खासदार तटकरेंची मिनतवारी फळाला : राष्ट्रवादीचे सुरेश लाड यांचे राजीनामा नाट्य संपुष्टात

NCP's Suresh Lad withdraws resignation
खासदार तटकरेंची मिनतवारी फळाला : राष्ट्रवादीचे सुरेश लाड यांचे राजीनामा नाट्य संपुष्टात

दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश लाड यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ऐन निवडणुकांच्या तोंडावर लाड यांनी घेतलेली भूमिका पक्षाला परवडणारी नव्हती. त्यातच जिल्हयातील सहा नगर पंचायतीच्या निवडणुकांची तारीखही जाहीर झाल्याने अशा परिस्थितीत पक्ष नेतृत्वापुढेही मोठा प्रश्न उभा राहिला होता. त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांनी लाड यांची मनधरणी करत लाड यांना राजीनामा मागे घेण्यास भाग पाडल्याने अखेर दोन दिवसातच लाड यांचे राजीनामा नाट्य संपुष्टात आले. खासदार तटकरेंबरोबरील बैठकीतच जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार हाती घेत असल्याचे लाड यांनी जाहीर केले.

पनवेल येथील एका तारांकित हॉटेलमध्ये गुरुवारी खासदार सुनील तटकरे आणि सुरेश लाड यांच्यात बैठक झाली . या बैठकीत तटकरे यांनी लाड यांची व्यथा, अडचणी समजून घेतल्या आणि त्या सोडविण्यात येतील, असा विश्वास देत तुमची पक्षाला नितांत गरज आहे, या पुढील जिल्ह्यातील सर्व जिल्हापरिषद, नगरपंचायत निवडणुका तुमच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येतील, असा शब्द तटकरे यांनी लाड यांना दिला. तुम्ही राजीनामा मागे घ्या, अशी विनवणी तटकरे यांनी लाड यांना केली. अखेर तटकरेंच्या या शिष्टाईला यश येऊन लाड यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेतला.

माझ्या विनंतीला मान देत लाड यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेतला आहे. या पुढील जिल्ह्यातील सर्व निवडणुका लाड यांच्या अध्यक्षपदाच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येतील. तसेच लाड यांचे पक्षासाठी मोठे योगदान असून पक्ष त्यांचा योग्य वेळी योग्य तो सन्मान करेल.
खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस

माझ्या प्रकृती अस्वास्थामुळे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मात्र नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीच्या युद्धाचे रणशिंग फुकलेले असतांना मी कार्यकर्त्यांना सोडून घरात बसून राहणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी माझा राजीनामा मागे घेत असून निवडणुकीच्या कामाला जोमाने लागणार आहे .
– सुरेश लाड , जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


हे ही वाचा – नाशिक जिल्ह्यातील साडेचार हजार प्राथमिक शाळा १ डिसेंबरपासून होणार सुरू