खालापूरात कौशल्य विकास केंद्राची उभारणी; नामदार सुभाष देसाईंच्या हस्ते उद्घाटन

दुर्गम भागात राहणाऱ्या मुला-मुलींना रोजगाराच्या आणि व्यवसाय प्रशिक्षणाच्या संधी मिळत नसल्याने खालापूरची निवड

Inauguration of Skill Development Center at the hands of Namdar Subhash Desai in Khalapur
खालापूरात कौशल्य विकास केंद्राची उभारणी; नामदार सुभाष देसाईंच्या हस्ते उद्घाटन

खेडोपाडी मुलामुलींना व्यवसाय प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी स्वावलंबी करण्याचे काम पहल केंद्र करत आहे. खालापूर येथे नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी २१ सप्टेंबरला नामदार सुभाष देसाई खालापूर येथे पहल संस्थेच्या कौशल्य विकास केंद्र उद्धघाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. घरची परिस्थिती आणि शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना विविध कौशल्य विकास प्रशिक्षणातून रोजगाराच्या नवी संधी पहल नॅचरिंग लाईव्हज संस्था उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. मुळ गावी माणगाव येथे देखील असा उपक्रम सुरू करावा, असे आमंत्रण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पहल संस्थेला दिले. या कार्यक्रमाला उद्योग मंत्री सुभाष देसाई, कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे, शेठ दामजी लक्ष्मी शेठ जैन ट्रस्टी उमेश संघवी, संजु लाठिया ,संस्थापक अंकुश भारद्वाज यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

घरात आई तसेच गृहिणी ज्याप्रकारे घर चालवताना नियोजन करते हे एक प्रकारचे कौशल्य असून, त्याआधारे कुटुंबाचा गाडा ज्याप्रमाणे चालतो तसे बेरोजगार तरुण-तरुणींना आयुष्याचा गाडा ओढण्यासाठी यशस्वी होण्यासाठी पहल कौशल्य विकास केंद्र खूप गरजेचे आहे, असे मत नामदार सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.  गावोगावी बांधण्यात येणाऱ्या समाज मंदिरात गावातील तरुण-तरुणींना अशाप्रकारे विविध व्यवसाय प्रशिक्षणाची माहिती देण्यात काम झाल्यास एक चांगली पिढी निर्माण होईल, असे देसाई यांनी सांगितले.

आमदार महेंद्र थोरवे यांनीसुद्धा संस्थेच्या कामाचे कौतुक करताना कोणत्याही प्रकारची गरज लागल्यास सदैव मदतीसाठी उपलब्ध असेल असे आश्वासन दिले. संस्थापक अंकुश भारद्वाज यांनी प्रस्तावनेत खालापूर तालुका निवडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे मुंबई पुण्यापासून जवळ असून सुद्धा तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या मुला-मुलींना रोजगाराच्या आणि व्यवसाय प्रशिक्षणाच्या संधी मिळत नसल्याने खालापूरची निवड केल्याचे सांगितले. गेल्या तीन महिन्यात गावोगावी, वाडीवस्तीवर फिरून शिक्षणात खंड पडलेल्या युवक-युवतींना प्रोत्साहित करत प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. याशिवाय एक वेगळा उपक्रम राबवत तालुक्यातील ५४ कुटुंबांना भाजी लागवडीचे बी बियाणे ,खत देऊन त्यात शास्त्रशुद्ध माहिती देण्यात आल्याचे संस्थापक भारद्वाज यांनी सांगितले. खालापूर येथील कौशल्य विकास केंद्र नर्सिंग, मोबाईल दुरुस्ती, वीजतंत्री याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून परसदारात भाजीपाला लागवडीची शास्त्रशुद्ध माहितीदेखील संस्थेतर्फे देण्यात येणार आहे.

– वार्ताहर मनोज कळमकर


हे ही वाचा – देशातील महिला अत्याचारांविरोधात संसदेचे ४ दिवसीय अधिवेशन घ्या, उद्धव ठाकरेंचे राज्यपालांच्या पत्राला उत्तर