घरदेश-विदेशनिवडणुकीच्या राज्यात कोरोनाचं थैमान; बाधितांच्या संख्येत दुप्पटीने वाढ

निवडणुकीच्या राज्यात कोरोनाचं थैमान; बाधितांच्या संख्येत दुप्पटीने वाढ

Subscribe

देशात कोरोना व्हायरसचा फैलाव अधिक वेगाने होत आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढत असल्याने देशाच्या चिंतेत अधिक भर पडली आहे, अशा परिस्थितीत पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूका जरी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असल्या तरी निवडणुकी दरम्यान ४ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशाला कोरोनाचा विसर पडल्याचे दिसतेय. विधानसभा निवडणुकी दरम्यान, सभा, रॅली, रोड शोसाठी लाखोच्या संख्येने लोकं गर्दी करत कोरोनाचे नियम पायदळी तुडवताना दिसताय, मात्र हेच आता पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पद्दुचेरीला महागात पडलंय. या राज्यात कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होत असून गेल्या एका आठवड्यात या राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दुप्पटीने वाढल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रशासित प्रदेश पद्दुचेरीमध्ये १२ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत प्रत्येक सातव्या व्यक्तीत कोरोना संक्रमणाला दुजोरा मिळाला आहे. ३ हजार ४५१ चाचण्या करण्यात आल्या. त्या चाचण्यांमध्ये ५१२ म्हणजेच १४.८३ टक्के कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळलेत. तर ६ एप्रिल रोजी ३ हजार ०१८ चाचण्यांमध्ये फक्त २३७ म्हणजे ७.८५ टक्के बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली.

- Advertisement -

प्रत्येक सातव्या नमुन्यात रुग्ण कोरोना बाधित

पश्चिम बंगालसह केरळमध्ये प्रत्येक सातवा नमुन्यात रूग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. सोमवारी करण्यात आलेल्या तपासणीच्या आकडेवारींत पश्चिम बंगालमध्ये ३७ हजार १६६ जणांच्या चाचण्यामध्ये ४ हजार ५११ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. ६ एप्रिल रोजी २९ हजार ३९४ नमुन्यांमध्ये फक्त २ हजार ०५८ बाधित होते. तपासणीमध्ये कोरोना संसर्गाचा दर ७ टक्क्यांवरून १२.५३ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे समोर आले. यासोबतच केरळमध्ये सोमवारी ४५ हजार ४१७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५ हजार ६९२ जणांना कोरोना संसर्ग झाला. ६ एप्रिल रोजी बाधितांचा दर निम्म्यापेक्षाही कमी होता. त्याच दिवशी राज्यात ५९ हजार ०५१ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या यामध्ये ३ हजार ५०२ म्हणजे ५.९३ टक्के जण कोरोना बाधित झाल्याची माहिती मिळतेय. तसेच तमिळनाडूत एका आठवड्यात झालेल्या कोरोना तपासणीच्या तुलनेत कोरोना बाधितांचा दर ४.५ टक्क्यांवरून ८.०८ टक्के झाला. १२ एप्रिल रोजी राज्यात ८२ हजार ९८२ जणांच्या कोरोना चाचण्या करण्याच आल्या. त्यात ६७११ बाधित होते. ६ एप्रिल रोजी ८०,८५६ चाचण्यांत ३६४५ रुग्ण निघाले.

पश्चिम बंगाल निवडणूक प्रचार ठरला चिंताजनक

पश्चिम बंगालमधील मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोमवारी बंगालमध्ये आतापर्यंत सर्वाधिक रुग्णवाढ झाली असून ४ हजार ५११ रुग्णांची नोंद झाली. तर मृत्यूदर १.७ झाला असून हा दर महाराष्ट्र इतकाच आहे. कोविड-१९ इंडिया ट्रॅकरनुसार, पश्चिम बंगालमधील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख १९ हजार ४०७ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १० हजार ४१४ जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख ८२ हजार ४६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २६ हजार ५३१ जणांवर उपचार सुरू आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -