घरCORONA UPDATEई-पास, क्वारंटाईनचे दिवस कमी; गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना लवकरच गोड बातमी

ई-पास, क्वारंटाईनचे दिवस कमी; गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना लवकरच गोड बातमी

Subscribe

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी अधीर झालेल्या मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता आहे. चाकरमान्यांसाठी बसची सुविधा, ई पासची व्यवस्था, क्वारंटाईनचा कालावधी, वैद्यकीय सुविधा यावर कोकणातील लोकप्रतिनिधींची आज सविस्तर चर्चा झाली. लोकप्रतिनिधींची चर्चा आणि प्रशासनाची भूमिका याचा तपशील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे दिला जाईल. त्यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोरोनामुळे अनेक आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या समोरील नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये कोकणातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, खासदार, विनायक राऊत, सुनील तटकरे, आमदार योगेश कदम, भरत गोगावले, महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते इतर आमदार व्हिडिओ काँन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते.

- Advertisement -

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परब यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, या बैठकीला कोकणातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करता येईल? यावर चर्चा झाली. मुंबईतील चाकरमानी कोकणात कसे जातील आणि त्यांची राहण्याची व्यवस्था हे दोन विषय होते. कोकणात गेल्यावर त्यांना क्वारंटाईन कुठे आणि कसे करायचे? यावर चर्चा झाली. किंबहुना कमीत कमी लोकांनी मुंबईतून कोकणात जावे, असे आवाहन करायचे आहे. कारण दुर्देवाने कोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्याचा सामना करण्यासाठी तेवढी वैद्यकीय सुविधा किती आहे यावरही चर्चा झाली. या बैठकीतील लोकप्रतिनिधींची मते आणि प्रशासनाची भूमिका याचा सारांश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे दिला जाईल. त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. मग त्या अनुशंघाने चाकरमान्यांचा प्रवास आणि इतर गोष्टींवर चर्चा होऊन त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अनिल परब म्हणाले.

क्वारंटाईनच्या कालावधीवर चर्चा

कोकणात गेल्यावर चाकरमान्यांना किती दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाईल, या प्रश्नावर उत्तर देताना अनिल परब म्हणाले की, आयसीएमआर आणि आरोग्य विभागाची मार्गदर्शक तत्वे तपासून पाहिली जातील. त्यामध्ये शिथिलता देता येईल का? तपासले पाहिजे. या सर्वांची माहिती घेऊन त्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

चाकरमान्यांची संख्या समजेल

बस प्रवासासाठी जिल्हा बंदी आणि ई पासेसच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ई पास दिले तर कोकणात किती लोक गेले त्याचा आकडा समजेल त्यादृष्टीने वैद्यकीय सुविधा द्याव्या लागतील. त्यासाठी कोकणात जाणाऱ्या लोकांची संख्या सरकारला माहिती असलीच पाहिजे. मुंबईतून कोकणात गेल्यावर अनेकांची घरे उघडावी लागतात. कोकणात गेल्यावर घराची साफसफाई, कोकणात जाण्यासाठी बसची व्यवस्था, बस प्रवासाची परवानगी आणि प्रत्यक्ष बस प्रवासाला परवानगी मिळाल्यावर बसेस उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. या बैठकीच्या निमंत्रणाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मंत्री आणि प्रशासनाची ही बैठक होती. या बैठकीचे कोणालाच निमंत्रण नव्हते. मुंबई व कोकणातील लोकप्रतिनिधी योगायोगाने मुंबईत होते ते स्वतःहून बैठकीला उपस्थित राहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -