दररोज 2 ते 2.5 किलो शिव्या खातो, त्यामुळे थकवा येत नाही, पंतप्रधानांचा विरोधकांना टोला

हैदराबाद : जनधन, आधार आणि मोबाईल या त्रि-शक्तीच्या माध्यमातून आम्ही सर्व बनावट लाभार्थींना हटविण्यात सक्षम आहोत. गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. याआधी, फसवणुकीद्वारे गरिबांचे पैसे आणि रेशन लुटले जात होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. बरेच लोक मला विचारतात की, तुम्ही थकत कसे नाहीत? मग मी सांगतो, मला थकवा येत नाही, कारण दररोज मी 2 ते 2.5 किलो शिव्या खातो… त्याचे रुपांतर माझ्या पोषक तत्वात होते, देवाने तसा मला आशीर्वाद दिला आहे, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यावर शरसंधान केले. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यावर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या राजकारणाचा आरोप केला. राज्याला प्रथम जनतेची गरज आहे, कुटुंबाची नाही. केसीआर यांच्या ‘अंधश्रद्धे’चा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, सामाजिक न्यायात ते सर्वात मोठा अडथळा बनत आहेत.

केंद्रीय यंत्रणांमार्फत भ्रष्टाचाराची चौकशी होईल, अशी भीती वाटत असल्याने विरोधी पक्ष आघाडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन पेमेंटवर भर दिल्याने भ्रष्टाचारात लक्षणीय घट झाली आहे, कारण अशा व्यवहारांचा मागोवा घेतला जाऊ शकतो.

पायाभूत सुविधा महत्त्वाच्या
पंतप्रधान मोदी यांनी आज आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम येथे 10,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याच्या, यापूर्वीच्या सरकारांच्या दृष्टीकोनावर पंतप्रधानांनी टीका केली. त्यांच्या या वृत्तीमुळे लॉजिस्टिक्सच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि पुरवठा साखळीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली, असे त्यांनी सांगितले.

आजच्या प्रकल्पांच्या माध्यमातून एकात्मिक विकासाचे उदाहरण देताना पंतप्रधानांनी प्रस्तावित आर्थिक मार्गिका प्रकल्पामधील 6 पदरी मार्ग, बंदर जोडणीसाठी स्वतंत्र मार्ग, विशाखापटणम रेल्वे स्थानकाचे सौंदर्यीकरण आणि मासेमारीसाठी अत्याधुनिक बंदराची उभारणी या प्रकल्पांची माहिती दिली. पंतप्रधानांनी या एकात्मिक दृष्टीकोनाचे श्रेय पीएम गती शक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याला दिले आणि यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीला केवळ गती मिळाली नाही तर प्रकल्पांच्या खर्चातही कपात झाली आहे, असे सांगितले.