घरदेश-विदेशअमेरिकन कृषी विभागाचा भारतासोबत करार

अमेरिकन कृषी विभागाचा भारतासोबत करार

Subscribe

‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत प्रमुख पिकांची मूल्यसाखळी विकसीत होणार; दादा भुसे

अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवून राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येत असून त्या माध्यमातून प्रमुख पिकांच्या स्पर्धाक्षम आणि सर्व समावेशक मूल्यसाखळी विकसीत करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाचा कृषी विभाग आणि अमेरिकेचा कृषी विभाग यांच्यात कृषीमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आणि अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेविड रांझ यांनी करारावर स्वाक्षर्‍या केल्या.

महाराष्ट्र आणि अमेरिकेच्या कृषी विभागात परस्पर तांत्रिक सहकार्यासाठी हा सामंजस्य करार झाला. कृषीमंत्री भुसे म्हणाले, या कराराच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकर्‍यांसाठी कल्याणकारी धोरण राबवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार राज्यात ‘विकेल ते पिकेल’ अभियानाच्या माध्यमातून बाजाराभिमुख पिकांच्या लागवडीसाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करतानाच त्या शेतमालासाठी निश्चित अशी बाजार व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्यातून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येत असून प्रमुख पिकांच्या स्पर्धाक्षम आणि सर्व समावेशक मूल्यसाखळ्या विकसीत करण्यात येणार आहेत. याकामी अमेरिकेचा कृषी विभाग तांत्रिक सहकार्य करणार आहे. या कराराच्या माध्यमातून राज्याच्या कृषी विभागाची क्षमताबांधणी करण्यात येईल. कृषी, पणन, बाज़ार माहिती आदी बाबींमध्ये क्षमताबांधणीसाठी काम केले जाईल, असेही कृषीमंत्री म्हणाले. अमेरिकेचे वाणिज्यदूत डेविड रांझ म्हणाले, हा करार महत्वाकांक्षी असून अमेरिकेच्या कृषी विभागाचा भारत सरकारसोबतचा पहिला करार आहे. त्या माध्यमातून द्विपक्षीय क्षमताबांधणी होईल. अमेरिकेचे कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान असून जागतिक अन्नसुरक्षा आणि कापूस तसेच इंधनाची वाढती मागणी या क्षेत्रात संयुक्तरित्या कामास मोठा वाव असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -