घरमहाराष्ट्रनाशिकजात पंचायतीची मुजोरी; बलात्काराची तक्रार दिली म्हणून केला ११ हजारांचा दंड

जात पंचायतीची मुजोरी; बलात्काराची तक्रार दिली म्हणून केला ११ हजारांचा दंड

Subscribe

साक्री तालुक्यातील धक्कादायक घटना, पिडीत कुटुंबीयांच्या पदरी आधाराऐवजी मनस्ताप

विवाहाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसांत का केली, याचा जाब विचारत साक्री तालुक्यातील जात पंचायतीने पिडीतेच्या कुटुंबीयांनाच ११ हजारांचा दंड केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. या मुजोर पंचांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी आक्रमक भूमिका जात पंचायत मूठ माती अभियानच्या पदाधिकार्‍यांनी घेतली आहे.

पिडीत मुलीच्या तक्रारीनुसार बाळा अब्राहम सहाने (रा. बेज, ता. कळवण, जि. नाशिक) याच्याविरुद्ध पिंपळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, धोंगडे गावठाण (ता. साक्री, जि. धुळे) येथे पिडीत मुलगी आई, वडील व भावासह राहते. आठ महिन्यांपूर्वी सहाणे हा गावातील नातेवाईकांकडे राहण्यास आला होता. मुलीचे आई-वडील मजुरीसाठी गुजरातला गेलेले असल्याची संधी साधत एका लग्नात सहाने याने ओळख करत विवाहाचे आमीष दाखवून बलात्कार केला. त्यानंतर तो त्याच्या गावी निघून गेला. गर्भाची वाढ निदर्शनास आल्यानंतर पालकांनी मुलीला जाब विचारल्यानंतर तीने घाबरुन सर्व घटना सांगितली. दरम्यान, पिडीतेच्या कुटुंबीयांनी सहाने यांच्या घरी जाऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करताच मुलीच्या पोटातील बाळ आमचे नसल्याचे सांगत संबंधितांनी त्यांना परतावून लावले. दरम्यान, ही घटना समजताच गावातील जात पंचायतीच्या पंचांनी पिडीतेच्या कुटुंबीयांना बोलावून पोलिसांत तक्रार का केली, असा जाब विचारत ११ हजारांचा दंड केला. ही घटना समजताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानच्या पदाधिकार्‍यांनी पोलिसांकडे या पंचांविरुद्ध सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे पिडीतेचे कुटुंब मात्र प्रचंड दहशतीखाली आहे.

- Advertisement -

मुलीचे पुनर्वसन व्हावे

ऊसतोडणी कामगारांच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीवरील हा अत्याचार माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. त्यामुळे या पंचांविरुद्ध पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला पाहिजे. तसेच, मुलीचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे. – कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जात पंचायत मुठ माती अभियान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -