घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटनिवडणूक आणि बायोपिक

निवडणूक आणि बायोपिक

Subscribe

अहो बाबा, एकदाच विचारतो, पुन्हा विचारणार नाही…मी बायोपिकला चाललोय, तुम्ही येताय का?…बाळूने बाबांना विचारलं.

…बाबांनी पेपरमध्ये खुपसलेलं तोंड बाहेर काढलं…आणि इतकंच विचारलं, बायोपिक ही काय भानगड आहे?…

- Advertisement -

…बाळू म्हणाला, कोणत्या काळात राहता बाबा?…तुम्हाला बायोपिक माहीत नाही?…

…काळाची फुटपट्टी लावून आम्हाला वेड्यात जरूर काढ…पण बायोपिक म्हणजे काय ते आधी सांग, बाबा म्हणाले…

- Advertisement -

…काय बाबा तुम्ही पण, निवडणुकीच्या बातम्या डोळे फाडफाडून वाचता…आणि बायोपिक तुम्हाला माहीत नाही?…बाळूने काहीसं कुत्सितपणे विचारलं…

…अरे निवडणुकीचा आणि तुझ्या ह्या बायोपिकचा काय संबंध?…बाबांनी फणकार्‍याने विचारलं…

…हल्ली बायोपिकशिवाय निवडणूक साजरी होत नाही, कळलं काय!…बाळूने बाबांच्या सामान्य ज्ञानाची धज्जी उडवली…

…अहो बाबा, आता निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पक्षाच्या महापुरूषांवर सिनेमा काढतात, त्याला बायोपिक म्हणतात…बाबांच्या सामान्य ज्ञानाची आणखी फिरकी न घेता सरळ बाळूनेच सगळा उलगडा केला…

…पण तरीही सिनेमाचा आणि निवडणुकीचा मुळात संबंधच काय?…बाबांनी बाळूच्या जमान्याची जवळ जवळ टिंंगल करतच विचारलं…

…आम्ही लोक तुमच्या काळातल्यासारखे भिंती रंगवत नाही बसलो निवडणूक आली की…आता बाळूनेसुध्दा बाबांची टिंगल करायला सुरूवात केली…

…आता तुम्ही काय भिंंती रंगवणार आणि पोस्टर चिकटवणार?…आमच्या काळातल्या शेषननीच त्याच्यावर बंदी आणून तुमची चांगली पाचर मारून टाकली!…बाबांनी शेराला सव्वा शेर टिंगल केली…

…म्हणूनच तर आम्ही निवडणुकीच्या आधी बायोपिक तयार करायला सुरूवात केली…बाळूने तोडीस तोड जबाब दिला…

…आम्हाला बायोपिक काढायची गरज नाही भासली…आमच्या काळात नेतेच तसे मातब्ब्रर होते, एक सभा घेतली की लोकांचं मतपरिवर्तन करायची ताकद होती त्यांच्यातं…बाबांनी बाळूच्या मर्मावरच बोट ठेवलं…

…आम्हाला अशा सभा घ्यायची गरज वाटत नाही…आम्ही एक बायोपिक टाकला की अर्ध पब्लिक सभेला जायचीसुध्दा तसदी घेत नाही, ते डायरेक्ट मतदानाच्या दिवशी खाली उतरतं…बाळूने बाबांचा मुद्दा निकालात काढला…

…तुझ्या त्या एखाद्या बायोपिकमुळे हे कसं काय होणं शक्य आहे?…ह्या थापा दुसर्‍याला जाऊन मार…बाबांनी त्याची साफ चेष्टा केली…

…बाबा, आमच्या काळात हा जो बायोपिक होतो ना, तोच मुळी महान नेत्यांवर होतो, कुणा ऐर्‍यागैर्‍यावर होत नाही…बाळू बाबांना खिजवत म्हणाला…

…खरंय तुझं म्हणणं, पण तुझ्या काळात होणारे हे सगळे बायोपिक आमच्या काळातल्या महान नेत्यांवर होतात…तुझ्या काळातल्या नेत्यांवर होत नाहीत, कळलं काय!…बाबांनी बाळूला नव्व्याण्णववर एलबीडब्ल्यू केलं…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -