घरदेश-विदेशओवैसी म्हणतात, 'मला भारतीय राजकारणातली लैला बनवून ठेवलंय'!

ओवैसी म्हणतात, ‘मला भारतीय राजकारणातली लैला बनवून ठेवलंय’!

Subscribe

AIMIM अर्थात ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुसलिमीन या पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. आता ओवैसींनी केलेलं अजून एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. नुकत्याच हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुका पार पडल्या असून या निकालांमध्ये ओवैसी किंगमेकर ठरले आहेत. त्यामुळे आता भाजप किंवा टीआरएस या पक्षांना हैदराबाद पालिका निवडणुकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी एमआयएमच्या पाठिंब्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर काही स्थानिक वृत्तवाहिन्यांशी बोलताना ओवैसींनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे, हैदराबादमधल्या स्थानिक राजकारणासोबतच सोशल मीडियावर देखील ओवैसींच्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. न्यूज १८ नं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले ओवैसी?

हैदराबाद महानगर पालिका निवडणुकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे इथे युतीच्याच हाती पालिकेचा कारभार असणार आहे. मात्र, यासाठी एमआयएमच्या पाठिंब्याची गरज पडणार आहे. त्यावर बोलताना ओवैसी म्हणाले, ‘मला भारतीय राजकारणातली लैला बनवून ठेवलंय. आणि माझ्या अवती-भवती सगळे मजनू घिरट्या घालू लागले आहेत’. टीआरएस आणि भाजपच्या संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

- Advertisement -

काय आहे हैदराबादमधली आकडेमोड?

हैदराबाद महानगर पालिकेमध्ये एकूण १५० जागांसाठी निवडणुका झाल्या. यापैकी ५६ जागांवर टीआरएस अर्थात तेलंगणा राष्ट्र समिती, ४८ जागांवर भाजप आणि ४४ जागांवर एमआयएमच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून टीआरएसला सत्तास्थापनेची गणितं जुळवावी लागणार आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना एमआयएमच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल. गेल्या निवडणुकीमध्ये टीआरएसने ९९ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांची पालिकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित झाली होती. तर गेल्या वेळी भाजपला फक्त ४ जागा मिळाल्या होत्या. पण यंदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा असा भाजपच्या अनेक दिग्गजांनी हैदराबादच्या प्रचारामध्ये सहभाग घेत ताकद पणाला लावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -