घरमुंबईअलिबागचा पांढरा कांदा भाव खातोय

अलिबागचा पांढरा कांदा भाव खातोय

Subscribe

औषधी गुणधर्म, रुचकर, कमी तिखटपणा अशी विविध वैशिष्ठ्ये असलेला अलिबागचा पांढरा कांदा मोठा भाव खात बाजारात दाखल झाला आहे. यंदा कांद्याचा भाव वाढला असला तरी मागणीदेखील वाढली आहे. सध्या मोठ्या आकाराचे कांदे 160 रुपये तर लहान आकाराचे कांदे 120 रुपये माळ या दराने विकले जात आहेत. भातापेक्षा चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकर्‍यांसाठी हा पांढरा कांदा ‘पांढरे सोने’ ठरत आहे.

ठाणे जिल्ह्यातील वसई आणि नाशिक जिल्ह्यात पांढर्‍या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु अलिबाग तालुक्यात होणारा पांढरा कांदा इतर ठिकाणी होणार्‍या कांद्यापेक्षा वेगळा आहे. इतर ठिकाणी होणारा पांढरा कांदा तिखट असतो. त्या तुलनेत अलिबाग तालुक्यात होणारा पांढरा कांदा कमी तिखट असतो. या कांद्याला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, पवेळे या परिसरात हा कांदा पिकवला जातो. सहाण व ढवर या गावांमध्येदेखील पांढरा कांदा पिकवला जातो. पूर्वी फक्त अलिबाग तालुक्यातच या कांद्याची लागवड केली जात असे. आता जिल्ह्यातील पेण, महाड, रोहा, माणगाव, कर्जत या तालुक्यांमध्येदेखील काही प्रमाणात पांढर्‍या कांद्याची लागवड केली जात आहे. जिल्ह्यात 250 हेक्टरवर पांढर्‍या कांद्याची लागवड होते. त्यापैकी एकट्या अलिबाग तालुक्यात 230 हेक्टरवर कांद्याची लागवड होते. इतर भागात पांढर्‍या कांद्याची लागवड होत असली तरी अलिबाग तालुक्यातील खंडाळे, नेहुली, पवेळे येथील कांद्याची चव गोड आहे. त्यामुळे या कांद्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

- Advertisement -

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भातकापणी झाल्यानंतर कांद्याची लागवड केली जाते. अडीच महिन्यांत कांद्याचे पीक तयार होते. कांद्याची लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. जितका पाऊस जास्त तितकी कांद्याची लागवड अधिक असते. यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे कांदा लागवडीच्या क्षेत्रामध्ये घट झाली आहे. तरीदेखील गादी वाफा या पद्धतीने कांदा लागवड केल्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत कांद्याचा आकार मोठा झाला आहे. त्यामुळे या कांद्याला चांगला भाव मिळत आहे.

पांढर्‍या कांद्याचे पीक भौगोलिकदृष्ठ्या अलिबाग तालुक्यातच चांगल्या पद्धतीने घेतले जाऊ शकते. कमी जागेतही चांगले उत्पन्न देणारे पांढरा कांदा हे एक नगदी पीक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या पांढर्‍या कांद्याची लागवड करायला हवी. कृषी विभागाकडून पांढर्‍या कांद्याचे उत्पादन वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. त्याचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यायला हवा, असे अलिबागचे तालुका कृषी अधिकारी बी. आर. जानुगडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -