घरताज्या घडामोडीवेतनाविना साजरे होताहेत एसटी कर्मचाऱ्यांचे सण

वेतनाविना साजरे होताहेत एसटी कर्मचाऱ्यांचे सण

Subscribe

एसटीची गाडी पुन्हा एकदा रस्त्यावर धावू लागली असली तरी पुन्हा कर्मचार्‍यांचे पगारा अभावी वांधे झाले आहेत.

कोरोना काळात एसटीची आर्थिक संकटात रुतलेली चाके आता काही प्रमाणात बाहेर येऊन पूर्ववत होत आलेली असताना कर्मचार्‍यांपुढे मात्र पगारा अभावी, तसेच वैद्यकीय बिलांच्या अभावी जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळेवर पगार नसल्याने या कर्मचार्‍यांवर ॠण काढून सण साजरे करण्याची वेळ आली आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था असलेल्या एसटी महामंडळाला कोरोनातील निर्बंधाचा मोठा फटका बसला. प्रवासी आणि माल वाहतूक हेच उत्पन्नाचे प्रमुख मार्ग बंद असल्याने एसटीचा आधीच खोलात असलेला गाडा आणखी खोलात गेला. त्यातच राज्य शासनाकडून निधी उपलब्धतेत विलंब होत असल्याचा मोठा परिणाम कर्मचार्‍यांच्या पगारावर देखील झाला आहे. एकीकडे पगार वेळवर होत नसताना कर्मचार्‍यांची वैद्यकीय बिले देखील रखडली असल्याने कर्मचार्‍यांचा मनःस्ताप आणखी वाढला आहे. त्यातच येणारे सण कसे साजरे करावे, हाही प्रश्न कर्मचार्‍यांपुढे आहे.

यापूर्वीही कोरोना काळात एसटी व्यवस्था संपूर्ण बंद असल्याने वेतनाचा प्रश्न गंभीर झाला होता. आता एसटीची गाडी पुन्हा एकदा रस्त्यावर धावू लागली असली तरी पुन्हा कर्मचार्‍यांचे पगारा अभावी वांधे झाले आहेत. रायगड विभागातील पेण, महाड, श्रीवर्धन, माणगाव, अलिबाग, मुरुड, कर्जत, रोहे या ८ आगारांत २ हजार २७१ कर्मचारी काम करीत आहेत. यामध्ये ५०३ वाहक, ४९३ चालक असून, १९ वर्ग दोनचे अधिकारी आणि ८०६ प्रशासकीय, कार्यशाळा कर्मचारी काम करीत आहेत. वेळेत वेतन मिळेल का, याकडे या कर्मचार्‍यांचेही लक्ष लागून राहिले आहे.
चौकट

- Advertisement -

पगार दोन महिन्यांतून एकदा

कोरोना काळात असलेल्या निर्बंधांमुळे एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. या काळात देखील कर्मचार्‍यांना पगार बंदच होता. निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रवासी आणि मालवाहतूक कार्गो सेवा सुरू झाली. सुरुवातीला प्रवाशांचा प्रतिसाद देखील अल्प प्रमाणात होता. एसटीचा मुख्य प्रवासी असलेल्या खेडेगावातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी जावा लागला. यामुळे निर्बंध शिथिल झाले असले तरी हवे तसे उत्पन्न वाढले नसल्याचा परिणाम कामगारांच्या पगारावर होत आहे. दर महिन्याच्या ७ तारखेला होणारा पगार दोन महिन्यांतून एकदा होऊ लागला.

वैद्यकीय बिले ८ महिने मिळेनात

एकीकडे कामगारांचे पगार वेळेवर होत नसताना कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मेडिकल सुविधांची बिले देखील वेळेत मिळत नसल्याने कामगार मेटाकुटीला आले आहेत. कोरोना काळात पगार बंद, आता पगार वेळेवर नाही आणि त्यात स्वतःसह कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणाकडे देखील दुर्लक्ष होत आहे.

- Advertisement -

उपचारवर झालेला खर्च कोठून आणायचा?

कोरोनाबरोबर इतर आजारांमुळे पत्नी आणि मुलांचे आरोग्य बिघडले होते. महामंडळाने नेमून दिलेल्या डॉक्टरकडे औषधोपचार केला त्याची बिले देखील कार्यालयामध्ये जमा केली. मात्र अद्यापपर्यंत त्याची रक्कम जमा झाली नसल्याचे एका कर्मचार्‍याने सांगितले.

येणारे सर्व सण साधेपणाने

सध्या विविध सण सुरू आहेत. गणेशोत्सवासारखा मुख्य सण देखील पगार नसल्याने साधेपणाने साजरा केला. आमच्या कुटुंबाला सर्व सण साधेपणाने साजरे करावे लागत आहे. पैशाची आवक बंद आहे, मात्र कुटुंबावरील खर्च तेवढाच करावा लागतो, अशी व्यथा कर्मचारी मांडतात.

महामंडळाकडे असलेल्या निधीच्या उपलब्धतेप्रमाणे कर्मचार्‍यांचे पगार आणि वैद्यकीय बिले दिली जात आहेत.
-अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक, रायगड

                                                                                                             वार्ताहर- प्रदीप मोकल

हे ही वाचा – ब्रिटनने भारतीय कोविशील्डला’ या’ कारणांसाठी मान्यता दिली नव्हती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -