घरताज्या घडामोडीनवे संसद भवन आत्मनिर्भर भारताची साक्ष ठरणारे असेल

नवे संसद भवन आत्मनिर्भर भारताची साक्ष ठरणारे असेल

Subscribe

काळ आणि गरजेच्या अनुषंगाने स्वतःमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न आहे. नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताची साक्ष ठरणारे असेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ’सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला त्यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते.

आपल्या सध्याच्या संसद भवनाने स्वातंत्र्याचे आंदोलन आणि नंतर स्वतंत्र भारताला घडण्यासाठी आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारची निर्मिती देखील इथेच झाली व पहिली संसद देखील इथेच बसली. याच संसद भवनात आपल्या राज्यघटनेची रचना झाली. आपल्या लोकशाहीची पुर्नस्थापना झाली, असे मोदी म्हणाले. अनेक वर्षांपासून नव्या संसद भवनाची गरज जाणवलेली आहे. अशावेळी हे आपल्या सर्वांचे दायित्व ठरते की 21 व्या शतकातील भारताला आता एक नवे संसद भवन मिळावे. याच दिशेने आज हा नवा शुभारंभ होत आहे, असे मोदी यांनी सांगितले.

- Advertisement -

सध्याच्या संसद भवनाला ९२ वर्ष झाली आहेत. या संसद भवनाला लागूनच नव्या संसद भवानाची भव्य इमारत उभी राहणार आहे. यासाठी तब्बल ९७१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधान मोदींनी आज या प्रकल्पाचे भूमीपूजन केले. यावेळी गणेश पूजन आणि विष्णूसह वराहचेही पूजन करण्यात आले. यासोबतच सर्वधर्म प्रार्थनेचेही आयोजन करण्यात आले होते. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी नव्या संसद भवनाचे उदघाटन करण्याचा सरकारचा मानस आहे.

नवीन संसद भवनाविषयी महत्त्वपूर्ण 11 वैशिष्ठ्ये
1. संसदेच्या नवीन इमारतीचे क्षेत्रफळ 64,500 चौरस मीटर एवढे असेल आणि त्याचा अंदाजित एकूण खर्च 971 कोटी रुपये असेल.
2. संसदेची नवीन इमारत भूकंप रोधक असेल. या इमारतीच्या निर्मितीचे काम प्रत्यक्षात 2000 लोक करतील, तर 9000 लोक अप्रत्यक्षपणे या कामात भागीदार असतील.
3. नवीन संसदेच्या इमारतीत एकावेळी 1224 सदस्य बसू शकतील. तर सध्याच्या श्रम शक्ती भवनाच्या (संसद भवन जवळ) ठिकाणी दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची कार्यालये उभारली जातील.
4. संसदेची सध्याची इमारत देशाच्या पुरातत्व खात्याकडे सुपूर्द केली जाईल आणि ऐतिहासिक वारसा म्हणून त्याचे जतन करण्यात येईल. या नवीन इमारती भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षांना आमंत्रित केले गेले आहे.
5. नवीन संसद भवनाच्या निर्मितीच्या वेळी वायू आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आवश्यक ते उपाय केले आहेत.
6. नवीन संसद भवनात संसदेच्या सर्व सदस्यांसाठी स्वतंत्र कार्यालये असतील. ज्यामध्ये अत्याधुनिक डिजिटल सोयी सुविधा असतील. हे एक ती डिजिटल इंडियाच्या दृष्टीने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्याचबरोबर येथे एक विशाल संविधान कक्ष असेल. शिवाय संसद सदस्यांसाठी पुस्तकालय, विविध समित्यांचे कक्ष, भोजन कक्ष आणि पार्किंगची सुविधा असेल.
7. संसद भवनात लोकसभा कक्षात 888 सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था केली जाईल. तर राज्यसभा कक्षात 384 सदस्य बसू शकतील. भविष्यात संसद सदस्यांची संख्या वाढू शकते, हे लक्षात घेऊन बैठक व्यवस्था जास्तीची बनवली जात आहे.
8. सध्या लोकसभेत 543 आणि राज्यसभेत 245 सदस्य आहेत. या इमारत उभारणीची ठेकेदारी टाटा प्रोजेक्ट लिमिटेडकडे आहे. हे नवीन संसद भवन सेंट्रल विस्टा प्रकल्पांच्या अंतर्गत आहे. सध्याच्या संसदेच्या इमारतीजवळच याचे बांधकाम केले जाणार आहे.
9.लोकसभा सदनाचा आकार सध्याच्या तुलनेत तीन पट असेल आणि राज्यसभा सदनही सध्याच्या तुलनेत मोठे असेल. हे नवीन संसद भवन आतून भारतीय संस्कृतीने प्रामुख्याने कला, शिल्प व वास्तूकला आदीने सजवलेले असेल.
10. ही नवीन इमारत अत्याधुनिक सोयी सुविधांनी आणि संरक्षणाच्या दृष्टीनेही परिपूर्ण आहे. ही इमारत त्रिकोणात्मक आकाराची असेल.
11. सरकारने सांगितले की, संसदेची नवीन इमारत २०२२ मध्ये म्हणजेच स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षपूर्ती पर्यंत पूर्ण होईल.

- Advertisement -

नवे संसद भवन हा अतिशय प्रभावी प्रकल्प आहे. त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले ही मी माझे भाग्य समजतो.
-रतन टाटा, उद्योजक.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -