घरदेश-विदेशभारताची महत्त्वाकांक्षी 'गगनयान' मोहिमेची तारीख ठरली, सरकारने संसदेत दिली माहिती

भारताची महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेची तारीख ठरली, सरकारने संसदेत दिली माहिती

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यशाचे नवनवे टप्पे पादाक्रांत करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून भारताची महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ ही पहिली मानवी अंतराळ मोहीम (एच1) हाती घेण्यात आली असून या मोहिमेची तारीखही ठरली आहे. केंद्रीय अणूऊर्जा आणि अंतराळमंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी लोकसभेत याची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 साली स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात 10,000 कोटी रुपयांच्या गगनयान मोहिमेची घोषणा केली होती. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत 2022 मध्ये ही पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम सुरू करण्याची सरकारने योजना आखली होती, परंतु कोविड-19 महामारीमुळे ते होऊ शकले नाही. त्यामुळे आता ‘गगनयान’ ही पहिली मानवी अंतराळ मोहीम (एच1) 2024च्या अखेरीस म्हणजे, चौथ्या तिमाहीदरम्यान करण्याचे उद्दिष्ट असल्याचे केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

- Advertisement -

या मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षेला असलेले सर्वोच्च महत्त्व विचारात घेऊन उड्डाणाच्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये क्रू एस्केप प्रणाली आणि पॅराशूट आधारित वेग कमी करण्याची प्रणाली यांच्या कामगिरीची चाचपणी करण्यासाठी मुख्य ‘जी1’ मोहिमेपूर्वी दोन चाचणी वाहन मोहिमा राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मानवरहित ‘जी1’ मोहीमेचे प्रक्षेपण 2023च्या शेवटच्या तिमाहीमध्ये करण्याचे उद्दिष्ट असून, त्यापाठोपाठ ‘जी2’ या मानवरहित दुसऱ्या मोहिमेअंतर्गत 2024च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये प्रक्षेपण करण्यात येईल आणि त्यानंतर ‘एच1’ ही मुख्य मानवी अंतराळ मोहीम 2024च्या चौथ्या तिमाहीमध्ये राबवणार असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.

पहिला मानवरहित गगनयान कार्यक्रम म्हणजे ‘जी1’ मोहिमेत मानव वापर करणार असलेल्या प्रक्षेपक वाहनाची, कक्षीय प्रवेशाच्या प्रणालीची, मोहीम व्यवस्थापन, दळणवळण प्रणाली आणि पूर्वस्थितीत येणाऱ्या क्रियांची कामगिरी पडताळून पाहणे हे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. या अंतराळयानामध्ये वाहकभार म्हणून एक मानवी प्रतिकृती पाठवण्यात येणार आहे.

- Advertisement -

या मानवी अंतराळ मोहिमेत सहभागी होण्यासाठी अंतराळवीरांची निवड करण्यात आली असून सध्या ते बंगळूरू येथे विशेष प्रशिक्षण घेत आहेत. अंतराळवीर प्रशिक्षणाचे पहिले सत्र पूर्ण झाले असून त्यामध्ये त्यांना सैद्धांतिक विषय आधारित, अंतराळ वैद्यकशास्त्र, प्रक्षेपक वाहने, अंतराळयान प्रणाली आणि जमिनीवरील पाठबळ पुरवणाऱ्या पायाभूत सुविधा, नियमित शारीरिक तंदुरुस्ती सत्रे, एरोमेडिकल प्रशिक्षण आणि उड्डाणाचा सराव अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या सर्वांशी संबंधित मूल्यमापन आणि कामगिरी तपासून पाहणारे उपक्रम देखील पूर्ण करण्यात आले आहेत. अंतराळवीर प्रशिक्षणाचे दुसरे सत्र सध्या प्रगतीपथावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -