विवाहित प्रेयसीला मिठीत घेऊन धावत्या लोकलच्या बाहेर लोटले, प्रेयसीचा मृत्यू

धावत्या लोकलमधून विवाहित प्रेयसीला ट्रेनमधून ढकलल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये घडली आहे.

Man arrested for ‘dropping’ his wife from a moving train in chembur
विवाहित प्रेयसीला मिठीत घेऊन धावत्या लोकलच्या बाहेर लोटले

२७ वर्षीय विवाहित प्रेयसीला मिठीत घेऊन धावत्या लोकलच्या बाहेर लोटल्याची धक्कादायक घटना हार्बर मार्गावरील चेंबूर गोवंडी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडली आहे. यामध्ये प्रेयसीचा मृत्यू झाला असून प्रियकराला वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अनेक प्रवाशांसमोर ही घटना घडत असताना एकही प्रवासी मदतीला धावून न आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नेमके काय घडले?

पूनम चौहान (२६), असे या दुर्देवी विवाहित प्रेयसीचे नाव आहे. पूनम ही विवाहित असून तिला ७ वर्षाची एक मुलगी आहे. काही वर्षांपासून ती पतीपासून मुलीला घेऊन विभक्त राहत होती. पतीने सोडल्यानंतर ती मानखुर्द येथे राहणारा प्रियकरासोबत मुलीला घेऊन राहत होती. रविवारी सकाळी पूनम तिची सात वर्षांची मुलगी आणि अन्वर हे तिघे काही कामानिमित्त सीएसटीएम येथे गेले. तेथून दुपारी तिघांनी मानखुर्द येथे येण्यासाठी पनवेल ट्रेन पकडली. चेंबूर स्थानक येताच तिघेही लोकल ट्रेन दारात येऊन उभे राहिले. अन्वर हा लोकलच्या दारात असलेल्या खांबाला पकडून गोलगोल चक्कर मारत असताना त्याने प्रेयसी पूनमला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या सोबत गोलगोल चक्कर मारू लागला. हा सर्व प्रकार इतर प्रवाशांसमोर सुरु होता. मात्र, कुठल्याही प्रवाशाने त्यांना असे करण्याबाबत रोखले नाही. लोकलने गती पकडताच अन्वर याने मिठी सैल करून पूनमला धावत्या लोकल ट्रेनमधून बाहेर लोटले. ७ वर्षाच्या मुलीसमोर तिच्या आईला ट्रेनमधून लोटल्यानंतर प्रवासी पुढे आले आणि गोवंडी रेल्वे स्थानक येताच इतर प्रवाशांनी फलाटावर असलेल्या रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

पोलिसांनी अन्वरला ताब्यात घेऊन पूनमला लोटलेले ठिकाण शोधून काढले आणि जखमी पूनमला गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात अन्वर अली शेख याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला या प्रकरणी अटक करण्यात आली असल्याची माहिती वडाळा रेल्वे पोलिसांनी दिली आहे. अन्वरने पूनमच्या या प्रकारे हत्या का केली? त्याचा काही वाद होता का याबाबत तपास सुरु असल्याची माहिती वपोनि कुंभार यांनी दिली आहे.


हेही वाचा – धक्कादायक! अत्याचार करणाऱ्या संशयिताची गळफास घेत आत्महत्या