ठाण्यात कोरोनाचा कहर; ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू

ठाण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ठाणे महापालिका क्षेत्रात १६ ठिकाणं कोरोना हॉटस्पॉट म्हणून निश्चित केली आहेत.

lockdown
लॉकडाऊन

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. एकीकडे कोरोनाचे लसीकरण सुरु असताना दुसरीकडे मात्र, नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा अनेक ठिकाणी दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होत असून याचपार्श्वभूमीवर ठाणे शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ठाण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून १६ ठिकाण कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आली असून येत्या ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तसेच याबाबत कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.

याठिकाणी ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन

कळवा प्रभाग समिती क्षेत्रात विटावा, आईनगर, सुर्यनगर, खारेगाव परिसर हे भाग हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर, परिमंडळ दोनमध्ये चेंदणी कोळीवाडा, वागळे आणि श्रीनगर हे भाग कोरोना हॉटस्पॉट आहेत. तर परिमंडळ ३ मध्ये सर्वाधिक हॉटस्पॉट असून यात माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील बाळकुम, लोढा, लोढा आमारा, हिरानंदानी इस्टेट, हिरानंदानी मेडोज गृहसंकुले या भागाचा समावेश आहे. लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात दोस्ती विहार, शिवाई नगर, कोरस टॉवर, कोलबाड, रुस्तुमजी हा परिसरसुद्धा हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. हॉटस्पॉट वगळता ठाण्यातील बाकीच्या परिसरातील व्यवहार राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार चालतील, असे सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – Maharashtra Budget Session Live Update: अखेरच्या दोन दिवसात विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा सुटणार?