घरताज्या घडामोडी‘शिवशाही’चा गल्लाभरू फंडा ; सर्वसामान्य एसटी प्रवाशांना नाहक भुर्दंड

‘शिवशाही’चा गल्लाभरू फंडा ; सर्वसामान्य एसटी प्रवाशांना नाहक भुर्दंड

Subscribe

शिवशाहीचा प्रवास आरामदायी असला तरी, सर्वसामान्य प्रवाशांना मात्र नेहमीपेक्षा दीडपट अधिक भाडे मोजावे लागते.

एसटीच्या रोहे आगारातून सध्या पनवेलसाठी तब्बल ७ शिवशाही बस धावत असून, प्रवास आरामदायी असला तरी सर्वसामान्य प्रवाशांना मात्र नेहमीपेक्षा दीडपट अधिक भाडे मोजून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कोरोना काळातील सक्तीच्या विश्रांतीनंतर एसटीची प्रवासी सेवा बरीचशी पूर्वपदावर आल्याने प्रवाशांना दिलास मिळाला आहे. त्यातच रेल्वेच्या नियमाप्रमाणे सरसकट प्रवासी तेथे प्रवास करू शकत नसल्याने एसटी किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. ग्रामीण भागातून शहराकडे जायचे असेल तर एसटीशिवाय पर्याय नसतो. हीच बाब हेरून एसटीने अनेक ठिकाणी शिवशाही बस चालू केल्या आहेत. रोहे आगारातून तर तब्बल ७ बस केवळ पनवेलसाठी सोडल्या जात असून, येऊन-जाऊन एकूण १४ फेर्‍या होतात. या बसचे तिकीट दीडपट आहे. कधीतरी आरामदायी प्रवासाची मजा म्हणून जाणारे प्रवासी जसे आहेत, तसे ज्यांना परवडते असेही प्रवासी आहेत. परंतु यात सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे.

रोहे-पनवेल मार्गावरील शिवशाही बस प्रत्येक थांबा घेत जात असल्याने अनेकदा जलद प्रवास होईल या अपेक्षेने प्रवास करणारे प्रवासी आणि वाहक यांच्यात शाब्दीक चकमक होते. हाच प्रकार एशियाड बसमध्येही होत असतो. विशेष म्हणजे काही वेळा एसटीचे कर्मचारीही फरकाचे (डिफरन्स) तिकीट न घेता शिवशाहीमधून आरामात प्रवास करतात तेव्हा दीडपट भाडे मोजणारा प्रवासी निमूटपणे उभ्याने प्रवास करीत असतो. यावर कुणी आक्षेप घेतलाच तर त्याला उर्मट उत्तर ऐकावे लागत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. शिवशाहीच्या या गल्लाभरू फेर्‍यांच्या घाईत बसची अनेकदा धडपणे साफसफाई केली जात नसल्याचेही प्रवासी सांगतात.

- Advertisement -

एसटीने शिवशाही बंद करावी असे प्रवाशांचे बिलकूल म्हणणे नसले तरी त्या वेळेच्या आसपास पर्यायी साध्या बसच्या फेर्‍या चालू ठेवाव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे. साधी बस नसेल तर शिवशाहीसाठी दीडपट भाडे मोजून प्रवास करण्याशिवाय पर्याय उरत नाही. यात सर्वसामान्य नोकरदार, तसेच विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याने एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी वास्तवाचे भान ठेवून सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी रास्त मागणी होत आहे.

 

- Advertisement -

प्रवासी दर

मार्ग            साधी          शिवशाही
रोहे-पनवेल    १०० रु.        १५० रु.
रोहे-नागोठणे    २५ रु.         ४० रु.
रोहे-पेण          ६० रु.       १०० रु.
नागोठणे-पेण     ३५ रु.        ५५ रु.
नागोठणे-पनवेल  ७५ रु.       ११० रु.
पेण-पनवेल        ४५ रु.        ७५ रु.

एसटीला प्रवाशांच्या आरामदायी प्रवासाची चिंता असेल तर त्यांनी सर्वप्रथम सर्वच गाड्यांचा दर्जा सुधारावा. रोहे-पनवेल मार्गावर पुरेशा फेर्‍या असतील तर शिवशाहीसाठी जादा पैसे मोजून प्रवासी प्रवास कशासाठी करतील? शिवशाही जागोजागी थांबतात. मग दीडपट भाड्याचा उपयोग काय? खर म्हणजे एसटीने लुटमारीचा हा चांगला पर्याय निवडला असून, शिवशाही इतक्याच विठाई बसही चालू करा, बघा प्रवासी कोणत्या बसला पसंती देतात ते! राजकीय नेत्यांना एसटी प्रवाशांचे दुःख कधीच समजत नसल्याने प्रसार माध्यमांचाच प्रवाशांना आधार वाटतो.
-विवेक कोळी, पेण

प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने मुंबई सेंट्रलच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या सूचनेनुसार उपलब्ध असलेल्या ७ शिवशाही बसचा वापर रोहे-पनवेल मार्गावर केला जात आहे. मात्र प्रवाशांची पुरेशी संख्या असेल तर शिवशाहीशिवाय आणखी साध्या फेर्‍याही वाढविण्याचा विचार होईल. प्रवाशांच्या सूचनांची किंवा तक्रारीची वेळीच दखल घेतली जाते.
-एस. ए. कांबळे, आगार प्रमुख, रोहे

                                                                                                  -कल्पेश पवार


हे ही वाचा – Monsoon update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा Orange Alert !


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -