घरदेश-विदेशनेत्यांची अटलजींना श्रद्धांजली

नेत्यांची अटलजींना श्रद्धांजली

Subscribe

अटलबिहारी वाजपेयी यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं आहे. संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी माजी पंतप्रधान यांचं निधन झालं आहे. अनेक मान्यवर नेत्यांनी अटलींजा श्रद्धांजली वाहिली आहे. 

अटलबिहारी वाजपेयी यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं आहे. संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी माजी पंतप्रधान यांचं निधन झालं आहे. अनेक मान्यवर नेत्यांनी अटलींजा श्रद्धांजली वाहिली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव 

‘अटलजी यांच्या निधनाने सर्वाधिक लाडके नेते गमावले आहे”: विद्यासागर राव
भारताचे माजी पंतप्रधान भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपले सर्व कार्यक्रम रद्द करून राज्यपाल दिल्लीला रवाना होत आहेत.
“स्वतंत्र्योत्तर भारताच्या राजकीय जीवनात तसेच लोकमानसावर अनेक दशके अधिराज्य गाजविणारे अटल बिहारी वाजपेयी हे देशातील उत्तुंग प्रतिभा लाभलेले शालीन व्यक्तिमत्व होते. ते एक परिपूर्ण संसदपटू, द्रष्टे मुत्सद्दी, अमोघ वक्ते तसेच सुहृद व्यक्ती होते. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताने एक महासत्ता म्हणून आपला न्याय्य हक्क जगापुढे जोरकसपणे मांडला”, असे अटल बिहारी यांच्या मंत्रिमंडळात गृह, उद्योग व वाणिज्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम केले असलेल्या विदयासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशमध्ये म्हटले आहे.
“श्री वाजपेयी माझे राजकीय जीवनातील प्रेरणास्थान होते. सन १९७५ साली मी करीमनगर (तेलंगणा) जिल्हा जनसंघाचा अध्यक्ष असताना श्री वाजपेयी यांनी करीमनगर येथे एका महासभेला संबोधित केले होते. त्यानंतर काही महिन्यांनी आणिबाणी लागली व आम्हाला तुरुंगवास भोगावा लागला. या घटनेनंतर २३ वर्षांनी मला वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात गृह, उद्योग व वाणिज्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या निधनाने देशाने एक अभूतपूर्व आदर व लोकप्रियता लाभलेले राजकारणातील ‘भीष्म पितामह’ गमावले आहे; तर मी माझे लाडके नेते गमावले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने तसेच माझ्या स्वतःच्या वतीने मी वाजपेयी यांच्या स्मृतींना आपली आदरांजली वाहतो, असे विद्यासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वर्गीय अटलजींबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या भावना

श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी…
अटल, अढळ, अचल, नित्य…अटलबिहारी वाजपेयी…
केवळ कुण्या एका व्यक्तीचे हे नाव नाही, तर ते नाव आहे एका महासागराचे…
नावाप्रमाणेच अटल, अढळ, अचल…
ज्यांच्याकडे पाहून राष्ट्रभक्ती या शब्दाचा अर्थ कळतो, ज्यांच्याकडे पाहून राष्ट्राच्या सर्वांगिण विकासाच्या स्वप्नपूर्तीची अभिलाषा जागी होते, आदर्श, सत्यवचनी, कर्तव्य कठोर पण, तितक्याच निर्मळ मनाचा थोर नेता, आधुनिक युगातील एक महापुरूषाचे आज आपल्यातून असे निघून जाणे, मनाला अतिशय अतिशय वेदना देणारे आहे.
आमचे थोरनेते, राष्ट्रपुरूष श्रद्धेय अटलजी यांचे आपल्यातून निघून जाणे, ही माझी वैयक्तिक हानी आहे! ज्या नेत्यांकडे पाहून आपण राजकारणाची पायरी चढलो, त्या आदर्शापैकी श्रद्धेय अटलजी एक! लोकशाहीत विविध आयुधं वापरून समाजाची आणि समाजातील शेवटच्या घटकाची सेवा कशी करता येऊ शकते, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आयुष्यातून घालून दिला. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

- Advertisement -

आज माझ्या बालपणीच्या अनेक आठवणी डोळ्यापुढे तरळत आहेत. स्व. प्रमोदजी महाजन यांच्यासमवेत त्यांची झालेली पहिली भेट, त्यानंतर पुढे त्यांचे सातत्याने होत राहिलेले मार्गदर्शन आणि अगदी अलिकडे त्यांच्या निवासस्थानी झालेली भेट, हा सारा स्वप्नवत प्रवास. श्रद्धेय अटलजींच्या अशा अचानक निघून जाण्याने कधीही भरून न निघणारी एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
तन, मन, धनाने राष्ट्रासाठी अगदी सर्वस्व झोकून देणारे आपल्या सर्वांचेच श्रद्धेय अटलजी हे लाडके नेते. संसद असो की एखादी जाहीर सभा, श्रद्धेय अटलजींना ऐकण्यासारखा दुसरा ज्ञानानंद नाही. ज्ञानाचा महासागर, ओघवत्या वक्तृत्वाचे धनी, त्यागाच्या तपस्वी मूर्तीचे जाणे अतिशय वेदनादायी आहे. कधीही न भरून निघणारी ही हानी आहे.
श्रद्धेय अटलजी त्यांच्या विचार, मार्गदर्शनाच्या रूपाने आम्हा सर्वांना सतत प्रेरणा देत राहतील. केवळ गतकाळातील नाही, तर येणार्‍या अनेक पिढयांचेही ते मार्गदर्शक असतील. या राष्ट्रऋषीला माझे कोटी कोटी वंदन. या दु:खातून बाहेर पडणे किंवा त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य आहे!
श्रद्धेय अटलजी हे केवळ भाजपाचे नाही, तर या देशाचे सर्वोच्च नेते होते. ज्या मोजक्या नेत्यांना जगभर आदर-सन्मान प्राप्त झाला, त्यातील अटलजी एक. विश्वमान्यतेच्या अटलजींचे नेतृत्त्व सर्व राजकीय पक्षांमध्ये सुद्धा सर्वमान्य होते.
एक विशाल हृदयाचा, मोठ्या मनाचा नेता सदैव आपल्यासोबत असावा, अशीच आम्हा सर्वांची इच्छा. पण, नियती कधीच कुणाचे ऐकत नाही. आज जेव्हा भारताच्या परमवैभवाचा प्रवास अतिशय गतीने सुरू आहे, त्या काळात या परमवैभवाच्या प्रवासाचा पाया, ज्यांनी रचला ते आपल्यात असते तर त्यापेक्षा आनंदाचा दुसरा क्षण राहिला नसता.
पण, नियतीला ते मान्य नाही.
अटलजी एका कवितेत म्हणतात,

ठन गई।
मौत से ठन गई।
मै जी भर जिया, मै मन से मरूँ
लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ?

अटलजी आपल्यात नाहीत, हे सत्य स्वीकारताना मन कठोर करावेच लागेल. भारतीय जनता पार्टीच्या देशभरातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या, अटलजींवर ज्यांनी नि:स्सिम प्रेम केले, ते या देशातील तमाम नागरिकांच्या दु:खात मी सहभागी आहे. एकमेकांना धीर देण्याच्या पलिकडे आपल्या हातात तरी काय आहे?
अटल, अढळ, अचल असलेले हे नेतृत्त्व नित्य आपल्यासोबत राहील, विचारांच्या रूपाने, दिशादर्शकाच्या रूपाने, मार्गदर्शकाच्या रूपाने…
माझी भावपूर्ण श्रद्धांजली…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 

अटलजी आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवायला मन तयार नाही. अटलजी आमच्या हृदयात आहेत. सदैव राहतील, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. अहंकार, गर्व, सत्तेतून निर्माण होणारा ताठरपणा त्यांच्यापासून मैलोन् मैल दूर होता. ते सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी होते. तीन वेळा देशाचे पंतप्रधान होते. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व लहान-मोठ्या घटक दलांच्या हातात हात घालून त्यांनी सरकार पुढे नेले. त्यांना भेटण्याचा योग अनेकदा आला. एका वडिलधाऱ्याच्या मायेने त्यांनी प्रेम केले. सदैव आशीर्वाद दिले. त्यांचे निर्मळ मन व सदैव हसतमुख चेहरा म्हणजे भारतीय राजकारणाची प्रेरणा होती. शिवसेनाप्रमुखांशी असलेला त्यांचा स्नेह जगजाहीर होता. अनेक विषयांवर त्यांच्यात चर्चा होत असत. अटलजींच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे ‘एनडीए’ मजबूत राहिली. अटलजींच्या जाण्याने संसदीय लोकशाहीची, देशाची प्रचंड हानी झाली. शिवसेनाप्रमुखांनंतर आम्ही आणखी एक भीष्म पितामह गमावला. त्यांच्या महान व्यक्तिमत्वास सांष्टांग दंडवत घालून आम्ही विनम्र आदरांजली वाहत आहोत. शिवसेना परिवार त्यांना मानवंदना देत आहे. अटलजी, तुमच्यासारखे तुम्हीच. तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

धनंजय मुंडे यांनी वाहिली श्रद्धांजली

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानं भारतीय राजकारणातल्या एका महान पर्वाचा अस्त झाला आहे. देशाचं लाडकं, सर्वमान्य नेतृत्वं आपण गमावलं आहे. अटलजी राजकारणातील आदर्शपुरुष होते. सत्तारुढ व विरोधकांमधील समन्वयानं त्यांनी भारतीय राजकारणाला, लोकशाहीला उंची प्राप्त करुन दिली, त्यांच्यासारखा सर्वमान्य नेता पुन्हा होणार नाही, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनते धनंजय मुंडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

श्री. धनंजय मुंडे आपल्या शोकभावना व्यक्त करताना म्हणाले की, सुरुवातीच्या काळात अटलजींच्या नेतृत्वं, मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला मिळाली, बीड जिल्ह्यात, मराठवाडयातील त्यांच्या अनेक सभांच्या नियोजनात माझा सहभाग होता, त्यांच्या एका सभेचे संचलन केल्यानंतर त्यांनी सभा संपल्यानंतर आवर्जून जवळ बोलावून चांगला बोलतोस असे म्हणून पाठीवर थाप दिली होती हा क्षण मी कधीही विसरू शकत नाही.

अटलजींचं व्यक्तिमत्वं बहुआयामी होतं. ते बुद्धीवंत होते. विचारवंत होते. महान साहित्यिक होते. संवेदनशील कवी होते. माणूस म्हणून ते कितीतरी थोर होते. दूरदृष्टीचे आणि साहसी नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचं नेतृत्वं वादातीत आणि वक्तृत्वं आद्वितीय होतं. त्यांची भाषणं हा भारतीय राजकारणातला मोठा ठेवा आहे. भारतीय राजकारणाला नैतिक अधिष्ठान देण्यात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. संपूर्ण जीवन राष्ट्रकार्याला वाहून घेतलेले ते नेते होते. देशाच्या प्रगतीतलं त्यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या निधनानं भारतीय राजकारणाची, साहित्यविश्वाची आणि व्यक्तिश: माझीही मोठी हानी झाली आहे.

राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

स्वातंत्र्यपूर्व असो वा स्वातंत्र्योत्तर भारत ते नवीन सहस्रकातील भारत अशा दीर्घ पटलावर, अर्धशतकाहून अधिक कालावधीची, अटलजींची राजकीय कारकीर्द होती. पण एवढ्या दीर्घ कालावधीत अटलजी कधीच संदर्भहीन झाले नाहीत उलट, प्रत्येक सरत्या दशकात आणि बदलत्या पिढीत त्यांची गरज जास्तच भासू लागली. आणि म्हणूनच नव्या सहस्रकात प्रवेश करताना देशाचं नेतृत्व अटलजींच्या हाती आलं ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.

काँग्रेस पक्ष जवळपास अजिंक्य वाटत असताना, आणि राजकीय कारकिर्दीचा दीर्घ कालावधी विरोधी पक्षात बसून राजकारण करावं लागत असलं तरी कटुता, हेवेदावे, त्यांच्या व्यक्तिमत्वात आली नाही आणि दीर्घ कालावधीनंतर सत्तेत आल्यावर देखील त्यांच्या व्यक्तिमत्वातील शालीनता टिकून राहिली. साहित्य, संस्कृती, प्राचीन इतिहास अशा विविध विषयांच्या वाचनाने स्फुरलेली अटलजींची वाणी ही माझ्या पिढीने ऐकली, अनुभवली, त्यांचं सुसंस्कृत राजकरण हे जवळून बघता आलं ह्याचा मला खरंच आनंद आहे. भारतीय स्वातंत्र्य पंचाहत्तरीकडे वाटचाल करत असताना खऱ्या अर्थाने शेवटच्या देशव्यापी आणि देशभक्त नेतृत्वाची उणीव नक्कीच भासेल. अटलजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन.

भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले!: विखे पाटील

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले असून, त्यांच्या रूपात एक समर्पित, संवेदनशील आणि खंबीर नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

वाजपेयी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, कवि मनाचे वाजपेयी संवेदनशील तर होतेच. पण ते तेवढेच कणखरही होते. देशहित हेच त्यांचे पहिले प्राधान्य होते. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशासाठी भरीव योगदान दिलं. १९९१ मध्ये भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि वाजपेयींच्या काळात त्याला गती देण्यात आली. पंतप्रधान म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले.

त्या काळात आमचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांनी संत तुकाराम महाराजांची प्रतीमा असलेले नाणे काढण्याची मागणी केली होती आणि त्या मागणीला अटलबिहारी वाजपेयी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसा निर्णय घेऊन त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्यात आली व नवी दिल्लीतील एका सोहळ्यात थाटामाटात संत तुकाराम महाराजांची प्रतीमा असलेल्या नाण्याचे अनावरण झाले, अशी आठवणही विखे पाटील यांनी विषद केली.

एक उत्तम वक्ते म्हणून देखील अटलबिहारी वाजपेयींचे नेहमीच स्मरण केले जाईल. त्यांचे अनेक भाषण,कविता आपण ऐकल्या आहेत. अतिशय परखड आणि नेमक्या शब्दांत व्यक्त होण्याची विलक्षण शैली त्यांच्याकडे होती. त्यांच्या देहबोलीतून आणि शब्दांतून त्यांचा बाणेदारपणा प्रकट होत असे. त्यांच्या निधनामुळे भारताची मोठी हानी झाली असून, भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर राहिल, या शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

खासदार अशोक चव्हाण

देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने नैतिक मुल्यांवर अढळ श्रध्दा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, सुमारे पाच दशकाच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवले. खासदार, केंद्रीय मंत्री लोकसभेतील विरोधी पक्षनेते अशा विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. आपल्या अमोघ वक्तृत्वाने वाजपेयी यांनी दीर्घकाळ संसद गाजवली. अटलबिहारी वाजपेयी संवेदनशील कवी व विशालह्रदयी व्यक्तीमत्व होते. मनमिळावू स्वभावामुळे स्वपक्षासोबतच इतर पक्षातही वाजपेयींचे अनेक मित्र होते. देशाचे माजी गृहमंत्री व आमचे वडील स्व. डॉ. शंकरारव चव्हाण साहेबांशी अटलबिहारी वाजपेयी यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. डॉ. शंकरराव चव्हाण साहेबांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित होते. पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांनी डॉ. शंकरराव चव्हाण यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केल्याचे आजही आपल्या स्मरणात आहे. त्यांच्या निधनामुळे देशाच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रध्दांजली!

अजित पवारांची श्रद्धांजली

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने राष्ट्रसुर्याचा अस्त झाला आहे. उच्च नैतिकमूल्य व वैचारीक अधिष्ठान असलेले राष्ट्रीय नेतृत्व आपण गमावलं आहे अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

आपल्या शोकभावना व्यक्त करताना अजित पवार म्हणाले की, स्वपक्षासह विरोधकांचा विश्वास संपादन केलेले ते एकमेव नेते होते. प्रखर देशभक्त, संसदीय लोकशाहीवर प्रगाढ श्रध्दा, महान साहित्यिक, कवी मनाचं संवेदनशील व्यक्तीमत्व ही त्यांची ओळख होती. त्यांचं वक्तृत्व अद्वितीय होतं. त्यांच्यासारखा वक्ता, त्यांच्यासारखा नेता, त्यांच्यासारखा माणूस पुन्हा होणे नाही. सत्तारुढ आणि विरोधकांनी मिळून देशाला, लोकशाहीला पुढे घेवून जाण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला होता. त्यांच्या निधनानं देशाची, आंतरराष्ट्रीय राजकारणाची, लोकशाही परंपरेची मोठी हानी झाली आहे. अशा शब्दात त्यांच्या कार्याला, स्मृतींना, विचारांना भावपूर्ण श्रध्दांजली अजित पवार यांनी वाहिली.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -