देता पैसे उकळले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

- Advertisement -

त्याच बरोबर एखादे वाहन आपल्या क्षमतेपेक्षा अधिक वजन घेऊन प्रवास करताना आढळल्यास त्याच्यावर शासकीय नियमानुसार कारवाई न करता काही ठराविक रक्कम घेऊन वाहन सोडण्याचे प्रकार करण्यासाठी इतर काही दलाल मंडळी या तपासणी नाक्याजवळ हिंडत फिरत असतात असा आरोप देखील करण्यात येत आहे. त्यामुळे दापचरी तपासणी नाका हा अधिकारी, कर्मचारी व तळीरामांसाठी पैशाचे कुरण ठरले आहे. या संदर्भात परिवहन विभागाचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके यांच्याशी संपर्क साधला असला त्यांनी असे प्रकार घडत नसल्याचे सांगितले आहे. तसेच मालवाहू वाहनांकडून अतिरिक्त पैशाची मागणी केल्यास कार्यालयात तक्रार करण्याची सुविधा असल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र समाज माध्यमांवरील चित्रफितीबाबत तसेच घडणार्‍या प्रकाराबाबत अधिक भाष्य करण्याचे टाळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -