घरताज्या घडामोडीMatheran : रस्त्याच्या दुरावस्थेचा अश्वपालक आणि रिक्षा चालकांच्या रोजगाराला फटका

Matheran : रस्त्याच्या दुरावस्थेचा अश्वपालक आणि रिक्षा चालकांच्या रोजगाराला फटका

Subscribe

मात्र माथेरान नगरपरिषदेचे दुर्लक्ष 

अवघ्या काही दिवसात दिवाळी आणि नाताळ येऊन ठेपला असून, या सणासुदीच्या काळात कोविड प्रादुर्भावानंतर माथेरानच्या पर्यटनाला पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. या काळात माथेरानमधील रिक्षा चालक, अश्वपालकांच्या रोजगारात मोठ्या प्रमाणात भर पडून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत असतात. मात्र माथेरान शहरात सुरू असलेल्या अर्धवट तसेच नियोजन शुन्य विकास कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. येथील पारंपरिक WBM पद्धतीने बनविण्यात येणाऱ्या रस्त्यावर गेले कीत्येक वर्षे दुरुस्तीचे काम केले नाही. त्यामुळे प्रेक्षणीय स्थळांवर जात असलेल्या रस्त्यांचे अक्षरशः चाळण झाली आहे.दगडगोटे वर येऊन मोठमोठे खाचखळगे पडल्याने सर्वसामान्य हात रिक्षा चालकांना रिक्षा चालवणे तसेच अश्वपालकांना आपले घोडे चालवणे कठीण होऊन बसले आहे. यामुळे पर्यटकांना दळणवळणाची सेवा देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याचा फटका त्यांच्या रोजगाराला देखील बसत आहे.  माथेरान नगरपरिषदेच्या कारभारावर अश्वपालक तसेच रिक्षा चालक यांची नाराजी  उघडपणे व्यक्त करताना दिसत आहे.

- Advertisement -

माथेरानच्या समस्यांची कैफियत

माथेरानमधील ‘शार्लोट लेक’  या प्रेक्षणीय स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची वाताहत झाल्याने हात रिक्षा चालकांना काही ठिकाणी पर्यटकांना रिक्षातून उतरवून चालत पाठवावे लागते. यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. घोड्यांच्या पायांना  दगडगोटे लागून इजा होत आहेत. घोड्यांचे पाय दगडगोटे आणि खड्ड्यातून चालताना घसरुन अपघात होण्याची शक्यता देखील असल्याने घोड्यांवर बसलेल्या पर्यटकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.असे येथील स्थानिक व्यवसायिक नरेन म्हामुणकर,हैदर शेख,असिम शेख,समीर महापुळे,अकीब महापुळे विशाल ढेबे आणि हात रिक्षा चालक सुरेश कदम यांनी समस्यांची कैफियत मांडली आहे. या संदर्भात नगरपरीषदेने लवकरच लक्ष दिले नाही तर यासाठी येत्या काही दिवसात आंदोलन देखील छेडले जाईल असे, अश्वपालकांनी स्पष्ट केले आहे.
सदर रस्त्याचे कामदेखील ‘इन्फेक्शन बंगला’ ते ‘शार्लोट लेक’ पर्यंत नियोजित कामांमध्ये असून सध्या शार्लोट लेक येथून या कामाची सुरूवात करण्यात आली आहे. मात्र येणारा पर्यटन हंगाम लक्षात घेऊन तसेच अश्वपालक आणि रिक्षा चालकांच्या मागणीनुसार प्रथम प्राधान्य देऊन या रस्त्याचे काम इन्फेक्शन बंगला येथून लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला बांधकाम विभागाकडून देण्यात आल्याचे बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांनी सांगितले.
                                                                                                  वार्ताहर – दिनेश सुतार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -