घरदेश-विदेशजर्मनी सरकारने आईपासून लहान बाळाला केले दूर... भारतात सर्वपक्षीय नेते एकवटले

जर्मनी सरकारने आईपासून लहान बाळाला केले दूर… भारतात सर्वपक्षीय नेते एकवटले

Subscribe

2021 मध्ये जर्मनीत राहणाऱ्या एका लहान मुलीला तिच्या पालकांपासून वेगळे केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. 2021 मध्ये ही मुलगी सात महिन्यांची होती. अरिहा शाह असे या मुलीचे नाव असून तिला सध्या बर्लिनमधील बालसुधारगृह ठेवण्यात आले असल्याची माहिती तिच्या आईकडून देण्यात आलेली आहे.

भारत हा असा देश आहे, ज्या देशात सर्वचबाबतीत व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपल्याकडे लहान मुलाला हाताने भरवणे, बाळाचे लडीवाळपणे गाल ओढणे, लहान मुलं चुकले तर त्याला धाक दाखवण्यासाठी मारणे हे सर्व काही संस्काराचा भाग आहे. पण या सर्वांसाठी परदेशातील काही देशांमध्ये मात्र कडक कायदे आहेत. त्यामुळे नॉर्वे किंवा जर्मनीमध्ये राहणाऱ्या पालकांसाठी मुलांचे लाडाने गाल ओढणे किंवा ते चुकल्यावर त्यांना मारणे हा एक प्रकारचा गुन्हा होऊन बसतो. नॉर्वेसह अनेक देशांमध्ये मुलांच्या संगोपनातील छोट्याशा ‘चुकीची’ शिक्षा पालकांना दिली जाते.

हेही वाचा – भावी मुख्यमंत्री, संजय राऊत अन् निवडणुका… नाना पटोलेंनी मांडली भूमिका

- Advertisement -

अशाच एका प्रकरणावर आधारित हिंदी चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ असे या चित्रपटाचे नाव असून काही वर्षांपूर्वी नॉर्वेमध्ये वास्तव्यास असणाऱ्या चॅटर्जी यांना आणि त्यांच्या मुलांना एकमेकांपासून दूर करण्यात आले होते. पण आता पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती जर्मनीमध्ये झाली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये जर्मनीत राहणाऱ्या एका लहान मुलीला तिच्या पालकांपासून वेगळे केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. 2021 मध्ये ही मुलगी सात महिन्यांची होती. अरिहा शाह असे या मुलीचे नाव असून तिला सध्या बर्लिनमधील बालसुधारगृह ठेवण्यात आले असल्याची माहिती तिच्या आईकडून देण्यात आलेली आहे. परंतु तिला लवकरात लवकर पालकांकडे सुपुत्र करावे, अशी मागणी आता भारताच्या खासदारांकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणी भारतातील खासदारांची एकजूट पाहायला मिळाली आहे.

काय आहे प्रकरण?

अरिहाचे पालक 2018 पासून जर्मनीमध्ये वास्तव्यास आहेत. 2021 मध्ये अरिहाला दुखापत झाल्याकारणाने तिच्या पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी डॉक्टरांनी सर्व काही ठीक असल्याचे सांगितले आणि तिला पालकांसमवेत घरी पाठवले. परंतु त्यानंतर ते पुन्हा डॉक्टरांकडे गेले. तेव्हा अरिहाला तिच्या पालकांपासून वेगळे करण्यात आले आणि त्यानंतर तिला थेट बालसंगोपन गृहामध्ये पाठवण्यात आले. 20 सप्टेंबर 2021 मध्ये ज्यावेळी तिला बालसंगोपन गृहात पाठवण्यात आले, तेव्हा ती अवघ्या सात महिन्यांची होती. धक्कादायक बाब म्हणजे अरिहाच्या आई-वडिलांनीच तिच्यावर अत्याचार केल्यामुळे तिला लैंगिक दुखापत झाल्याचे जर्मन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे.

- Advertisement -

पण या प्रकरणाला आता दोन वर्षांचा काळ लोटला असून तिच्या आई-वडिलांनी तिला पुन्हा मिळवण्याची धडपड सुरु केली आहे. अरिहाला परत आणण्यासाठी भारतातील खासदारांनी जर्मनीच्या राजदूतांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये काँग्रेसकडून शशी थरुर आणि अधीर रंजन चौधरी, भाजपच्या खासदार हेमा मालिनी आणि मेनका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे, टीएमसीकडून महुआ मोईत्रा, समाजवादी पक्षाकडून राम गोपाल यादव,आरजेडीकडून मनोज झा, आम आदमी पक्षाकडून संजय सिंह, सीपीएमकडून इलामन करीम आणि जॉन ब्रिटस, अकाली दल पक्षाकडून हरसिमरत कौर, बसपाकडून कुंवर दानिश अली, ठाकरे गटाकडून प्रियांका चतुर्वेदी, सीपीआयकडून बिनॉय विश्वम आणि नॅशनल कॉन्फरन्सकडून फारुख अब्दुल्ला या खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

काय लिहिले आहे पत्रात?

‘भारतीय संसदेच्या दोन्ही गृहांचे सदस्या म्हणून आम्ही 19 पक्षांचे खासदार तुम्हाला पत्र लिहित आहोत. भारतातील दोन वर्षांची मुलगी तुमच्या बालसंगोपन गृहामध्ये आहे तिला तातडीने सोडण्याची विनंती आम्ही करत आहोत. ही मुलगी भारताची नागरिक असून धरा आणि भावेश शाह हे तिचे पालक आहेत. मुलीचे वडील तिथल्या एका कंपनीत काम करत असल्याने हे कुटुंब बर्लिनमध्ये राहत होते. हे कुटुंब आत्तापर्यंत भारतात यायला हवे होते, पण दुःखद घटनेमुळे ते येऊ शकले नाहीत.’

‘आम्ही तुमच्या कोणत्याही संस्थेवर आरोप करत नाही आणि आम्ही तुम्ही जे काही केले ते मुलीच्या हितासाठी केले हे आम्ही समजू शकतो. आम्ही तुमच्या देशातील कायदेशीर प्रक्रियेचा आदर करतो पण या कुटुंबाविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसल्यामुळे मुलीला घरी परत पाठवण्यात यावे.’

‘अरिहाच्या पालकांवर फेब्रुवारी 2022 कोणत्याही प्रकारचा आरोप सिद्ध न झाल्याने जर्मन पोलिसांनी त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले. परंतु त्यानंतरही मुलीला तिच्या पालकांकडे सोपवण्यात आले नाही’, असं देखील खासदारांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे. ‘आमच्या संस्कृतीचे काही नियम आहेत.अरिहा ही जैन धर्माची असल्याने ती पूर्णपणे शाकाहारी आहे. पंरतु या मुलीला मांसाहाराचे जेवण दिले जात आहे.’ असे या पत्रात लिहिण्यात आले आहे.

तर खासदारांच्या या पत्राला जर्मनीच्या परराष्ट्र कार्यालयाकडून उत्तर देण्यात आलेले आहे. सध्या युवक कल्याण कार्यालय आणि कौटुंबिक न्यायालयामध्ये चालू असलेल्या या कार्यवाहीवर कोणतेही भाष्य करता येणार नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर पंतप्रधानांनी या प्रतरणात हस्तक्षेप करून लवकरात लवकर अरिहाला भारतात आणावे, अशी विनंती तिच्या आईकडून करण्यात आलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -