घरदेश-विदेशकरुणानिधी आणि जयललिता यांच्यातील विळ्या भोपळ्याचे नाते!

करुणानिधी आणि जयललिता यांच्यातील विळ्या भोपळ्याचे नाते!

Subscribe

करुणानिधी आणि जयललिता यांचं नातं नेहमीच उंदरा-मांजरांचं राहिलं आहे. दोघांनी नेहमीची एकमेकांवर कुरघोडी केली. कसं होतं त्यांचं आयुष्य? याचा आढावा...

जयललिता आणि करूणानिधी यांचे नाते हे नेहमीच विळ्या-भोपळ्याचे राहिले आहे. या सगळ्याचा इतिहास मोठा रंजक आहे. ज्या दोन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये तामिळनाडूत सत्तासंघर्ष चालतो ती सगळीच मंडळी कधी काळी एकाच कथेची विविध पात्रं होती. करूणानिधी पटकथा लिहित असत. एमजीआर नायक, तर जयललिता नायिका असा हा संच होता. जयललिता आणि एमजीआर यांचे नाते तसे गुरू-शिष्याचे, पण तरीसुद्धा गुलदस्त्यातलेच! एमजीआर यांच्या शववाहिकेवरून जयललितांना हाकलून दिले गेले आणि सूडाचे नवे राजकारण सुरू झाले. इतकंच नाही तर हे राजकारण विधानसभेत जयललितांची साडी ओढण्यापर्यंत येऊन पोहोचले. नंतर नेसत्या वस्त्रानिशी पोलिसांनी घरातून उचलून नेलेले करुणानिधी लोकांना पाहता आले. नंतरच्या काळात करुणानिधींचे वाढते वय, स्टॅलिन आणि अझगिरी या दोघांमध्ये विभागलेला त्यांचा पक्ष, डीएमकेमध्ये निर्माण झालेली गोंधळाची स्थिती, कनिमोळींचा तुरुंगवास, निष्प्रभ राष्ट्रीय पक्ष या सगळ्या गोष्टी जयललितांच्या पथ्यावर पडल्या.

कशी सुरु झाली वादाला सुरुवात?

१९८९ साली तमिळनाडू विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात अण्णा द्रमुक पक्षाचा दारून पराभव झाला. त्यामुळे पक्षातील जयललितांच्या विरोधकांना पक्षाची सर्व सूत्रे जयललितांकडे सोपवावी लागली. १९९१ च्या निवडणुकीमध्ये जयललिता यांच्या पक्षाने काँग्रेससोबत युती केली आणि त्या पहिल्यांदा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. दरम्यान, त्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरल्या त्या म्हणजे त्यांची खास मैत्रीण शशिकला हिच्या भाच्याच्या लग्नात जे करोडो रूपये खर्च केले गेले त्यामुळे. लग्नात जे करोडो रुपये खर्च केले गेले, ते सरकारी खजिन्यातून वापरले गेल्याचा आरोप जयललिता यांच्यावर करण्यात आला. १९९५ मध्ये जयललितांनी ह्या दत्तक पुत्राच्या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केले. हा विवाह सर्वात महाग विवाह सोहळ्याच्या रुपात गिनीज बुकमध्ये नोंदवला गेला होता. मात्र जयललिता यांनी तो सगळा खर्च मुलीकडून करण्यात आला असल्याचं सांगून त्या चर्चेला पूर्णविराम दिला होता. त्यावेळी दिवसेंदिवस तमिळनाडूमध्ये जयललिता यांचा प्रभाव वाढत होता.

- Advertisement -

तमिळनाडूतील जनता जयललिता यांना देवासमान मानून पूजत होती. मात्र हा विश्वास फार काळ टिकला नाही. १९९६च्या निवडणुकांमध्ये त्यांना अपयश आलं आणि एम. करूणानिधींचं नेतृत्व असणारा डी. एम. के पक्ष पुन्हा सत्तेत आला. त्यानंतर करुणानिधी यांनी जयललितांवर एक दोन नाही तर तब्बल ४६ भ्रष्टाचाराच्या आरोपांचा ठपका ठेवला. १९९६ मध्ये करुणानिधींनी जयललितांच्या निवासस्थानावर छापे टाकायला लावले. या छाप्यात ३० किलो सोने, ८०० किलो चांदी-हिरे जडीत दाग-दागिने मिळाले. १२ हजार साड्या, ७५० जोड्या सँडल, १९ कार, ३८ एसी आणि ९१ लक्झरी घड्याळंही सापडली. न्यायालयाने यासाठी चार वर्षांची शिक्षा आणि १०० कोटी दंड अशी शिक्षा जयललिता यांना सुनावली. सीएम पद यामुळं जयललितांना सोडावं लागलं. त्यामुळे जयललिता यांना ६ महिन्यांच्या कालावधीसाठी तुरुंगात जावे लागले. मात्र नंतर त्यांची यातून निर्दोष मुक्तता झाली.

बाहेर आल्यावर जयललितांनी घेतला बदला

जयललिता यांनी या अपमानाचा बदला २००१ साली घेतला, जेव्हा त्या पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी निवडून आल्या. त्यांनी रातोरात माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांना अटक करण्याचे आदेश काढले. या घटनांदरम्यान जयललिता केंद्रीय राजकारणात सक्रीय झाल्या. तामिळनाडूमध्ये जयललितांच्या अण्णा द्रमुकने करुणानिधी यांच्या द्रमुकचा सफाया केला. दोन टर्म सत्ता उपभोगणार्‍या करुणानिधींना मात्र यावेळी सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. द्रमुकला घराणेशाहीच्या राजकारणाचा फटका तर बसलाच, पण टू जी स्पेक्ट्रम घोटाळाही त्यांना भोवला असंच आता म्हणावे लागेल. त्यानंतर करुणानिधींनी तर आपला ड्रेसदेखील बदलला असल्याचं चर्चेत होतं. द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा एम करुणानिधी यांनी त्यांचा सात वर्षे असलेला ड्रेसकोड बदलला. पूर्वी ते अंगावर पिवळी शाल घेत असत. जयललिता आल्यावर काळ्या शर्टावर पांढरी शाल परिधान करायला लागले. मुख्यमंत्री जयललिता यांच्या सरकारचा निषेध करण्यासाठी ते काळा शर्ट घालत असल्याचे सांगत असले तरी ज्योतिषाच्या सल्ल्यावरून त्यांनी हा बदल केला असल्याचे मानले गेले. पिवळा रंगही त्यावेळी त्यांनी ज्योतिषाच्या सांगण्यावरुनच स्वीकारला होता असं मानलं जात होतं.

- Advertisement -

करुणानिधींचं काय चुकलं?

करूणानिधी आणि अण्णादुराई यांच्यात एक फरक होता. पक्ष अण्णांनी उभा केला होता आणि त्याची दिशाही ठरवली होती. त्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यावर अण्णांची जेवढी हुकूमत होती, तेवढा अधिकार चालवणे करुणानिधींना शक्य नव्हते. म्हणूनच द्रमुकमध्ये कुरबुरी चालू झाल्या. पक्षाला मते मिळवण्यासाठी विचार आणि वक्तृत्त्व यापेक्षा अन्य मार्ग करुणानिधी यांना शोधावे लागले. त्यातच त्यांनी एमजीआर नावाच्या लोकप्रिय अभिनेत्याचा आश्रय घेतला. करूणानिधींनी ही चूक मतांसाठी केली आणि तिथूनच द्रविडी राजकारणाला भलतेच वळण लागले. १९७२ च्या निवडणुकीत एमजीआरच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन करूणानिधींनी सत्ता टिकवली. पण त्याच निवडणुकीने एमजीआर यांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण केली. त्यातच करूणानिधींनी आपल्या स्टालीन नामक पुत्राला चित्रपटात आणण्याचा प्रयास केला. त्यामुळे वाद विकोपास गेला आणि नंतर एमजीआर यांनी वेगळी चूल मांडली आणि अण्णाद्रमुक नावाचा दुसरा प्रादेशिक पक्ष काढला. त्यांच्या चाहत्यांच्या ज्या संस्था आणि संघटना होत्या, त्यांचे रातोरात पक्ष शाखांमध्ये रुपांतर करण्यात आले आणि नामोहरम काँग्रेसला बाजूला पाडून तामिळी राजकारणात द्रमुक नवाचा प्रतिस्पर्धी उभा ठाकला.

एकंदरीतच तामिळनाडूचं राजकारण हे जयललिता, करुणानिधी आणि एमजीआर यांच्याभोवती सतत फिरत राहिलं आणि कधीही जयललिता आणि करूणानिधी यांचं नातं चांगलं न राहता कायम एकमेकांवर कुरघोडीचंच राहिलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -