घरCORONA UPDATEशेतकऱ्यांना हमीभावाच्या दीडपट दर मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

शेतकऱ्यांना हमीभावाच्या दीडपट दर मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

Subscribe

देशात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊन काळात अर्थव्यवस्थेची संथ झालेली चाकं पुन्हा वेगात आणण्यासाठी केंद्र सरकारने आज काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा कृषी क्षेत्रासाठी करण्यात आली आहे. यापुढे शेतकऱ्यांना त्यांच्या सध्याच्या मंजूर हमीभावापेक्षा दीडपट दर मिळणार आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा देशातल्या शेतकऱ्यांना होणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. लॉकडाऊनमुळे कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा मानली जात आहे. त्यासोबतच, याआधी कृषीकर्ज फेडण्याची मुदत ३१ मेपर्यंत वाढवण्यात आली होती. आता तीच मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, जे शेतकरी ३१ ऑगस्टपर्यंत कर्ज फेडतील, त्यांना ४ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या घोषणा करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, शेतीसोबतच लघु आणि मध्यम उद्योगांसाठी देखील निर्णय घेण्यात आले आहेत. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये ५० हजार कोटींची गुंतवणूक करण्याचं केंद्र सरकारने याआधीच जाहीर केलं आहे. त्यानुसार आता मध्यम उद्योगांमधल्या गुंतवणुकीची मर्यादा २० कोटींवरून वाढवून ५० कोटी करण्यात आली आहे. तर उलाढालीची मर्यादा १०० कोटींवरून २५० कोटी करण्यात आली आहे. यातून नवीन रोजगार निर्माण होईल, निर्यात देखील वाढेल. याचा फायदा जीडीपी वाढण्यात होईल, असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -