Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय ओपेड लालपरीकडून ग्रामीण गरीब प्रवाशांची उपेक्षाच!

लालपरीकडून ग्रामीण गरीब प्रवाशांची उपेक्षाच!

Subscribe

एसटीकडे शिवाई किंवा अन्य आरामदायी बस आल्या म्हणजे एसटीने कात टाकली असा समज बहुधा वरिष्ठ अधिकार्‍यांनी केला असावा. यामुळे या अधिकार्‍यांचे ग्रामीण सेवेकडे दुर्लक्ष झाले आहे. ग्रामीण भागाकडे एसटीच्या लाल गाडीला ‘लाल परी’ म्हणण्याची पद्धत आहे. ‘परी’ ही कवी कल्पना असल्याने एसटीच्या गाडीला ‘परी’ का म्हणतात, हे अनेकांना न उलगडलेले कोडे आहे. कवी कल्पनेतील ‘परी’ टापटीप असते. ग्रामीण भागातील एसटीची चकाचक गाडी दाखवा आणि अमूक-तमूक रक्कम जिंका, अशी जर स्पर्धा ठेवली तर अर्थात प्रवासीच ती रक्कम जिंकणार आहेत.

शहरी भागासाठी एसटीकडून शिवाई किंवा शिवनेरीच्या गोष्टी होतात तेव्हा ग्रामीण भागात डबा झालेल्या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दामटविण्यात येतात. खुळखुळा झालेली गाडी किंवा बस नियोजित ठिकाणी पोहचेल की नाही, असे वाटावे इतकी तिची अवस्था वाईट असते. त्यामुळे ग्रामीण प्रवासी आज खासगी वाहने किंवा रिक्षा, ईकोसारख्या परवानाधारक वाहनांकडे वळत आहे. याचा फटका एसटीच्या तिजोरीला बसत असला तरी त्यात सुधारणा होत नाही.

एसटीच्या ताफ्यात साडेसोळा हजाराहून अधिक विविध प्रकारच्या बस असून, १४ हजाराहून अधिक बस दररोज प्रवाशांच्या सेवेत वापरल्या जातात. कोरोनाच्या काळापूर्वी ६० ते ६५ लाख प्रवासी दररोज प्रवास करीत होते. आता ही संख्या ५५ ते ५८ लाखांवर आली आहे. एसटीला खासगी प्रवासी वाहतुकीचे मोठे आव्हान असताना ‘ठेवीले अनंते तैसेची रहावे’ अशी एसटी प्रशासनाची मानसिकता असल्याचे जाणवते. प्रवाशांचा आजही एसटीवर विश्वास आहे. पण एसटी प्रशासनाकडून याला महत्त्व दिले जात नाही. शहरी भागात अलिशान किंवा वातानुकूलित बस धावल्या म्हणजे प्रशासनाची जबाबदारी संपते. आजमितीला तेथेही खासगी वाहतूकदारांनी एसटीसमोर आव्हान उभे केले आहे. अनेकदा एसटीपेक्षा अधिक भाडे मोजून प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत आहेत. हे प्रवासी आपल्याकडे पुन्हा वळविण्यासाठी एसटी प्रशासन फारसे गांभीर्य दाखवत नाही ही वस्तुस्थिती आहे. गाजावाजा करीत नवीन बस ताफ्यात आल्या की प्रशासन निर्धास्त होते.

- Advertisement -

अर्थात ग्रामीण भागाला नव्या गाड्यांचा लाभ फार क्वचित होत असतो. जुन्या झालेल्या बस योग्य देखभाल आणि दुरुस्तीशिवाय वापरण्यात येतात. महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागात एसटीची ही रडकथा आहे. बस कुठे रस्त्यात ‘मुक्काम’ करेल याचा भरवसा नसतो. आज एसटीकडे सुट्या भागांची प्रचंड कमतरता आहे. एका बसचा पार्ट दुसर्‍या बसला लावून ती चालू ठेवली जाते. चालकही याला वैतागलेले आहेत. दुर्गम भागात खिळखिळी झालेली बस चालविणे चालकांना जोखमीचे वाटते. वाटेत टायर पंक्चर होणे, एखादा पार्ट निकामी होणे हे दुष्टचक्र कायम आहे. अनेक वेळा असे होते की पार्टअभावी दुरुस्ती रखडल्याने फेर्‍याही रद्द कराव्या लागतात.

सर्व बाजूने सक्षम असणारी एसटी आजही का अडखळते, हे न उलगडलेले कोडे आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे एसटीचे नुकसान झाले हे त्रिवार सत्य आहे. एसटी प्रवासाचा काडीचा किंवा फारसा अनुभव नसलेले मुंबई सेंट्रलमधील अलिशान कार्यालयातून एसटीचा गाडा हाकत असतात. पूर्वी महामंडळाप्रमाणे विभागवार समित्यांमध्ये एसटी सेवेचा अनुभव असलेल्यांची वर्णी लागत असे. आता ही पद्धत अनाकलनीयरित्या बंद झाली आहे. एसटीला स्पर्धेत टिकवायचे असेल तर ही पद्धत पुन्हा सुरू केली पाहिजे. अलीकडच्या काळात मंत्री बदलले की एसटीत नवे प्रयोग सुरू करण्याची प्रथा पडली आहे.

- Advertisement -

गाड्यांची नावे बदलली, रंग बदलला म्हणून दररोज कोट्यवधींची उलाढाल करणार्‍या एसटीने कात टाकली असे होत नाही. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी कल्पकता दाखविली जात नाही. ज्यांच्या भरवशावर एसटीचा डोलारा उभा आहे त्या प्रवाशांनाच दुय्यम वागणूक देण्याची पद्धत घातक आहे. अनेक कर्मचारी प्रवाशांशी उद्धट वर्तन करतात. नव्याने भरती झालेले असे अनेकजण दाखविता येतील की ‘सौजन्या’शी त्यांची गाठभेटच झालेली नसावी. प्रवाशांवर आपण उपकार करतोय असे त्यांचे वर्तन असते. हा प्रकार मुंबई सेंट्रलच्या कार्यालयातून बाहेर पडून सामान्य प्रवासी बनून अधिकार्‍यांनी अनुभवला पाहिजे आणि मुजोर कर्मचार्‍यांवर कायमचा वचक बसेल अशी कारवाई झाली पाहिजे. अशिक्षित किंवा निरक्षर प्रवाशांशी उद्धट वर्तन केले जाते तेव्हा या प्रवाशांची अवस्था केविलवाणी होते.

अलीकडे एसटीकडून ‘जलद’चा फंडा वापरला जातो. यात ग्रामीण प्रवाशांचे कमालीचे हाल होत असतात. जलद बस रिकामी असली तरी त्यात प्रवाशांना जलदचे कारण देऊन नाकारले जाते. फार थोडेच चालक आणि वाहक सौजन्याने वागून जलद बस असली तरी मधल्या थांब्यांवर थांबून प्रवाशांना दिलासा देतात. या तथाकथित जलद सेवेमुळे प्रवाशांअभावी एसटीच्या अनेक फेर्‍या मोडीत काढाव्या लागल्या आहेत. अनेकदा चालक-वाहकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असतो म्हणून ते नियोजित ठिकाण लवकरात लवकर गाठण्यासाठी थांबे पर्यायाने प्रवासी टाळतात. यावर तक्रारी झाल्या तरी चाकोरीबद्ध कारवाईमुळे कर्मचार्‍यांना भय वाटत नाही.

जलदप्रमाणेच निमआरामच्या सेवेखाली प्रवाशांची फसवणूक आणि लुबाडणूक केली जात आहे. टुकार दर्जाच्या या निमआराम बसना दीडपट भाडे मोजावे लागते. याच बसमधील आसनांप्रमाणे काही वेळेला लाल बसमधील आसने असली तरी केवळ रंग बदलला म्हणून नेहमीचे भाडे घेतले जाते. एशियाड किंवा हिरकणीचा एक विशिष्ट रंग असतो म्हणून भाडे वाढते हा अजब प्रकार आहे. गर्दीच्या वेळी निमआराम बस सोडणे, त्यात वाट्टेल तितके प्रवासी कोंबणे, प्रत्येक थांबा घेणे हा प्रकार वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कृपेने सुरू आहे. यावर कुणीही काही बोलत नाही. निमआराम बसमुळे ग्रामीण प्रवाशांना आर्थिक भुर्दंड पडत असताना त्यांचे नेते मात्र एसटीच्या अधिकार्‍यांना जाब विचारत नाहीत. नेते आणि एसटीचा प्रवास हे समीकरण परस्पर विरोधी असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे चूकच आहे म्हणा!

गाजावाजा करून एसटीच्या ताफ्यात आणलेली शिवशाही बस येनकेन कारणाने कित्येकदा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या बसमधून केवळ नाईलाज म्हणून प्रवास करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करतात. बर्‍याचशा बसमधील वातानुकूलित यंत्रणा धडपणे चालत नाही. बसमध्ये थंडपणा जाणवत नसल्याने कोंडल्यासारखे होते ही अनेक प्रवाशांची तक्रार आहे. परंतु कोणतीही दुरुस्ती वेळेत करण्याऐवजी या बस धावडवत ठेवलेल्या असतात. या बसमधूनही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतले जातात. बसच्या प्रतीक्षेत ताटकळत असलेला प्रवासी या बसमधून नाईलाजास्तव उभ्याने प्रवास करतो. खरं तर ग्रामीण भागातील प्रवाशांचीही शिवशाहीला पसंती असते.

पण महागडे तिकीट काढून आरामदायी प्रवास होणार नसेल तर आपली साधी बस परवडली ही प्रवाशांची प्रतिक्रिया बोलकी आहे. प्रवाशांकडून शिवशाहीला असलेली पसंती लक्षात घेऊन ही सेवा सक्षमपणे चालविण्याची गरज आहे. दुर्दैवाने तसे होत नाही. एसटीकडे नवी बस आली तर तिची अक्षरशः दमछाक होईपर्यंत तिला वापरात ठेवली जाते. यात दुरुस्ती होत नाही. त्यात बहुतांश चालकांची बस चालविण्याची पद्धत भन्नाट प्रकारातील असल्याने नव्या बसचा खुळखुळा होण्यास वेळ लागत नाही. यातून बस कुठेही वाटेत बंद पडते. यातून प्रवासी आणि वाहक-चालकांत हुज्जतीचे प्रसंग उद्भवतात. अनेकदा असे होते की प्रवाशांना हिरकणीचे तिकीट काढून साध्या बसचा प्रवास करावा लागतो. ब्रेकडाऊन होणार्‍या शिवशाहीचे प्रवासीही काही वेळा लाल बसमधून रवाना केले जातात.

‘वाट पाहेन पण एसटीनेच प्रवास करेन’ अशी जाहिरातबाजी काही वर्षांपूर्वी एसटीने केली. त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. पण सुस्थितीत नसलेल्या स्थानकांमध्ये उभे राहून अपेक्षित बसची प्रतीक्षा करण्याऐवजी कुठेतरी हमरस्त्यावर जाऊन अन्य वाहन पकडणे परवडले, अशी प्रवाशांची अवस्था होते. एसटीची स्थानके भंगार अवस्थेत आहेत. काही महिन्यांपासून एसटी स्थानकातील आणि स्वच्छतागृहातील ‘स्वच्छते’चे मोबाईलवर फोटो काढून ते विभागीय कार्यालयाकडे पाठविले जात आहेत. यातून कोणता मोठा असा उजेड पडणार, हे त्या वरिष्ठ अधिकार्‍यांनाच ठाऊक! बर्‍याच स्थानकांतील इमारतींची दुरवस्था झालेली आहे.

कर्मचार्‍यांसाठी धड विश्रांती कक्ष नाहीत. प्रसाधनगृहांची अवस्था वर्णनापलीकडील आहे. पिण्याच्या पाण्याची सोय अनेक स्थानकांतून नाही. आवारात दगड-धोंडे आणि खड्ड्यांचे साम्राज्य आहे. एखादी बस आली की धुळीचा लोट तयार होतो, तसेच टायरखालून काहीवेळेला दगड बंदुकीच्या गोळीसारखा सुसाट उडून एखाद्या प्रवाशाच्या अंगावर येतो. काही स्थानकांतून धडपणे दिवाबत्तीची सोयही नाही. भरमसाठ भाडे आकारणी होत असल्याने एसटीच्या कँटिनना टाळे लागले असून, हमरस्त्यावरील हॉटेल मालकांचे पोट भरले जात आहे. यात मोठी आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याचा आरोप होत आहे. यावरही कुणी बोलत नाही.

लोकप्रतिनिधी हायटेक झाल्याने त्यांनी एसटीशी ‘कट्टी’ घेतली आहे. त्यामुळे त्यांना प्रवाशांच्या हालआपेष्टांचे काहीएक देणेघेणे नाही. परिणामी बसच्या टायरखालून उडणार्‍या दगडाप्रमाणे अधिकारी आणि कर्मचारीही ‘सुसाट’ आहेत. त्यामुळे बसही सुसाट (!) पळताहेत. एसटीमध्ये अमूलाग्र परिवर्तन घडेल तो सुदिन!

लालपरीकडून ग्रामीण गरीब प्रवाशांची उपेक्षाच!
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -