घरताज्या घडामोडीपेणमध्ये एसटी चालकांच्या मनमानीचा प्रवाशांना मनःस्ताप

पेणमध्ये एसटी चालकांच्या मनमानीचा प्रवाशांना मनःस्ताप

Subscribe

विद्यार्थी, पासधारक किंवा नोकरी करणार्‍या प्रवाशांचे यात हाल होत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणात अनेक ठिकाणी उड्डाण पूल झाले असून, सर्व्हिस रस्तेही तयार करण्यात आले आहेत. एसटीची प्रवासी वाहतूक करणार्‍या बस या रस्त्यावरून जाणे अपेक्षित असताना चालक-वाहक मनमानीपणा करीत या बस थेट उड्डाण पुलावरून पळवत असल्याने प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसण्याबरोबर मनःस्तापही सहन करावा लागत आहे. सध्या पेण ते नागोठणे मार्गावर या मनमानीचा सर्वाधिक अनुभव येत आहे. पळस्पे ते तळकोकणापर्यंत या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम होत असून, थोड्या-थोड्या अंतरावर महामार्गाला खेटून छोटी-मोठी गावे असल्याने सर्व्हिस (पर्यायी) रस्ते तयार करण्यात आले आहेत. याच रस्त्यांवर एसटीचे थांबे आहेत. एसटीची प्रवासी सेवा (जलद किंवा अतिजलद वगळता, मात्र सरसकट नव्हे) याच सर्व्हिस रस्त्यावरून होणे अपेक्षित असताना चालक तेथे बसची प्रतीक्षा करणार्‍या प्रवाशांचा न विचार करताना केवळ स्वतःच्या सोयीसाठी थेट उड्डाण पुलावरून बस नेतात. कधीतरीच एसटीचे अधिकारी हटकतात हे पक्के ध्यानात असल्याने चालक-वाहक प्रवाशांना अजिबात किंमत देत नाहीत.

सर्व्हिस रस्त्यावर बसची प्रतीक्षा करणारे प्रवासी बस आली नाही तर अन्य खासगी वाहनांचा आधार घेत पुढे मार्गस्थ होतात. परंतु यात त्यांना अनेकदा जादा पैसे मोजावे लागतात. विद्यार्थी, पासधारक किंवा नोकरी करणार्‍या प्रवाशांचे यात हाल होत आहेत. मुळात तोट्यात (!) असलेल्या एसटीच्या फेर्‍या कमी आणि त्यात चालू करण्यात आलेल्या फेर्‍यांच्या चालक-वाहकांची मनमानी, यामुळे प्रवासी कमालीचे संतप्तही झाले आहेत. एसटी प्रवाशांच्या अडचणीबाबत राजकारणी किंवा लोकप्रतिनिधी कधी चकार शब्दही काढत नसल्याने प्रवाशांना कुणी वाली नाही, अशी सध्या परिस्थिती आहे. तोंड दाबून बुक्क्याचा मार याप्रमाणे प्रवाशांना मनमानी सहन करावी लागत आहे.

- Advertisement -

अनेकदा पेण ते पाली असा प्रवास करतो. पेण आगार आणि काही अंशी रोहे आगाराच्या बस वगळता महाड, श्रीवर्धन, मुरुड, माणगाव या आगाराच्या चालकांना सर्व्हिस रस्त्यांचे वावडे असल्याचे लक्षात येते. काही वाहक तर सर्व्हिस रस्ता येण्यापूर्वीच डबल बेल देतात. एखाद्या प्रवाशाने या प्रकाराबद्दल वाहकाला हटकलेच तर उर्मट उत्तर दिले जाते. एसटीची प्रवासी सेवा गुंडाळायची असेल तर मग मात्र ही मनमानी योग्यच आहे!
– पी. संतोष, पेण

काही वर्षांपूर्वी नेरूळ, बेलापूर उड्डाण पुलावर हाच अनुभव यायचा. पण मनमानी करणार्‍या चालक-वाहकांना उड्डाण पथकांनी (फ्लाईंग स्कॉड) वठणीवर आणण्याचे चोख काम केले होते. असाच जमालगोटा आता मुंबई-गोवा मार्गावर मनमानी करणार्‍या वाहक-चालकांना द्यावा, म्हणजे प्रवाशांची किंमत त्यांना कळेल.
-अपर्णा वाडकर, पेण

- Advertisement -

एसटीच्या बहुतांशी बस उड्डाण पुलावरून जात असल्याने गैरसोय होत आहे. सायंकाळनंर हमखास आणि काहीवेळा दिवसाही वडखळ स्थानकात बस येत नाहीत, सर्व्हिस रोडचा वापर होत नाही, हा आगाऊपणा किती दिवस चालणार आहे? बस नसेल तर पडणारा भुर्दंड एसटीचे अधिकारी परत करणार आहेत का? विभागीय नियंत्रक आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी केबिनमधून बाहेर पडून दर आठवड्याला आपल्या चालक-वाहकांची मनमानी अनुभवावी.
-राजेश पाटील, प्रवासी

प्रत्येक थांब्यावरील प्रवासी घेतलाच पाहिजे. मुंबई-गोवा महामर्गावरील उड्डाण पुलाशेजारील सर्व्हिस रोड अर्थात पर्यायी रस्त्याचा वापर करावा, अशा सक्त सूचना चालक, वाहकांना देण्यात आल्या आहेत, असे रायगड-पेण विभागीय नियंत्रक
अनघा बारटक्के यांचे म्हणणे आहे.

 

-प्रदीप मोकल


हेही वाचा – यंदाही कोरोनामुळे दहीहंडीचे थर लागणार नाहीत


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -