पंचतारांकित बंड!

eknath shinde

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. त्यामुळं पुढं काय होणार याचीच चर्चा सध्या सुरू आहे. महाराष्ट्रात तसंच देशात याआधीही विविध राज्यात, पक्षात बंडाळी झाली असल्याचे अनेकदा दिसून आलं आहे. पण, त्याहीपेक्षा आताचं बंड थोडं वेगळं आहे. आसाममधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बंडखोरांच्या बडदास्तीवर दररोज लाखोंचा खर्च होत असल्याने बंड पंचतारांकित असंच म्हणावं लागेल. गेल्या सोमवारी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह अचानक सूरत गाठली. आणि रात्री शिंदे यांनी बंड केल्याचं जाहीर झालं. सुरतेहून बुधवारी शिंदे बंडखोर आमदारांसह चार्टर्ड विमानातून आसामच्या गुवाहाटी येथील रॅडिसन या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोचले. सध्याच्या घडीला रॅडिसन हॉटेलमध्ये 45 हून अधिक आमदार आणि त्यांची खास काही जवळची माणसं मुक्काम ठोकून आहेत. या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारणात दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत.

घराघरात या बंडाची चर्चा सुरू झाली आहे. पुढं काय होणार आहे, याची चिंता सर्वसामान्य शिवसैनिकांना लागून राहिली आहे. पुन्हा सत्तेवर येण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना याचवेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता हातात रहावी यासाठी राजकीय गणितं जुळवण्यात व्यस्त आहे. बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रातून सूरत आणि आता गुवाहाटीत पलायन केल्यानंतर त्यांच्यासाठी केंद्र सरकारसह गुजरात, आसाम सरकारची सुरक्षा यंत्रणा आधीपासूनच ठरल्याप्रमाणेच कार्यरत असल्यासारखंच चित्र आहे. बंडखोरांची आधीच ठरल्यानुसार पंचतारांकीत व्यवस्था थक्क करणारी आहे. बंडखोर आमदारांसाठी दररोज होत असलेला लाखो रुपयांचा खर्चही थक्क करणारा आहे. 20 जूनला संध्याकाळी ३० च्या आसपास बंडखोर आमदार सूरतला रवाना झाले. एकनाथ शिंदेंच्या खास मर्जीतील पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी बंडखोरांना सूरतला सुखरुपपणे जाण्यास मदत केली. सूरतला आधीच पंचतारांकित हॉटेल बुक होतं. गुजरात पोलिसांसह केंद्र सरकारची सुरक्षा यंत्रणाही त्याठिकाणी होती. 22 जूनच्या पहाटे चार्टर्ड विमानाने सुरक्षा रक्षकांच्या कडकोट बंदोबस्तात आमदार गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलकडे रवाना झाली. त्याही ठिकाणी आधीपासूनच केंद्र सरकार आणि आसाम पोलिसांचं सुरक्षा कवच होतं.

बंडखोर आमदारांना सूरतहून गुवाहाटीपर्यंत जाण्यासाठी खास चार्टर्ड विमानाची व्यवस्था होती. त्यासाठी किमान एक कोटी रुपयांच्या घरात खर्च झाला. रॅडिसन या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यात असलेल्या आमदारांसाठी दररोज दहा लाख रुपयांचा घरात खर्च होत आहे. त्याचबरोबर स्थानिक राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवरही दररोज होणारा खर्च वेगळा आहे. बंडखोरांवर दररोजचा इतका लाखो रुपयांचा खर्च कोण करतंय हा सर्वसामान्यांना पडलेला खरा तर प्रश्न आहे. महाराष्ट्रात याआधीही अनेक पक्षांमध्ये बंडखोरी झालीय. आमदार फुटून इतर पक्षात गेलेही होते. पण, बंडखोरांना पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्याची ही नवी प्रथा एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर सुरू झाली आहे. बंडखोरांचं नेतृत्व करत असलेले एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी प्रताप सरनाईक हेही तितक्याच ताकदीने उभे आहेत. दोघंही ठाण्यातून राजकारण आणि पुढे व्यवसायात यशस्वी झालेले नेते आहेत. एकनाथ शिंदे ठाण्यात रिक्षा चालवायचे.

राजकारणात आल्यानंतर शिंदेंची आर्थिक ताकदही प्रचंड प्रमाणात वाढली. सचिन जोशी हा त्यांचा फार पूर्वीपासूनचा पीए. ईडीची नोटीस आल्यानंतर जोशी गायब झाले आहेत. शिंदेंचे आर्थिक व्यवहार जोशी सांभाळतात, अशी चर्चा मंत्रालय आणि ठाण्यात नेहमीच ऐकायला मिळत असते. आमदार प्रताप सरनाईक यांचा रिक्षा चालक ते 125 कोटींचा मालक हाही प्रवास थक्क करणाराच आहे. सुरुवातीच्या काळात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी डोंबिवलीत अंडा भुर्जीची गाडीदेखील लावली होती. अंडा भुर्जी विकणार्‍या, रिक्षा चालवणार्‍या सरनाईक यांनी यशस्वी व्यावसायिक आणि राजकीय नेता म्हणूनही नाव कमावलं. सरनाईक यांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. ईडीने त्यांच्याशी संबंधित फ्लॅट आणि जमीन जप्त केली आहे. या जप्त केलेल्या प्रॅापर्टीची किंमत 11.35 कोटी रूपये असल्याचं सांगण्यात येत आहे. मंत्री गुलाबराव पाटील, जळगावमधील पाळधी या खेड्यात पानटपरी चालवायचे. रामदास कदम तत्कालीन आमदार केशवराव भोसले यांच्या गाडीचे ड्रायव्हर होते. कदम यांचंही प्रस्थ आता मोठं झालं आहे. त्याच कदमांचे सुपुत्र आमदार योगेश कदम हेही बंडखोरांमध्ये सहभागी झाले आहेत.

यशवंत जाधवांना शिवसेनेने सलग पाच वर्षे मुंबई स्थायी समितीचं सभापतीपद दिलं. किरीट सोमय्या यांनी जाधव मातोश्रीची वसुली करत असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर केंद्रीय यंत्रणा यशवंत जाधव यांच्या मागे लागल्या आहेत. त्यांच्याही कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता केंद्रीय संस्थांनी जप्त केल्या आहेत. यशवंत जाधव हे आमदार पत्नी यामिनी जाधव यांच्यासह बंडात सहभागी होत गुवाहाटी मुक्कामी आहेत. खासदार भावना गवळी यांच्याही मागे गेल्या अनेक महिन्यांपासून ईडीचा ससेमिरा लागला आहे. बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरू लागल्याने राज्यात तणावाचं वातावरण आहे. त्यामुळं केंद्र सरकारने जवळपास पंधरा बंडखोर आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, असं राज्यपालांनी केंद्र सरकारला कळवलं आहे. अशावेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या राज्यात पाठवणे आवश्यक असल्याचं कोश्यारी यांनी केंद्र सरकारला सांगितलं आहे. सूरतपासून आसामपर्यंत केंद्र सरकार आणि स्थानिक भाजप सरकारची सुरक्षा यंत्रणा काम करतेय. महाराष्ट्रातही सध्या नैसर्गिक संकटे आहेतच.

कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. पावसाळा लांबल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. कोरोनामुळे दोन वर्षे अशीच वाया गेली असताना जून महिना संपत आल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. एकीकडे, सरकारची कामे ठप्प झाली आहेत. त्यातच बंडखोरांच्या कळपात सामील झालेले कृषीमंत्री दादा भुसे गुवाहाटीच्या हॉटेलमधील पंचतारांकित सोयीसुविधांचा लाभ घेत आहेत. तीच गत उच्च शिक्षणाबाबत होऊ लागली आहे. उदय सामंत शेवटच्या क्षणी गुवाहाटीत पोचले आहेत. परीक्षांचे निकाल लागले असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अशात उच्च शिक्षणमंत्री गुवाहातीला पोहोचले आहेत. एकूनच बंडखोरांची पंचातारांकीत बडदास्त सुरू असली तरी सामान्य माणसांचा वाली कोण असा प्रश्न पडला आहे.