घरCORONA UPDATEcoronavirus : धक्कादायक! महाराष्ट्रात कोरोना विषाणूने ४७ वेळा बदलले स्वरुप, तिसरी लाट...

coronavirus : धक्कादायक! महाराष्ट्रात कोरोना विषाणूने ४७ वेळा बदलले स्वरुप, तिसरी लाट ठरणार जीवघेणी

Subscribe

पहिला पूर्व जिल्हा, आता पश्चिम जिल्ह्यात आढळले म्युटेशन

देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोना विषाणूत होणाऱ्या सततच्या बदलामुळे धोका आणखी वाढला आहे. यातच कोरोना विषाणूत होणाऱ्या बदलासंदर्भात (म्युटेशन) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात आढळणाऱ्या कोरोना विषाणूने आत्तापर्यंत ४७ वेळा त्याचे रुप बदलले आहे. असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे उर्वरित राज्यांमध्ये परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान कोरोना विषाणूच्या बदलते म्युटेशन वेगाने पसरत असल्याने काळजी न घेतल्यास कोरोनाची तिसरी लाट याहून घातक ठरु शकते असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

प्लाझ्मा, रेमडेसिवीर, स्टेरॉइट्सयुक्त औषधांमुळे वाढतायतं कोरोना म्युटेशन 

एकट्या महाराष्ट्रात झालेल्या अभ्यासात असे आढळले की, तीन महिन्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांतील रुग्णांमध्ये कोरोना विषाणुचे नवनवे बदल (म्युटेशन) सापडत आहेत. प्लाझ्मा, रेमडेसिवीर, स्टेरॉइट्सयुक्त औषधांचा मोठ्याप्रमाणात वाढलेल्या वापरामुळे कोरोना विषाणूच्या म्युटेशनला चालना मिळत आहे. अशी शंकाही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे इतर राज्यांनाही याचा धोका निर्माण झाला आहे.

- Advertisement -

म्युटेशन आणि संसर्ग वाढल्यामुळे गंभीर स्थितीचा धोका

पुणेस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नवी दिल्लीस्थित नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) यांनी केलेल्या संयुक्त अभ्यासानुसार, महाराष्ट्रातील जिल्हावार कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कारण गेल्या एक वर्षात महाराष्ट्रातच सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या आहे. यावर एनआयव्हीच्या डॉ. प्रज्ञा यादव सांगतात, गेल्या फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात विषाणूच्या एस प्रोटीनमध्ये सर्वाधिक म्यूटेशन पाहयला मिळाले. त्याामुळे सध्या कोरोना विषाणुच्या प्रत्येक म्युटेशनविषयी माहिती घेतली जात आहे. यापैकी अनेक म्युटेशनची माहिती यापूर्वीही जाहीर करण्यात आली आहे. यात कोरोना विषाणुत होणारे म्युटेशन आणि संसर्ग वाढल्यामुळे गंभीर स्थितीचा अंदाज येऊ शकतो.

बी.1.617 हा कोरोना म्युटेशन आतापर्यंत ५४ देशांमध्ये सापडला

यावर एनसीडीसीचे वरिष्ठ अधिकारी सांगतात, बी.1.617 हा कोरोना म्युटेशन आतापर्यंत ५४ देशांमध्ये सापडला आहे. यातीलच एका म्युटेशनला जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा असे नाव दिले आहे. तथापि, भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान स्थानिक पातळीवर वाढणाऱ्या कोरोना म्युटेशनचा अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण यातूनच गंभीर म्युटेशनची माहिती मिळू शकणार आहे.

- Advertisement -

यावर्षी कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रातून सुरु झाली आणि जानेवारी महिन्यापासून राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले. नोव्हेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ दरम्यान राज्यात कोरोना विषाणुचा कोणता म्युटेशन पसरत आहे ? हे शोधण्यासाठी ७३३ नमुने गोळा करुन जीनोम सिक्केसींग करण्यात आले. यातील आश्चर्याची गोष्ट म्हणजे शास्त्रज्ञांना एकापाठोपाठ एक सर्व नमुन्यांमध्ये ४७ नवे म्युटेशन आढळले. यापूर्वीही असे घडले नव्हते. यामुळे भारतात पसरणाऱ्या म्युटेशनबाबत अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, इटली देशांनी धसका घेतला. जेव्हा शास्त्रज्ञांना ७३३ नमुन्यांपैकी ५९८ नमुन्यांचा क्रम लावण्यात यश मिळाले तेव्हा असे आढळले की, राज्यात कोरोना विषाणुच्या डेल्टा म्युटेशनसह अनेक नवनवे म्युटेशन महाराष्ट्रातील लोकांमध्ये पसरत असून ग्रामीण भागांतही ते पसरत आहेत.

कोरोनाचे हे म्युटेशन आले समोर

अभ्यासादरम्यान आढळलेल्या नवनवीन म्युटेशनची संख्या पाहून शास्त्रज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केले. यातील २७३ नमुन्यांमध्ये बी. 1.617,73 मध्ये बी.1.36.29, 67 मध्ये बी.1.1.306, 31 मध्ये बी.1.1.7, 24 मध्ये बी.1.1.216, 17 मध्ये बी.1.596 आणि 15 नमुन्यांमध्ये बी .1.1. म्युटेशन आढळले. या व्यतिरिक्त १७ नमुन्यांमध्ये बी.1 आणि १२ नमुन्यांमध्ये बी.1.36 म्युटेशन आढळले आहेत. या व्यतिरिक्त संशोधनात आणखी बरेच म्युटेशन आढळत असून त्यावर अभ्यास सुरु आहे.

पहिला पूर्व जिल्हा, आता पश्चिम जिल्ह्यात आढळले म्युटेशन

या अभ्यासात असे दिसून आले की, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूचे अनेक म्युटेशन पसरत आहेत. तर यापूर्वी पूर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बी.1.617 हा म्युटेशन सर्वात जास्त पसरत होता. पुणे, ठाणे, औरंगाबादसह पश्चिम राज्यात डेल्टा व्हेरिएंटचे वेगवेगळे बदल आढळले आहेत. बहुतेक म्युटेशन स्पाइक आणि आरबीडी संरचनेत आढळले. परंतु यावर्षी फेब्रुवारीपासून कोरोना विषाणुचे म्युटेशन स्पाइक प्रोटीन आणि आरबीडी संरचनेच्या बाहेरही दिसू लागले, जे थेट कोरोना विषाणुमुळे होणाऱ्या धोक्याची सुचना देत आहेत.

‘या’ राज्यांमध्ये चाचण्या वाढविण्याचे आवाहन

यापूर्वी उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, तेलंगणा या राज्यांमध्ये वाढत्या संसर्गामुळे चाचण्या अनुक्रम वाढवण्याचे शास्त्रज्ञांनी आवाहन केले आहे. या राज्यांतील असे अनेक जिल्हे जिथे कोरोना संसर्गाचा दर ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला होता, जो जगातील इतर कोणत्याही देशात दिसत नाही.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -