घरमहाराष्ट्रकाँग्रेसचे नाराज कार्यकर्ते ठरवणार रायगडचा खासदार

काँग्रेसचे नाराज कार्यकर्ते ठरवणार रायगडचा खासदार

Subscribe

रायगड जिल्ह्यात कोणत्याच पक्षाचे पूर्णपणे वर्चस्व नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तरी युती आघाडी करावी लागते. रायगड जिल्ह्यात कोण कुणाशी कधी मैत्री करेल हे सांगता येत नाही. वरवर युती-आघाडी झालेली असली तरी प्रत्यक्षात वेगळेच असते. रायगड हा गूढ राजकारणाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. यंदाची लोकसभा निवडणूक कोण जिंकेल हे आत्ताच सांगणे धाडसाचे ठरेल. या लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अनंत गीते विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्यात होणारी लढत चुरशीची होईल. महाआघाडी असली तरी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. ते कुणासोबत जातील हे गूढ आहे. काँग्रेसचे नाराज कार्यकर्ते काय करतात यावर रायगडचा खासदार कोण हे ठरणार आहे.

रायगड हा तसा काँगेसचा गड आहे. या जिल्ह्यात काँगेस आणि शेतकरी कामगार पक्ष अशीच लढत होत असे. 2009 पर्यंत काँगेसचे आठ तर शेकापचे सहा खासदार निवडून आले आहेत. बॅ. ए.आर. अंतुले सालग तीन वेळा निवडून आले.1998 आणि 1999 साली शेकापचे रामशेठ ठाकूर सलग दोनवेळा निवडून आले. 2004 साली रामेशठ ठाकूर यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. 2004 साली पुन्हा बॅ. ए. आर . अंतुल विजयी झाले. 2009 साली या मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यात पूर्वीचा कुलाबा मतदारसंघ मावळ आणि रायगड अशा दोन मतदारसंघांमध्ये विभागला गेला. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, दापोली हे दोन विधानसभा मतदारसंघ रायगड जिल्ह्यातील महाड, श्रीवर्धन, अलिबाग व पेण हे रायगड जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांचा सामावेश असलेला रायगड लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. त्यामुळे या मतदारसंघातील रागजकीय समिकरणे बदलली. 2009 साली अनंत गीते आणि बॅ. ए. आर. अंतुले यांच्यात लढत झाली. ही लढत गीते यांनी जिंकली. गीतेंच्या रूपाने शिवसेनेला रायगडचा पहिला खासदार मिळाला. त्यावेळी शेकापने शिवसेनेला पाठिंबा दिला होता. परंतु 2014 साली झालेल्या निवडणुकीत शेकापने शिवसेनेबरोबरची आपली युती तोडली. काँगेसने हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, शिवसेनेचे अनंत गिते व शकापचे रमेश कदम यांंच्यात तिरंगी लढत झाली. यात अनंत गिते यांनी बाजी मारली. ज्या शेकापने 2009 साली शिवसेनेशी युती केली त्याच शेकापने 2014 साली वेगळी भूमिका घेऊन आपला उमेदवार उभा केला. सुनील तटकरे यांना पाडण्यासाठी जंगजंग पछाडले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. हाच शेकाप आता सुनील तटकरे यांना पाठिंबा देत आहे.

- Advertisement -

2014 ला शेकापबरोबर नसतानाही अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा पराभव करून विजयश्री खेचून आणली. पण त्यावेळी मोदी लाटेचा प्रभाव होता, हे विसरता येणार नाही. आगामी निवडणुकीत खासदार अनंत गीते यांना ना शेकापची साथ, ना मोदी लाटेचा प्रभाव अशा प्रतिकुल परिस्थितीत निवडणूक लढवायची आहे. याउलट 2014 मध्ये निसटता पराभव झालेल्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना शेकापची ताकद त्यांच्यासोबत आहे.त्यामुळे सुनील तटकरे यांची बाजू भक्कम वाटत आहे. वरवर दिसते तशी परिस्थिती नाही.रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत देखील शेकाप व राष्ट्रवादी एकत्र होते. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्यसंख्या कमी झाली. हे विसरुन चालणार नाही. शेकाप सोबत आली तरी 2014 साली सुनील तटकरे यांंच्या सोबत असलेले महेंद्र दळवी, अ‍ॅड. राजीव सावळे, श्याम भोकरे,समीर शेडगे, विजय कवळे तटकरे यांना सोडून शिवसेनेत गेले आहेत. सुनील तटकरे यांचे पुतणे आमदर अवधूत तटकरे त्यांच्या सोबत नाहीत. 2014 ज्यांनी तटकरेंना मदत केली ते अलिबागमध्ये काँगेसचे माजी आमदार मधुकर ठाकुर सुनील तटकरे यांच्यावर नाराज आहेत. बॅ. ए. आर . अंतुले याचे पुत्र नावेद अंतुले राजकारणात सक्रीय झाले असून ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. काँगेसचे माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या सर्व गोष्टी तटकरेंच्या विरोधात जाणार्‍या आहेत. जसे 2014 साली विरोध असलेले जयंत पाटील सुनील तटकरे यांच्यासोबत आहेत. तसेच 20014 साली रूसलेले रामदास कदम गीते यांच्या सोबत आहेत.

शेकाप राष्ट्रवादी काँगेस पक्षासोबत असली तारी काँगेस अजूनही या आघाडीत मनापासून उतरलेली नाही.रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार माणिकराव जगताप तटकरेंसोबत फिरताना दिसतात. परंतु काँग्रेसचे इतर नेते अजूनही सक्रीय झालेले नाहीत. सुनील तटकरे व जयंत पाटील यांनी रायगडात काँग्रेस संपवण्याचेच काम केले, अशा लोकांसोबत आम्ही का जावे, असे उघड प्रश्न काँगेसचे कार्यकर्ते विचारत आहेत. त्यांना त्यांचे स्थानिक राजकारण पाहायचे असते. काँगेसचे हे नाराज कार्यकर्ते काय कारतात यावर सारे काही अवलंबून आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -