Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश खलिस्तान्यांची निदर्शने सुरू असतानाच लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर फडकला मोठा राष्ट्रध्वज

खलिस्तान्यांची निदर्शने सुरू असतानाच लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर फडकला मोठा राष्ट्रध्वज

Subscribe

नवी दिल्ली : खलिस्तानी नेता अमृतपाल सिंगविरोधातील कारवाईच्या निषेधार्थ खलिस्तान समर्थकांनी बुधवारी लंडनमध्ये निदर्शने केली. ही निदर्शने सुरू असतानाच लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर मोठा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या समोर बुधवारी 2,000हून अधिक खलिस्तान समर्थक पुन्हा जमा झाले होते. त्यावेळी भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी इमारतीच्या छतावर उभे राहात राष्ट्रध्वजाने दर्शनी भाग झाकला. त्यामुळे चिडलेल्या काही खलिस्तान समर्थकांनी पोलिसांवर शाई आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्या.

खलिस्तानी समर्थकांनी रविवारी इमारतीबाहेरील भारतीय ध्वज खाली खेचल्यानंतर त्यांना चोख प्रत्युत्तर देत दूतावासाने सोमवारी इमारतीवर छोटा राष्ट्रध्वज फडकावला होता. तर बुधवारी भारतीय उच्चायुक्तालयाच्या डझनभर कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी करत आधी टेरेसवर तिरंगा फडकावला. नंतर इमारतीच्या दर्शनी भागातही आणखी एक तिरंगा लावण्यात आला. तर दुसरीकडे, रविवारी भारतीय उच्चायुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर खलिस्तान समर्थक धडकले होते. पण यावेळी पोलिसांनी या खलिस्तान समर्थकांना रस्त्यावरच रोखले होते. तेथे पोलीस अधिकारी उभे राहून गस्त घालत होते. रविवारच्या घटनेबद्दल भारताने व्यक्त केलल्या नाराजीमुळे यावेळी पोलिसांनी खबरदारी घेतल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

बुधवारी झालेल्या आंदोलनापूर्वीच लंडन पोलिसांनी पूर्ण सज्जता केली होती. ब्रिटिश सरकारने भारतीय उच्चायुक्तालयाच्या संरक्षणाखाली 24 पोलीस बसेस तैनात केल्या होत्या. एवढेच नाही, तर ठिकठिकाणी घोड्यावर स्वार झालेल्या पोलिसांचे पथकही सज्ज ठेवण्यात आले होते. सुरुवातीला खलिस्तानींचे निषेध आंदोलनाला कमी लोकांनी सहभाग घेतला होता, पण जसजशी संध्याकाळ होत गेली तसतशी संख्या वाढत गेली. लंडन पोलिसांनी सांगितले की, संध्याकाळी उशिरापर्यंत सुमारे 2000 निदर्शक घटनास्थळी होते. त्यांनी बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर पाण्याच्या बाटल्या आणि शाई फेकल्याने वातावरण तापले. आंदोलन आणखी तीव्र झाले असते तर, त्यांना पांगवण्याची तयारी पोलिसांनी केली होती.

- Advertisement -

भारताने दिलेल्या झटक्यामुळे लंडनमध्ये खबरदारी
सर्वसामान्यांसाठी अडथळ ठरत असल्याचे सांगत नवी दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेट्स भारताने हटविले होते. ब्रिटिश उच्चायुक्तांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्थाही कमी करण्यात आली होती. रविवारी लंडनमध्ये घडलेल्या घटनेबद्दलची ही नाराजी असल्याचे संकेत लंडन सरकारपर्यंत गेले. त्यानंतर लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाची सुरक्षा वाढवण्यात आली.

- Advertisment -