CoronaVirus: लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना पेपरलेस पद्धतीने मिळणार सीमकार्ड!

कोरोना व्हायरस वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र या लॉकडाऊनच्या काळात लाखो मोबाईल कनेक्शन्स रखडले आहेत.

customers will receive paperless system sim card during the lockdown

लॉकडाऊनमुळे नवीन सीम कार्ड देण्याची प्रक्रिया संपूर्णपणे ठप्प झालेली आहे. सीम कार्ड पुरवठा करणारे देशातील रिटेल शॉप्स आता बंद झाले आहेत. त्यामुळे नवीन सीमकार्ड घेण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या कोणालाही सीमकार्ड दिले जात नाही ही सद्यस्थिती आहे. नवीन ग्राहकांना सीमकार्डसाठी कागदपत्रे देणेही सध्या शक्य होत नाही. त्यामुळे नवीन सीमकार्डसाठीची पडताळणी प्रक्रियाही रखडली आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, वोडाफोन आयडिया, बीएसएनएल यासारख्या सेवा पुरवठादार कंपन्यांसोबतच सेवा पुरवठादारांनाही लॉकडाऊचा फटका बसला आहे. अत्यावश्यक सेवेत दूरसंचार सेवा समाविष्ट होत नसल्याने लॉकडाऊनचा चिमटा दूरसंचार क्षेत्रालाही बसला आहे.

नवीन सीम कार्ड घेण्यासाठी धडपड

कोरोना व्हायरसच्या काळात सरकारमार्फत समाजातील शेवटच्या घटकाला पुरवण्यात येणारी सबसिडी तसेच आर्थिक फायदा याचा फायदा करून देण्यासाठीही अडचणी येऊ लागल्या आहेत. अनेक ग्राहकांना मोबाईल रिचार्ज करण्यासारखी सुविधा मिळत नसल्याने या योजनांचा तसेच सबसिडीचा फायदा ग्राहकांना मिळणे कठीण झाले आहे. कारण अनेक योजनांचे तसेच सबसिडीचे व्हेरिफिकेशन आणि कर्न्फमेशन हे मोबाईल क्रमांकावरच आधारीत आहे. अनेक लोक नवीन सीम कार्ड घेण्यासाठी धडपड करत आहेत. पण त्यासाठी मोठी अडचण सध्या भेडसावत आहे. देशभरात सरासरी २५ लाख नवीन मोबाईल कनेक्शन दिली जातात. पण लॉकडाऊनमुळे ही सगळी प्रक्रिया रखडली आहे.

पेपरलेस प्रक्रिया राबवावी – सीओएआय

कोरोनाच्या संकटामुळे देशात नवीन मोबाईल सीमकार्ड देण्याची प्रक्रिया रखडली आहे. पण या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. ज्यांना नवीन मोबाईल कनेक्शनची गरज आहे अशा ग्राहकांना मोबाईल कनेक्शन मिळणे गरजेचे आहे असे मत सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राजन मॅथ्युज यांनी व्यक्त केले आहे. सीओएआयने दूरसंचार विभागाकडे यासाठीचा पाठपुरावा केला आहे. आम्ही दूरसंचार विभागाचे सचिव अंशु प्रकाश यांच्यासोबत बोलणी करून हे मुद्दे पटवून दिले आहेत असे त्यांनी सांगितले. आम्ही मोबाईल सेवा पुरवठादारांसोबत समन्वय साधून ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून केवायसी प्रक्रिया कशी करता येईल यासाठीची चर्चा केली आहे. त्यामुळे सध्या दूरसंचार विभाग यासाठी काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.

काय आहे पेरपलेस प्लॅन?

ऑनलाईन केवायसी प्रक्रियेचा भाग म्हणून पत्ता असलेला पुरावा आणि ओळखपत्राचा ऑनलाईन पद्धतीने पाठवून ही पेपरलेस प्रक्रिया पूर्ण केली जाईल. पण या ग्राहकाकडे संपूर्ण केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पर्यायी मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे. एकदा संपूर्ण ऑनलाईन कागदपत्रांची पडताळणी झाली की एक इनएक्टीव्ह सीम कार्ड त्या व्यक्तीला पाठवण्यात येईल. मोबाईल ऑपरेटरच्या वेबसाईटवरून मिळालेल्या ओटीपीच्या माध्यमातून हे सीम कार्ड एक्टीव्हेट करता येईल. त्यानंतर सीम कार्ड वेरीफिकेशन पूर्ण झाल्याचा एसएमएस ग्राहकांना पाठवण्यात येईल. भारतात आलेल्या अनेक परदेशी नागरिकांनाही विझा संपल्याने मोबाईल क्रमांकाची नवीन जोडणी मिळण नाही. त्यांच्या फ्लाईट्सदेखील रद्द झाल्याने अनेकांना भारतात व्हिझा रखडल्यामुळे अडकून पडावे लागले आहे. अनेक परदेशी नागरिकांना आपल्या कुटुंबीयांसोबत संपर्कात राहण्यासाठी तसेच एम्बसी आणि त्यांच्या देशातील सरकारसोबत संपर्कात राहण्यासाठी मोबाईल सीम कार्ड गरजेचे आहे.


हेही वाचा – CoronaVirus: कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सुनील गावस्कर यांची ५९ लाखांची मदत!