घरमनोरंजनमैं और मेरा बायोपिक...

मैं और मेरा बायोपिक…

Subscribe

चरित्रपटात थेट प्रसंगांची साखळी समोर येत असल्याने कल्पनेला पुरेसे स्थान नसते. मात्र, त्यातून सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आक्षेपार्ह, चुकीचे, तर्कहिन, व्यक्तीकेंद्रित, भडक, अवास्तव घटना-घटकांना इतिहास म्हणून पाहण्याचा धोका निर्माण होतो. वास्तववादी कलाकृती इतिहासात रमणे प्रेक्षकांनाही अनेकदा नकोच असते. आपल्या मनात ठाण मांडलेल्या विचारांना पूरक विचारांचे स्पष्टीकरण प्रेक्षक बायोपिकमधून कळत-नकळत शोधत असतो. हा असा प्रेक्षकांना साजेसा परिणाम साध्य झाल्यावर ते चरित्रपटाचे यश मानले जाते. हा अत्यंत चुकीचा पायंडा पडत असल्याचे चित्र हिंदी पडद्यावर आजपर्यंत साकारलेल्या अनेक चरित्रपटातून अनेकदा स्पष्ट झाले आहे. आपल्याकडे अस्मिता, व्यक्तीकेंद्रित इतिहासाचा प्रभाव मोठा आहे. बायोपिकचे हे माध्यमही त्याच मार्गाने जात आहे.

नव्या वर्षात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका आहेत. सोशल मीडिया, इंटरनेट, डिजिटल माध्यमांमुळे राजकीय प्रचारतंत्र झपाट्याने बदलत आहे. इंटरनेटचे माध्यमही त्यासाठी आता कमी पडत असल्याने सिनेमाचे मोठे पडदेही राजकीय भूमिका मांडण्यासाठी व्यापले जात आहेत. प्रेक्षक हा आता वैचारिक इन्व्हेस्टमेंटचे साधन असल्यासारखी परिस्थिती राजकीय आणि आर्थिक जगात अलिकडच्या माहिती तंत्रज्ञानाच्या आणि जागतिकीकरणानंतर निर्माण झाली. मागील २०१८ हे वर्ष बायोपिकने गाजवले, येणारे वर्षातही अनेक चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षातील निवडणुकांचे वातावरण पाहून राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या चरित्रपटांनी पडदा व्यापलेले नवे वर्ष असणार आहे.

- Advertisement -

सिनेमाचा पुस्तकांपेक्षा मोठा प्रभाव असतो तर वाचनात वाचकाच्या कल्पनाशक्तीला आव्हान दिले जाते. त्यामुळे आत्मचरित्रपर पुस्तकांचा प्रभाव जरी संथ असला तरी तो दीर्घकाळ टिकणारा असतो. इथं परिस्थिती, प्रसंग समजून घेण्याचे आकलन करण्याची जबाबदारी त्या वाचकावर असते. चरित्रपटात थेट प्रसंगांची साखळी समोर येत असल्याने कल्पनेला पुरेसे स्थान नसते. मात्र, त्यातून सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आक्षेपार्ह, चुकीचे, तर्कहिन, व्यक्तीकेंद्रित, भडक, अवास्तव घटना-घटकांना इतिहास म्हणून पाहण्याचा धोका निर्माण होतो. वास्तववादी कलाकृती इतिहासात रमणे प्रेक्षकांनाही अनेकदा नकोच असते. आपल्या मनात ठाण मांडलेल्या विचारांना पूरक विचारांचे स्पष्टीकरण प्रेक्षक अशा बायोपिकमधून कळत-नकळत शोधत असतो. हा असा प्रेक्षकांना साजेसा परिणाम साध्य झाल्यावर ते चरित्रपटाचे यश मानले जाते. हा अत्यंत चुकीचा पायंडा पडत असल्याचे चित्र हिंदी पडद्यावर आजपर्यंत साकारलेल्या अनेक चरित्रपटातून अनेकदा स्पष्ट झाले आहे. आपल्याकडे अस्मिता, व्यक्तीकेंद्रित इतिहासाचा प्रभाव मोठा आहे. बायोपिकचे हे माध्यमही त्याच मार्गाने जात आहे.

रिचर्ड अ‍ॅटनबरोंच्या ‘गांधी’ चित्रपटात बेन किंग्जले यांनी साकारलेली गांधीजींची भूमिका गाजली. हा तोच अभिनेता ज्याने हिंदी पडद्यावर अमिताभसोबत दहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘तीन पत्ती’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. महात्मा गांधीजींची भूमिका मोहन गोखले, दिलीप प्रभावळकर अशा अनेकांनी पडद्यावर त्यानंतर साकारली. मात्र, पडद्यावरचे गांधी म्हटले तर बेनच आठवतो. गांधीजींचे उतारवयात पुढील एकदोन दात निखळल्याचे सांगितले जाते. त्यासाठी बेननंही त्याचे पुढील दात काढून टाकले होते. या चित्रपटात डॉ. आंबेडकर आणि गांधीजी यातील पुणे कराराचा प्रसंग जाणीवपूर्वक गाळला होता. माझ्या सिनेमाचे नायक महात्मा गांधीजी असल्याने गांधी आणि आंबेडकर यांच्यातील वैचारिक संघर्षातील विरोधी भूमिका मी जाणीवपूर्वक पडद्यावर येऊ दिली नाही, असे चित्रपटाबाबत अ‍ॅटनबरोने स्पष्ट केले होते. राज्य आणि केंद्र सरकारची निर्मिती असलेल्या जब्बार पटेलांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटावरही टीका झाली होती. डॉ. आंबेडकरांच्या विविध आंदोलनात त्यांची न्यायालयासमोरील साक्ष किंवा न्यायालयात सामाजिक मुद्यांवर कायदेशीर लढाई लढणारे बॅरिस्टर आंबेडकर चित्रपटात नव्हते. मात्र तरीही हा चित्रपट महत्त्वाचा होताच. या चित्रपटांतील पुणे कराराचा मुद्दा त्यावेळच्या राजकीय निवडणुकीत आरोप- प्रत्यारोपातून गाजला होता.

- Advertisement -

गांधीजींसोबतचा पुणे करारातील संघर्ष सौम्य दाखवल्याचा आरोप करण्यात आला होता. महाराष्ट्रातील मोठे नेते शरद पवार यांनी या चित्रपटासाठी जब्बार पटेल यांचे नाव सुचवले असल्याच्या बातम्या त्यावेळी आल्या होत्या. तर राज्यातील दलित आणि आंबेडकरवादी नेत्यांनी शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत श्याम बेनेगल यांच्याकडे दिग्दर्शनाची धुरा सोपवण्याविषयी सुचवले होते. मात्र चित्रपट बनवला तो पटेल यांनीच आणि तो गाजलाही. या चित्रपटावरून निर्माण झालेल्या राजकीय मतभेदांमुळे पटेल यांनी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर नाराजी व्यक्त केली होती. चित्रपटासाठी वसंत मून, य.दि. फडके, श्याम बेनेगल यांनी रिसर्च टीमचे काम पाहिले होते. माहिती तंत्रज्ञानाचा व्याप दोन दशकांपूर्वी आजच्या तुलनेत एवढा नसल्याने ज्याला आजच्या भाषेत चित्रपटाचे प्रमोशन म्हटले जाते, तो प्रकार बळावला नव्हता. त्यानंतर काही मोजक्याच राजकीय नेत्यांवरील चित्रपट आले होते.

त्यातला श्याम बेनेगल दिग्दर्शित सरदार पटेलांवरील ‘सरदार’ हा चरित्रपट महत्त्वाचा होता. त्यावेळी पटेल यांच्या राष्ट्रीय एकतेच्या संकल्पनेला आजच्याइतके ‘उंच’ असे राजकीय स्वरुप नव्हते. नेताजी सुभाषचंद्र बोस-द फरगटन हिरो हा चित्रपट श्याम बेनेगल यांच्या दिग्दर्शनातून साकारला गेला. नेताजींच्या बेपत्ता होण्याचे किंवा मृत्यू झाल्याबद्दलच्या शक्यतेचे गूढ यावर बंगाली भाषेत गुमनामी नावाच्या चित्रपटाची घोषणा दोन दिवसांपूर्वी झाली. बोस यांच्या कथित मृत्यूबाबत तर्क वितर्क आजही काढले जात आहेत. या गूढतेबाबत काँग्रेसच्या तत्कालीन राजकीय नेत्यांवर आजही टीका होते किंवा हा विषय राजकीय चर्चेचा होतो.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चित्रपट साकारण्याचे स्वप्न सुधीर फडके यांनी पाहिले होते. ते त्यांनी ‘विनायक दामोदर सावरकर’ या नावाने निर्मित झालेल्या चित्रपटातून पूर्णही केले. काँग्रेसमधील काही नेत्यांनी या विषयावरून त्यावेळीही चित्रपटाला विरोध केला होता. या चित्रपटातूनही काँग्रेस आणि सावरकर यांच्यातील गांधीजींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या तत्कालीन आरोप प्रत्यारोपाच्या विषयाला बगल देण्यात आली होती. हाच प्रकार ‘हे राम’ नावाच्या कमल हासनच्या सिनेमाबाबत झाला. गांधीजींच्या विचार किंवा प्रतिमेचा व्यक्तीरेखा म्हणून वापर झालेले सिनेमे कायम वादाचा विषय ठरले. त्यात ‘मैने गांधी को नही मारा’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ ही अलिकडची उदाहरणे. सर्किट किंवा मुन्नाभाईच्या तोंडी असलेल्या महात्मा गांधीजींच्या एकेरी उल्लेखामुळे तुषार गांधी, काँग्रेस तसेच काही गांधीवादी नेत्यांनी ‘लगे रहो…’ला सुरुवातीला विरोध केला होता. मात्र चित्रपट पाहिल्यावर हा विरोध मावळला.

असाच प्रकार अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘बाजीराव मस्तानी’बाबतही झाला होता. पुण्यातील पेशव्यांच्या वंशजांनी संजय लीला भन्साळीला विरोध करून बाजीराव यांच्यावर चित्रित ‘मल्हारी’ गाण्यातील नृत्य आणि शब्दांना विरोध केला. मात्र चित्रपट पाहिल्यावर हा विरोधही कमी झाला. या आणि अशा प्रकारातून सामाजिक आणि राजकीय अशी नवी सेन्सॉरशिपच बळावत गेली. आधी आम्हाला चित्रपट दाखवा, मग प्रदर्शित करा, असं बोलून समूह रस्त्यावर उतरून आंदोलने करू लागला. ‘मणिकर्णिका’, ‘पद्मावत’ या चरित्रपटांना करणी सेनेचा झालेला विरोध हा तसाच प्रकार होता.

भाग मिल्खा भाग चित्रपटांत स्वातंत्र्यकाळातल्या भारत-पाक फाळणीचे संदर्भ होते. त्यामुळे तत्कालीन दंगलीच्या परिस्थितीचे संदर्भ त्यात होते. पाकिस्तानमध्ये ‘फ्लाईंग जट’च्या या चरित्रपटाला विरोध होणारच होता, तसा तो झालाही. मिल्खा सिंगची व्यक्तीरेखा साकारणार्‍या फरहानचे वडील लेखक जावेद अख्तर यांनी हा विरोध राजकीय स्वरुपाचा असल्याचे स्पष्ट केले होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चरित्रपट ‘ठाकरे’ मागील आठवड्यातच प्रदर्शित झाला. रिडल्स प्रकरण, नामांतराच्या प्रश्नावरून निर्माण झालेला वाद असे वादग्रस्त प्रसंग चित्रपटाच्या पहिल्या भागात नव्हते. तर शिवसेनेशी गद्दारी करणार्‍यांना बाळासाहेबांच्या चित्रपटामध्ये स्थान नसल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले. या चित्रपटानंतर ठाण्यातील आनंद दिघेंच्या जीवनावरही धर्मवीर नावाच्या मराठी चित्रपट येणार असल्याची घोषणा केदार दिघे यांनी केली. दुसरीकडे ‘ठाकरे’च्या आठवड्याभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ला काँग्रसने विरोध केला. तथ्यांचा विपर्यास करून केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारचा हा काँग्रेसविरोधी अजेंडा असल्याचा आरोप या चित्रपटावर आणि चित्रपट ज्या पुस्तकावर आधारीत आहे त्याचे लेखक संजय बारू यांच्यावर करण्यात आला. तर केवळ व्यावसायिक दृष्टीने हा चित्रपट बनवल्याचा आरोप काँग्रेस समर्थकांनी केला. या सर्व वादंगात स्वतः डॉ. मनमोहन सिंग यांनी मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. सआदत हसन मंटोचं वादळी जगणं नवाजुद्दीनने नंदिता दास दिग्दर्शित मंटोतून समोर आणलं.

मंटोचं आजूबाजूच्या परिस्थितीवरून मांडलेलं आहे तसं जगणं लिहिणं तुम्हाला सहन होणार नसेल तर तुमचा समाज हासुद्धा बिलकूल सहन करण्यासारखा नाही. असं मंटोनं या चित्रपटातूनही समाजाच्या आजच्या आणि तत्कालीन ठेकेदारांना फटकारलं. पुलं देशपांडेंच्या ‘भाई’ चित्रपटाचा वाद अलिकडचा. त्यातून पुन्हा सिनेमॅटिक लिबर्टी आणि प्रेक्षकांची संकुचित भूमिका यातला वाद पुन्हा समोर आला. शहीद भगतसिंह यांच्यावर तर दशकभरापूर्वी एकाच वर्षी पाच बायोपिकचं अमाप पीक आलं होतं. मनोज कुमारच्या भगतसिंह नंतर अजय देवगणने साकारलेले भगतसिंह लक्षात राहिले. यंदाच्या वर्षीही अनेक नेत्यांवर, मोठ्या व्यक्तिमत्वांवर बायोपिक येणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बायोपिक समोर आणून राजकीय उद्दिष्टे त्यातून साध्य केली जाणार आहेत. मात्र, ‘मला जसं पडद्यावर दाखवलं जातंय मी तसा नाही किंवा मी त्याहून किती वेगळा आहे’ असं निक्षून सांगायला या चरित्रपटातील बरेचसे ऐतिहासिक नायक आज नसतील…

पडद्यावरचं अमाप बायोपीक
संजू,(संजय दत्त), फर्जंद (कोंडाजी फर्जंद), भाई कोतवाल (शहीद भाई कोतवाल), डॉ. आनंदी गोपाळ (डॉ. आनंदी जोशी), डॉ. प्रकाश आमटे ( डॉ. प्रकाश आमटे), रमाबाई आंबेडकर (रमाई), एन.टी.रामा राव (एनटीआर), सुपर ३० (आनंद कुमार), तानाजी (नरवीर तानाजी मालुसरे), सत्यशोधक (महात्मा फुले), स्वातंत्र्यवीर (स्वातंत्र्यवीर सावरकर), सायना (सायना नेहवाल), दादा (दादा कोंडके) या शिवाय अंतराळवीर राकेश शर्मा, गड चढून जाणारी हिरकणी आणि नागराज मंजुळेंचा फुटबॉलपटू विजय बारसे यांच्यावरील ‘झुंड’ चित्रपट येणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही बायोपिक लवकरच पडद्यावर येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -