Coronavirus: ‘आम्हाला कोरोनानं मरायचं नाही’, नोट लिहून दाम्पत्याची आत्महत्या

suicide due to coronavirus
प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाचा कहर संपुर्ण भारतात पसरला आहे. देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यातच पंजाबच्या अमृतसर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी येथील एका दाम्पत्याने आत्महत्या केली. आपल्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याच्या भीतीमधून त्यांनी आत्महत्या केली. “आम्ही कोरोना विषाणूमुळे मरु इच्छित नाही, आम्हाला कोरोनाची भीती वाटतेय”, अशी सुसाईड नोट या दाम्पत्याने लिहून ठेवली आहे.

अमृतसर मधील बाबा बकाला मधील सठियाल गावात ही घटना घडली आहे. बलविंदर सिंह आणि गुरजिंदर कौर अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. या दोघांनीही विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. पतीचे वय ६५ तर पत्नीचे वय ६३ होते. त्यांच्या मृत्यूनंतर देखील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. या दाम्पत्याचे शवविच्छेदन करण्यास डॉक्टरांनी नकार दिला आहे.

देशभरात अनेक ठिकाणी कोरोना व्हायरसमुळे आत्महत्या होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. याआधी दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये पंजाबच्या एका ३५ वर्षीय युवकाने आत्महत्या केली होती. हा युवक नुकताच ऑस्ट्रेलियातून परतला होता. थोडा ताप असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला हॉस्पिटलमध्ये क्वारंटाइन केले होते, तसेच त्याची कोरोना टेस्ट केली होती. मात्र रिपोर्ट येण्याच्या एक दिवस आधीच त्याने आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे हॉस्पिटलमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

तर दिल्लीतीलच राजीव गांधी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये तबलीगी जमातच्या एका युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. डॉक्टर आणि अग्निशमन दलाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे या तरुणाचा जीव वाचला होता. भारतात सध्या कोरोनाचे २५९१ रुग्ण आहेत. यापैकी ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १९० बरे झाले आहेत.