घरCORONA UPDATEदिलासादायक बातमी: करोना अद्याप तिसऱ्या स्टेजमध्ये नाही - आरोग्य मंत्रालय

दिलासादायक बातमी: करोना अद्याप तिसऱ्या स्टेजमध्ये नाही – आरोग्य मंत्रालय

Subscribe

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. भारतात करोना बाधितांचा आकडा वाढत असला तरी अजून तो लोकसंख्येत गेलेला नाही. जेव्हा २० ते ३० टक्के रुग्णांना करोनाची लागण कशी झाली? याची कोणतीही माहिती किंवा धागा मिळत नाही, तेव्हाच आपण तिसऱ्या स्टेजला गेलो असे मानू शकतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

करोनाबाबत माध्यमांना माहिती देत असताना ICMR चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमन गंगाखेडकर यांनी सांगितले की, आपण तिसऱ्या स्टेजमध्ये गेलो असल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत. त्यामुळे आताच यावर ठामपणे बोलता येणार नाही. हैदराबाद येथे करोनाची लागण झालेल्या रुग्णाचा कोणताही परदेश प्रवासाचा इतिहास नव्हता. या प्रकरणामुळे आपण तिसऱ्या स्टेजला गेलो असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. मात्र डॉ. गंगाखेडकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले की, एक किंवा दोन प्रकरणात जर रुग्णाचा परदेश प्रवास नसेल आणि तरिही करोनाची लागण कशी झाली? हे समजत नसेल तर त्याची व्यवस्थित माहिती काढण्यास आपण असमर्थ ठरलो, असा होतो.

- Advertisement -

भारत जर तिसऱ्या स्टेजला गेला तर ती गोष्ट आम्ही लपवून ठेवणार नाही. आम्ही लोकांना त्याची माहिती देऊ जेणेकरुन आपल्याला त्यावर नियंत्रण आणता येईल, असे लव अग्रवाल यांनी सांगितले. तसेच आरोग्य मंत्रालयाने भारतातील कोरोना बाधितांचा आकडा खूप पुढे जाईल, ही शक्यताही फेटाळून लावली. मिशिगन विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासात असे नमूद केले होते की, भारतात जवळपास एक लाख ते १३ लाख कोरोना बाधित रुग्ण आढळू शकतात. मात्र डॉ. गंगाखेडकर यांनी या संशोधनाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, जगाचा अंत होणार आहे, असा इशारा अनेकजण देत असतात. मात्र त्यात तथ्य नसते. भारताने जो लॉकडाऊन जाहीर केला आहे, तो यशस्वी झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या भारतात एकूण ६५६ रुग्ण असून १४ जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे. जर आपण सामूहिक प्रयत्न केले आणि सरकारच्या सूचना पाळल्या तर आपण कोरोनाला हरवू शकतो आणि जे लोक अंदाज व्यक्त करत आहेत, त्यांना खोटे पाडू शकतो, असे लव अग्रवाल यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -