घरक्रीडाआम्ही कोणत्याही देशावर बहिष्कार टाकू शकत नाही !

आम्ही कोणत्याही देशावर बहिष्कार टाकू शकत नाही !

Subscribe

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत, अशी भावना व्यक्त केली जात होती, तसेच मे महिन्यात इंग्लंडमध्ये सुरू होणार्‍या क्रिकेट विश्वचषकात भारताने पाकिस्तानशी सामना खेळू नये, अशी मागणी होत होती. या सामान्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या कार्यकारी समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी आपण या सामन्याचा निर्णय भारत सरकारशी चर्चा केल्यानंतरच घेऊ, असे म्हटले होते, तसेच त्यांनी आपण आयसीसीकडे दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या देशांवर बहिष्कार टाकण्याची मागणी करणार असल्याचेही सांगितले होते. मात्र, आता आम्हाला कोणत्याही देशावर बहिष्कार टाकण्याचा अधिकार नाही, असे आयसीसीने बीसीसीआयला सांगितले आहे.

आयसीसीच्या अध्यक्षांनी हे स्पष्टपणे सांगितले आहे की, एखाद्या देशावर बहिष्कार टाकण्याबाबतचा निर्णय हा त्या देशाच्या सरकारने घेतला पाहिजे आणि आयसीसीला कोणत्याही देशावर बहिष्कार टाकण्याचा अधिकार नाही. बीसीसीआयला या गोष्टीची माहिती होती, पण तरीही त्यांनी याबाबत विचारणा केली, असे बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने सांगितले.

- Advertisement -

बीसीसीआयने याबाबत आयसीसीला एक पत्र लिहिले होते. मात्र, या पत्रात पाकिस्तानचा उल्लेख करणे बीसीसीआयने टाळले होते. दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या देशांवर बहिष्कार टाकण्याबाबत शनिवारी झालेल्या आयसीसीच्या बैठकीत चर्चा झाली. ही बैठक आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याच अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत बीसीसीआयच्यावतीने सचिव अमिताभ चौधरी उपस्थित होते.

भारत आणि पाकिस्तानमधील विश्वचषकाचा सामना १६ जूनला होणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने हा सामना खेळू नये, अशी मागणी भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली, मोहम्मद अझरुद्दीन तसेच हरभजन सिंग यांनी केली होती. मात्र, भारताने जर पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळला नाही, तर यात नुकसान भारताचेच आहे, असे मत महान फलंदाज सुनील गावसकरांनी व्यक्त केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -