Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला बिनशर्त कर्ज देण्यास 'मित्रा'चाही नकार

आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला बिनशर्त कर्ज देण्यास ‘मित्रा’चाही नकार

Subscribe

इस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला कुठे आधार मिळण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत आहे. आयएमएफकडून आर्थिक मदत मिळण्याचे आधीच थांबलेले असतानाच सौदी अरेबियाने इस्लामाबादला बिनशर्त कर्ज देण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी अलीकडेच सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली होती. पण तेही देशासाठी आपत्कालीन निधी मिळवण्यासाठी सौदी अरेबियाला राजी करू शकले नाहीत.

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पाकिस्तानला आपला ‘मित्र देश’ सौदी अरेबियाकडून मदतीची आशा होती. पण सौदीने पाकिस्तानला कोणतेही मदत पॅकेज किंवा बिनव्याजी कर्ज देण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान सरकारला धक्का बसला आहे. पाकिस्तानला आर्थिक आणीबाणीतून बाहेर काढण्यासाठी मित्र देशही मदत करण्यास तयार नाहीत, असे वक्तव्य पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी केले आहे.

- Advertisement -

दावोस येथे जानेवारीत झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सौदी अरेबियाचे अर्थमंत्री मोहम्मद अल-जदान यांनी सरकारचे नवीन धोरण स्पष्ट केले होते. आम्ही कोणत्याही अटीशिवाय थेट अनुदान आणि ठेवी देत ​​होतो, पण आता आम्ही त्यात बदल करत आहोत. आम्ही आमच्या लोकांवर कर लागू केले आहोत आणि आमची इतरांकडूनही अशीच अपेक्षा आहे. आम्हाला मदत करायची आहे, पण तुम्हीही तुमची भूमिका पार पाडावी, अशी आमची इच्छा आहे, असे त्यांनी पाकिस्तानबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले होते. सौदी अरेबियासाठी पाकिस्तानशी व्यवहार करणे नवीन नाही, तथापि, याआधी सौदी अरेबियाने जॉर्डन, मोरोक्को आणि अगदी इजिप्तला देखील आर्थिक मदत देण्यास नकार दिला आहे.

- Advertisement -

आर्थिक स्थिती बिकट
येत्या काही महिन्यांत देशातील महागाईचा दर 33 टक्क्यांवर पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या 12 महिन्यांत देशाचे चलनमूल्य सुमारे 65 टक्क्यांनी घसरले आहे. सहा महिन्यांपूर्वी, परकीय चलनाची बचत करण्यासाठी पाकिस्तान सरकारने जवळजवळ सर्व आयात बंद केली, ज्यामुळे उत्पादन क्षेत्रात कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला आणि अनेक ऑटोमोबाइल उत्पादन कारखाने आणि कपड्यांचे कारखाने तूर्तास बंद झाले आहेत.

- Advertisment -