घरताज्या घडामोडीबिहारमध्ये आढळली करोना व्हायरसची संशय़ित तरुणी

बिहारमध्ये आढळली करोना व्हायरसची संशय़ित तरुणी

Subscribe

बिहारची राजधानी असलेल्या पटणामध्ये करोना व्हायरसची लागण झाल्याच्या संशयावरून एका तरुणीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही तरुणी मूळची छपरा येथील असून ती चीन ला गेली होती. नुकतीच ती परतली असून तिची तब्येत अचानक बिघडली. तिची प्राथमिक लक्षणे पाहता तिला करोना व्हायरसची लागण झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे पुढील उपचारांसाठी व तपासासाठी तिला पटणा वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात (PMCH)आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पटणा रुग्णालयातील डॉक्टरांचे एक विशेष पथक तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. चीनहून येताच तरुणीची तब्येत बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र एकंदर तिची खालावत जाणारी प्रकृती पाहता व एकूण आजाराची लक्षण बघून तिला करोना व्हायरसची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. त्यानंतर तिला तात्काळ पटणा रुग्णालयात हलवण्यात आले.

- Advertisement -

याआधी मुंबईतही करोना व्हायरसचे तीन संशयित रुग्ण आढळले होते. मात्र वैद्यकिय तपासणीत त्यांना करोनाची लागण झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच जयपूरमध्येही एक करोना संशयित तरुण आढळला असून त्याच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. त्याच्या वैद्यकिय तपासण्यांचा अहवाल आल्यानंतर त्याला करोनाची लागण झाली किंवा नाही ते स्पष्ट होईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे. चीनमध्ये हाहाकार उडवणाऱ्या करोना व्हायरसने रविवारपर्यंत ८० जणांचा बळी घेतला असून २७०० हून अधिक जणांना याची लागण झाली आहे. हा व्हायरस सर्वप्रथम गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चीनमधील हुबेई भागातील वुहान शहरात आढळला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -