‘निवृत्त नर्सेस, वॉर्डबॉय, सैन्यातील मेडिकल स्टाफने कोरोना विरोधातील युद्धात सामील व्हावे’

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा आज पंधरावा दिवस आहे. लॉकडाऊन असूनही महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज सकाळपासून पुण्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईतही अनेक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येत राज्यातील परिस्थितीचा आढावा दिला.

यावेळी त्यांनी सैन्यादलाच्या मेडिकल विभागातून निवृत्त झालेले, तसेच राज्यातील हॉस्पिटलमधून निवृत्त झालेल्या नर्सेस, वॉर्डबॉय, पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधातील युद्धात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच ज्या लोकांनी आरोग्य सेवेचे रितसर प्रशिक्षण घेतलेले आहे, अशा लोकांनीही समोर येऊन सेवेसाठी तत्परता दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. यासाठी त्यांनी [email protected] या ईमेल आयडीवर आपले अर्ज पाठवण्याची विनंती केली आहे.

मात्र ज्या लोकांना आरोग्य सेवा देण्याची इच्छा आहे, तसा त्यांच्याकडे अनुभव किंवा प्रशिक्षण आहे, अशाच लोकांनी या ईमेल आयडीवर अर्ज पाठविण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. इतर लोकांनी या ईमेलवर संपर्क साधू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले आहे.

या लाईव्ह दरम्यान ठाकरे यांनी काल पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कॅबिनेट बैठक घेतल्याचे सांगितले. आम्ही सर्व मंत्री अंतर पाळत आहोत. आमच्यात भौतिक अंतर असले तरी आम्ही मनाने एकत्र आहोत. आम्ही एकसंध आहोत. महाराष्ट्रात पहिला रुग्ण आढळून काल चार आठवडे झालेले आहेत. या चार आठवड्यात इतर देशांमध्ये रुग्णात जी वाढ झाली त्यामानाने ही वाढ कमी आहे. पण आपल्याला शून्यावर जायचे आहे, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State

CMOMaharashtra ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 8, 2020