घरसंपादकीयओपेड‘उद्धव ठाकरेमुक्त’ मुंबईचे स्वप्न...

‘उद्धव ठाकरेमुक्त’ मुंबईचे स्वप्न…

Subscribe

केंद्रात आणि राज्यात भाजपप्रणित सरकार असल्यामुळे कधी नव्हे ती मुंबई महापालिका जिंकण्याची सुवर्णसंधी भाजपाला चालून आली आहे, त्यामुळे भाजप आयती चालून आलेली संधी सोडणार नाही. त्यामुळेच आता भाजपच्या ‘मिशन मुंबई महापालिका’ या घोषणेवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना कशी रिअ‍ॅक्ट होते आणि त्याबरोबरच प्रामुख्याने मुंबईकर शिवसेना-भाजपमधील या अटीतटीच्या लढाईकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतात, यावरच मुंबई महापालिका ही पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातात जाईल की दिल्ली, महाराष्ट्राप्रमाणे मुंबई महापालिकेतही सत्तांतर होईल याचे उत्तर मुंबई महापालिकेच्या निकालांमध्ये पाहायला मिळू शकते. सध्या भाजप मात्र उद्धव ठाकरेमुक्त मुंबई करण्याचे स्वप्न घेऊन कामाला लागल्याचे दिसत आहे.

भारतीय राजकारणाचे नवे चाणक्य आणि भाजपच्या केंद्रीय राजकारणातील प्रमुख नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई भेटीवर आले आहेत आणि गणपती दर्शनाच्या निमित्ताने त्यांनी भाजपचे ‘मिशन मुंबई महापालिका’ जाहीर करून टाकले आहे. मुंबई महापालिका हे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे हे सत्ताधारी शिवसेनेपासून ते देशाची सत्ता चालवणार्‍या भाजपापर्यंत सर्वच राजकीय पक्षांना चांगल्यापैकी माहिती आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राचे राजकारण हे पुढील काही महिने तरी मुंबई महापालिकेभोवती केंद्रित राहणार आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापासून ते राज्यातील नेत्यांच्या राजकीय भेटीगाठींचा आणि डावपेचांचा जर विचार केला तर भाजपला यावेळी कोणत्याही परिस्थितीत सोन्याचे अंडे देणारी मुंबई महापालिकेसारखी कोंबडी ही स्वतःच्या ताब्यात घ्यायची आहे. आतापर्यंत शिवसेना ही भाजपशी युतीमध्ये असल्यामुळे भाजपला मुंबई महापालिकेत शिरकाव करण्यास आपल्या जुन्या मित्र पक्षाचाच मोठा अडथळा येत होता. मात्र 2019 नंतर शिवसेनेचा हा अडथळादेखील दूर झाला आहे.

- Advertisement -

केंद्रात आणि राज्यात भाजपप्रणित सरकार असल्यामुळे कधी नव्हे ती मुंबई महापालिका जिंकण्याची सुवर्णसंधी भाजपाला चालून आली आहे, त्यामुळे भाजप आयती चालून आलेली संधी अशी सहजासहजी वाया जाऊ देईल याची तीळ मात्र शक्यता नाही. त्यामुळेच आता भाजपच्या ‘मिशन मुंबई महापालिका’ या घोषणेवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना कशी रिअ‍ॅक्ट होते आणि त्याबरोबरच प्रामुख्याने मुंबईकर शिवसेना-भाजपमधील या अटीतटीच्या लढाईकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतात, यावरच मुंबई महापालिका ही पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातात जाईल की दिल्ली, महाराष्ट्राप्रमाणे मुंबई महापालिकेतही सत्तांतर होईल याचे उत्तर मुंबई महापालिकेच्या निकालांमध्ये पाहायला मिळू शकते.

मुंबई हे जागतिक दर्जाचे महानगर आहे. भारताची आर्थिक राजधानी आहे आणि त्यामुळे सहाजिकच मुंबई महानगराचा व्याप सांभाळणारी मुंबई महापालिका ही मुंबईकर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये कोणाच्या ताब्यात देणार यावर इतर कोणाचे नसले तरी शिवसेनेचे आणि विशेषत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. मुंबई महापालिकेचा आर्थिक डोलारा मोठा आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा नावलौकिक आहे. मुंबई येथे आर्थिक चळवळीचे केंद्र आहे तसेच ते सामाजिक आणि राजकीय चळवळीचेदेखील केंद्र आहे. त्यामुळे मुंबईत घडणार्‍या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींचे पडसाद हे राष्ट्रीय पातळीवर आणि अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील परिणाम घडवणारे असतात. शिवसेना आणि मुंबई महापालिका यांचे अत्यंत वेगळे नाते आहे. शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासात मुंबई महापालिकेने शिवसेनेला सदैव साथच दिलेली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दृष्टीने बघायचे झाल्यास मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी प्राणवायू आहे. त्यामुळे मुंबईकर हा प्राणवायू पुन्हा एकदा शिवसेनेसाठी उपलब्ध करून देतात की भाजपला साथ देतात याचा फैसला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी मुंबईकर करताना दिसणार आहेत.

- Advertisement -

देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता असो व भाजपची मुंबई महापालिकेवर आजपर्यंत तरी सदैव शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. 2014 पूर्वी राज्यात आणि केंद्रात काँग्रेस प्रणित सरकार असताना शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेकडे राज्यातील आणि केंद्रातील काँग्रेस नेते फारसे बारकाईने लक्ष घालत नसत. काँग्रेसच्या या भूमिकेमागे प्रादेशिक पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पाठबळ मिळत राहावे आणि केंद्रात अथवा राज्यात जेव्हा काँग्रेसला शिवसेनेची गरज भासत असे त्यावेळी शिवसेनादेखील कधी मराठीच्या मुद्यावरून तर कधी राष्ट्रीय कारणांसाठी काँग्रेसच्या पाठीशी उभी राहत असे. यूपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या तत्कालीन उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना मराठीच्या मुद्यावरून तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रहितासाठी एनडीएची साथ सोडून शिवसेनेने त्यावेळी मतदान केले होते हे या दृष्टीने लक्षात घ्यावे लागेल.

काँग्रेस प्रमाणेच भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि अगदी महाराष्ट्रातील भाजपचे नेतेदेखील मुंबई महापालिका ही त्यांच्या मित्र पक्षाकडे अर्थात शिवसेनेकडे असल्यामुळे यापूर्वी तरी मुंबई महापालिकेकडे गांभीर्याने पाहत नव्हते. 2017 साली मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तर शिवसेनेला 84 जागांवर विजय मिळवता आला होता तर भाजपचे तब्बल 82 नगरसेवक मुंबई महापालिकेवर निवडून आले होते, मात्र असे असताना शिवसेना ही भाजपबरोबर महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्तेत असल्यामुळे तसेच शिवसेना ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असल्यामुळे भाजपने 82 नगरसेवक निवडून आल्यानंतरही मुंबई महापालिकेतील सत्तेवर पाणी सोडले होते. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यावेळची भूमिका शिवसेनेच्या खूप पथ्यावर पडली होती. भाजपचे स्वबळावर 82 नगरसेवक मुंबई महापालिकेत निवडून आल्यानंतर वास्तविक मुंबईतील भाजप नेत्यांची इच्छा ही जर शिवसेनेबरोबर युती म्हणून मुंबई महापालिकेत कारभार करायचा असेल तर सत्तेचे समान विभाजन ही होती.

मुंबईतील भाजप आणि त्यांच्या या अपेक्षेत तसं काही चुकीचं नव्हतं. मात्र त्यानंतरदेखील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेमुळे भाजपने मुंबई महापालिकेतील युतीमध्ये मिळणारी सत्ता पदे नाकारून मुंबई महापालिकेत पहारेकरी म्हणून कारभारावर लक्ष ठेवण्याची भूमिका घेतली. तसं बघायचं झाल्यास शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये केवळ दोन सदस्यांच्या संख्याबळाचाच प्रश्न होता अर्थात त्यानंतर शिवसेनेने मनसेचे नगरसेवक शिवसेनेत आणले अन्य काही नगरसेवक शिवसेनेत आणले आणि शिवसेनेचे संख्याबळ हे शंभरच्या पुढे नेऊन ठेवले.

अर्थात 2019 नंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आणि त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात आणि मुंबईतदेखील शिवसेना जर बरोबर नसेल तर पुढे काय या प्रश्नावर उत्तर शोधण्याची नितांत गरज भासू लागली. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी त्यावेळी शिवसेनेचे राजकीय अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर घरोबा करून महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडवले. तथापि हे सत्ता परिवर्तन घडवत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा अधिक शिवसेनेला याची मोठी किंमत ही नजीकच्या भविष्यकाळात मोजावी लागणार होती आणि याचा विचार शिवसेनेच्या नेतृत्वाने केला नसेल असेही समजण्याची काही कारण नाही. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर घरोबा करताना भाजपशी असलेले वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध हे शिवसेनेने एक प्रकारे मोडीत काढलेले होते. शिवसेनेच्या या सत्ता परिवर्तनाच्या खेळीवर भाजपच्या केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वाला उत्तर शोधण्यास 2022 साल उजाडावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेत बंडाळी माजली आणि शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी शिवसेनेचे 40 आणि इतर अपक्ष व छोटे पक्ष मिळून तब्बल 50 ते 51 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त करत स्वतःचेच पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांना पदावरून खाली खेचले. त्यामुळे महाराष्ट्राचे आताचे राजकीय चित्र हे शिवसेनेसाठी आणि त्याहीपेक्षा म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी फारसे आशादायक असण्याची शक्यता जवळपास धूसर आहे.

तीन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले आहे. तीन महिन्यांपूर्वी जे उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या सर्वोच्च सत्तास्थानी अर्थात मुख्यमंत्री पदावर होते त्याच उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यांच्याच अस्तित्वाचा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेत जी बंडाळी माजली त्यावरून शिवसेना आणि ठाकरे यांच्यात दुरावा निर्माण करण्यात किंबहुना तसे चित्र उभे करण्यात भाजपला बर्‍यापैकी यश आले आहे, असे दिसत आहे. उद्धव ठाकरे हे सध्या कधी नव्हे त्या अडचणीच्या डोंगरांमध्ये अडकलेले आहेत. शिवसेनेची मुलुख मैदान तोफ आणि उद्धव ठाकरे यांचे थिंक टँक समजले जाणारे संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत. त्यामुळे भाजपला अंगावर घेणारे राऊत यांच्यासारखे आक्रमक नेतृत्व आजमीतीला तरी शिवसेनेकडे नाही.

उद्धव ठाकरे यांना सर्व बाजूंनी कोंडीत पकडले असल्यामुळे ही कोंडी कशी फोडायची याचेही ज्ञान शिवसेना नेत्यांना असावे असे त्यांच्या कोणत्याही विधानांवरून अथवा हालचालींवरून दिसत नाही. एकीकडे मुंबई महाराष्ट्रातील मराठी माणसाला न्याय देण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे स्वतःच्या घरातील राज ठाकरे यांनादेखील सत्तेपासून खड्यासारखे दूर लोटत राहायचे ही सेना नेतृत्वाची दुटप्पी भूमिका सर्वसामान्य मराठी माणसांना सदैव संभ्रमात टाकणारी आहे. भाजपचे केंद्रीय नेत्यांपासून ते राज्यातील नेतेदेखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी सतत संपर्कात असतात. त्यांच्या भेटी गाठी घेत असतात, याकडे जरी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी थोडे गांभीर्याने पाहिले असते तरीदेखील मुंबईवरचा शिवसेनेचा आणि पर्यायने मराठी माणसाचा वरचष्मा हा भविष्यकाळातदेखील तसाच अबाधित राहू शकला असता. मात्र सत्ता मुंबई महापालिकेतील असो राज्यातील असो की अगदी ठाणे नाशिक पुणे यासारख्या महापालिकांमधील असो त्यामधील सत्तेचे लोणी हे दुसर्‍या पक्षांनी ओरपले तरी चालेल मात्र ते मनसेला म्हणजेच पर्यायाने राज ठाकरे यांना मिळू नये याची काळजी सेना नेतृत्व आजवर घेत आले आहे.

त्यामुळेच काँग्रेस भाजप नेत्यांना राज ठाकरे यांचे महत्व कळते ते महत्त्व त्यांचेच बंधू असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इतक्या वर्षात कळू नये हेच मुंबई आणि महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यामुळे शिवसेनेची आजची अवस्था आहे त्याच्या मुळाशी हे प्रमुख कारण आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्येदेखील ज्या पक्षाचा महाराष्ट्रात मुख्यमंत्री होता तो पक्ष महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर फेकला गेला होता. राज्यात सत्तेवर असताना आणि महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता असताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेला चौथ्या क्रमांकावर का जावे लागले याचे साधे आत्मपरीक्षण करण्याची ही आवश्यकता त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून नाही, परंतु शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून तरी उद्धव ठाकरे यांना का वाटली नाही?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना म्हणजे मराठी माणूस असे जे एक समीकरण मुंबई महाराष्ट्रात रूढ झाले होते ते समीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये हळूहळू कमकुवत होत गेले. राज्याच्या आणि महापालिकांच्या सत्तेमध्ये मशगुल असलेल्या शिवसेना नेत्यांना याचेदेखील कधी काही वाटले नाही. आजची शिवसेनेची अवस्था पाहिली तर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपची साथ आहे, मराठी माणसाच्या मुद्यावर जन्म झालेल्या आणि आता हिंदुत्वाकडे वाटचाल करणार्‍या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ना साथ आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतदेखील दुफळी माजली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे या अत्यंत विपरीत आणि प्रतिकूल परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकण्याचे शिवधनुष्य पेलण्याची क्षमता आहे का हादेखील आजच्या घडीचा प्रश्न आहे. भाजपने मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी जे पद्धतशीर नियोजन केले आहे ते जर लक्षात घेतले तर शिवसेनेच्या हातून मुंबई महापालिका गेल्यात जमा आहे असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. आणि एकदा का मुंबई महापालिका उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेली तर एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही जे काही शिवसेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत तेदेखील हळूहळू शिवसेनेपासून दुरावत जातील, हा धोका तरी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी वेळीच ओळखण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -