जगात कोरोनामुळे मृतांची संख्या ३० लाख पार; भारत दररोज रचतोय नकोसे विक्रम

Global Covid deaths top 3m as India posts another daily record rise in cases
जगात कोरोनामुळे मृतांची संख्या ३० लाख पार; भारत दररोज रचतोय नकोसे विक्रम

जगभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने विक्राळ रुप धारण केल्याचे दिसत आहे. यामुळे जगातील ३० लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात भारत सध्या दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत आणि मृत्यूच्या संख्येत नवनवीन विक्रम करत आहे. जे देशासह जगाला टेन्शन देणार आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने आज जाहीर केलेल्या डेटानुसार, जगातील आतापर्यंत ३० लाख २२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १३ कोटी ९९ लाख ६३ हजार ६४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.

जगात पाहायला गेले तर अनेक देशात कोरोनाची दुसरी, तिसरी लाट आली आहे. पण सध्या भारतात आलेल्या कोरोनाच्या नव्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. मागील तीन दिवसांपासून २ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण भारतात आढळत आहेत. भारतात गेल्या २४ तासांत देशात २ लाख ३४ हजार ६९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार ३४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख २३ हजार ३५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता भारतातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ४५ लाख २६ हजार ६०९ पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ७५ हजार ६४९ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी २६ लाख ७१ हजार २२० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १६ लाख ७९ हजार ७४० जणांवर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी भारत जागतिक क्रमवारीत ब्राझीलला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

जागतिक यादीतील टॉप-५ कोरोनाबाधित देश

अमेरिका : एकूण रुग्ण ३२,३०८,५५७/ एकूण मृत्यू ५७९,९५१

भारत : एकूण रुग्ण १४,५२६,६०९/ एकूण मृत्यू १७५,६७३

ब्राझील : एकूण रुग्ण १३,८३४,३४२/ एकूण मृत्यू ३६९,०२४

फ्रान्स : एकूण रुग्ण ५,२२४,३२१/ एकूण मृत्यू १००,४०४

रशिया : एकूण रुग्ण ४,६९३,४६९/ एकूण मृत्यू १०५,१९३