मरणाआधी कोरोना रुग्णाचा सेल्फी व्हिडिओ, ‘बाबा…!’

34 year old corona patient death in hyderabad last message to his father goes viral

देशात कोरोना रुग्णांची संख्या जवळपास ५ लाखांच्यावर पोहोचली आहे. दररोज मृत्यूची संख्याही वाढत आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबादमधून एक अतिशय दुःखद घटना समोर आली आहे. कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ३४वर्षीय या रूग्णाने मृत्यू होण्यापूर्वी आपल्या कुटूंबाला कॉल आणि मेसेजही केले होते.

हैदराबादच्या चेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रवि कुमार नावाच्या कोरोना रूग्णाचे शुक्रवारी निधन झाले. कुटुंबीयांना दिलेल्या या व्हिडिओ मेसेजमध्ये रवी असं म्हणतोय, ‘बाबा, मला श्वास घेता येत नाही. वारंवार सांगूनही त्याने माझे व्हेंटिलेटर काढले. मला तीन तास ऑक्सिजन मिळत नव्हता. आता मी अजून श्वास घेऊ शकत नाहीये. माझा श्वास आता थांबत आहे.’

मृतांचे नातेवाईक सातत्याने रुग्णालयावर आरोप करत आहेत.  ते म्हणतात की हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांनी व्हेंटिलेटर काढून टाकले होते, त्यामुळे त्याला श्वास घेण्यात त्रास होत होता आणि श्वास थांबला. रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे त्यांच्या मुलाने तीन तास अत्याचार सहन केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.  रवीचे वडील व्यंकटेश यांनी एक सेल्फी व्हिडिओ प्रसिद्ध करून तेलंगणा सरकारवर आरोप केले आहेत. ते म्हणातात, ‘माझ्या मुलाला १००-१०१ अंशांचा ताप होता. २३ तारखेला जेव्हा त्याला दवाखान्यात नेण्यात आले तेव्हा त्याला कोरोनाची लक्षणं असल्याचे सांगितले गेलं. आम्हाला कोरोना टेस्ट प्रथम आणण्यास सांगण्यात आले. आम्ही १०- १२ हॉस्पिटल पालथी घातली.  त्यानंतर २४ तारखेला मुलाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला चेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे काय झाले माहित नाही. कोरोनाचा अहवाल आला नाही. माझ्या मुलाचा सेल्फी व्हिडिओ पाहून मी खूप हादरलो.