पंतप्रधानांच्या आधी राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर, मॅडिसन स्क्वेअरवर घेणार सभा

rahul gandhi asks modi government about national security and about protection ahead of pm narendra modis mann ki baat

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahil Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) आधी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यानंतर 21 दिवसांनी मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. राहुल गांधी न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअरवर एनआरआय बांधवांना संबोधित करणार आहेत. यावेळी पूर्वीप्रमाणे मोदी सरकारवर आरोप करणार का? आणि आरोप केले तर त्यानंतर मोदी काय उत्तर देणार हे पाहावे लागेल.

राहुल गांधी येत्या ३१ मे रोजी 10 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. राहुल गांधी न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर या ठिकाणी भारतातून अमेरिकेत स्थायिक झालेल्या एनआरआय बांधवांना 4 जून रोजी संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात सुमारे 5 हजार एनआरआय सहभागी होणार आहेत. यानंतर राहुल गांधी स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या पॅनल चर्चेतही सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते कॅलिफोर्नियाला जाऊन तेथील नेत्यांना आणि उद्योजकांना भेटणार असल्याचे समजते.

राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात 22 जून रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

राहुल गांधी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करणार का?
राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी लंडन दौरा केला होता. यावेळी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात भारतीय लोकशाही दबावाखाली आहे आणि विरोधकांचा आवाज दाबला जात आहे, असा आरोप केला होता. त्यांनी असेही म्हटले होते की,  भारतातील लोकशाही प्रक्रियेचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आरएसएस नावाची संघटना आहे, जी एक कट्टरवादी आहे. भारतात प्रेस, न्यायपालिका, संसद आणि निवडणूक आयोग हे सर्वच या ना त्या कारणाने धोक्यात आहेत. एजन्सी कशा वापरल्या जातात हे तुम्ही कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्याला विचारू शकता. माझ्या फोनमध्ये पेगासस होते, हे तेव्हा झाले नाही जेव्हा आम्ही सत्तेत होतो. राहुल गांधींच्या या आरोपानंतर भाजपाने त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. राहुल गांधींनी माफी मागावी अशी भाजपाची भूमिका होती.