घरताज्या घडामोडीकोरोनाशी लढत डॉक्टर साजरी करणार दिवाळी

कोरोनाशी लढत डॉक्टर साजरी करणार दिवाळी

Subscribe

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्‍यांनी दिवस रात्र एक करत काम केले आहे. वटपौर्णिमा, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा अनेक सणांमध्ये त्यांनी घराकडे दुर्लक्ष करत रुग्णसेवेला प्राधान्य दिले. परंतु रुग्णसेवेसोबत आता दिवाळी साजरी करण्याचा निर्धार या कोरोना योद्ध्यांनी केला आहे. त्यातही रुग्णसेवेला प्राधान्य देतच दिवाळी साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अंधारावर प्रकाशाने मात करणारा उत्सव म्हणजे दिवाळी. मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तो रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले. यामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, उद्योगधंदे ठप्प झाले. अशा या कोरोनाशी डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी यांनी दोन हात केले. हे दोन हात करताना त्यांनी आपले वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवले. त्यासाठी त्यांनी घरापासून दूर राहत कोरोना रुग्णांची सेवा केली. परंतु आनंदाचा प्रकाशाचा असलेला हा उत्सव आपल्या कुटुंबासोबत साजरा करणार असल्याची माहिती कोरोना योद्ध्यांनी दिली. कोरोनाची लाट मुंबईत आल्यापासून मी सातत्याने रुग्णसेवेत व्यस्त होते. घरी जातानाही माझ्या मनामध्ये भीतीचे काहूर उठत असे.

- Advertisement -

माझ्यामुळे माझ्या लहान मुलाला कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मी त्याला गावाला माझ्या सासू-सासर्‍यांकडे पाठवले. पाच वर्षांच्या माझ्या मुलाला दूर करताना मला बर्‍याच वेदना झाल्या. सात महिन्यांपासून तो गावाला आहे. यापूर्वी तो एक दिवसही माझ्यापासून दूर राहिला नव्हता. पण कोरोनामुळे माझ्या मनावर दगड ठेऊन मी त्याला माझ्यापासून दूर केले. पण कोरोनाशी लढा देण्यासाठी मी अनेकदा रुग्णालयातच राहत असे. पण आता दिवाळीचा उत्सव मी माझ्या कुटुंबासोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मला गावाला जाणे शक्य नसले तरी मी माझ्या आई-बाबांकडे जाऊन दिवाळी साजरी करणार आहे. पण त्याचवेळी रुग्णसेवाला प्राधान्य देणार असल्याचे सायन रुग्णालयातील परिचारिका माधवी कांबळे यांनी सांगितले.

दिवाळी ही दरवर्षी येत असते. यंदा कोरोनाचे संकट भयंकर आहे, त्याचा सामना करण्यासाठी आम्ही आतापर्यंत सर्व उत्सवांकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचप्रमाणे यंदा दिवाळीमध्येही आमचे पहिले प्राधान्य हे रुग्णसेवेलाच असणार आहे. त्यामुळे रुग्णालयात काम करणार्‍या डॉक्टरांना सुट्टी मिळणार नाही. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने थोडासा दिलासा मिळाला असला तरी निश्चिंत होऊन चालणार नाही. दुसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये आम्हाला अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. रुग्णालयातच सहकारी आणि रुग्णांसोबत दिवाळी साजरी करू, असे असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटचे अध्यक्ष डॉ. दीपक बैद यांनी सांगितले.

- Advertisement -

आठ महिन्यांपासून आम्ही कोरोना रुग्णसेवेत आहोत. कोरोनाचे रुग्ण सध्या कमी झाल्याने आम्हाला थोडासा आराम आहे. पण या दिवाळीमध्ये आम्ही कोरोना रुग्णांची सेवा करण्यालाच प्राधान्य देणार आहोत. कोरोनाविरोधातील लढ्यातील आम्ही महत्त्वाचे योद्धे आहोत. त्यामुळे आम्हाला उत्सवाऐवजी रुग्णसेवेला प्राधान्य द्यावे लागणार आहे. यंदाची दिवाळी कुटुंबासोबत साजरी करता येणार नसल्याची खंत आम्हा डॉक्टरांना असेल. पण आम्ही रुग्णालयात आमच्या सहकार्‍यांसोबत दिवाळी साजरी करू आणि त्याचबरोबर कोरोना रुग्णसेवेलाच प्राधान्य देऊ, असे केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर दीपक मुंढे यांनी सांगितले.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -